नमस्कार ! सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
ती आई आहे, ती बहीण आहे, ती काकी आहे, ती मामी आहे, मग ती मुलगी म्हणून का नको ? हा प्रश्न मात्र मनाला सतत अस्वस्थ करीत असतो. समाजामध्ये स्त्रियांचा असलेला दर्जा आणि त्यांना मिळणारी वागणूक या सर्वांचा विचार व्हायला हवा. आपल्या देशामध्ये आपण स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करतो परंतु आपल्या स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जाते का? याचा विचार कुठेतरी होणे गरजेचे आहे . कामाच्या ठिकाणी असो किंवा घरामध्ये असो फक्त एक उपभोगाचे साधन म्हणून स्त्रीकडे पाहिले जाते. हा विचार, ही मानसिकता बदलायला हवी. नोकरीच्या ठिकाणी जर बॉस म्हणून एखादी स्त्री असेल तर पुरुष कर्मचारी ऐकून घेत नाहीत. म्हणजेच स्त्रीने सांगितलेलं काम आम्ही का करू? ही पुरुषी मानसिकता बदलायला हवी. चुकून कधीतरी एखाद्या पुरुषावर भांडी घासायची वेळ आली तर तो सरळ सरळ भांडी घासतला नकार देतो. तो म्हणतो 'ही बायकांची कामं आम्ही नाही करणार. हे चुकीचं आहे. मराठी भाषा दिनाचे स्टेटस आपण सर्वांनी टाकले पण त्याच बरोबर सकाळी दूध घेऊन आलेल्या भैया बरोबर मात्र आपण हिंदीतूनच संवाद साधला ! परिस्थिती तेव्हांच बदलते जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो. शिवजयंती निमित्त व्याख्याने, पोवाडे असे विविध कार्यक्रम आयोजित करून शिवजयंती साजरी होण्यापेक्षा कृतीचे आणि विचारांचे आदान-प्रदान करून ती साजरी झाली पाहिजे. नजराणा म्हणून आणलेल्या स्त्रीला महाराजांनी तिची खणा-नारळाने ओटी भरुन तिला घरी पाठवलं ही कृती जनमानसात रुजायला हवी. तरच इतिहासाच्या पानाला वास्तवाची पालवी फुटू शकते. आजच्या दिवसापुरती एखादा विचार मर्यादित न राहता तो विचार फक्त विचार म्हणून न राहता कृतीतून येणं गरजेचं असतं म्हणजे आपण दरवर्षी म्हणतो की स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे,त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे परंतु हे वास्तव आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत नाही कारण वर्तमान पत्र, समाजमाध्यम यांच्यावर स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बातम्या आपण दररोज पाहतो. म्हणजे असा एक दिवस नाही की अशी बातमी आपल्याला ऐकायला ,पाहायला मिळत नाही हे कुठेतरी बदलायला हवं ! कारण आपण जे वेगवेगळे दिन साजरे करतो उदाहरणार्थ चिमणी दिन, पर्यावरण दिन, जलदिन, वन्यजीव संरक्षण दिन, महिलादिन हे दिवस साजरे करण्याची आपल्यावर वेळ का यावी? याचा कुठेतरी विचार होणे गरजेचे आहे कारण स्त्री म्हटलं की अगदी दुर्लक्षित घटक ! अशी सर्वांची मानसिकता बनलेली आहे परंतु या सर्व निगेटिव्ह म्हणजे नकारात्मकतेला आव्हान देऊन स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या त्यांच्या सकारात्मक भरारीला जर का समानतेचे पंख असतील तर त्यांची भरारी ,झेप ही नक्कीच उंचच-उंच जाण्यामध्ये आणखी भर पडेल. समाजामध्ये असलेली समानतेची वास्तव स्थिती बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा झाला असे म्हणता येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा