Login

महात्मा ज्योतिराव फुले

Stricha Uddhar Karta Mahatma jyotirao Phule
स्त्रीचा उद्धार करता 
महात्मा ज्योतीराव फुले 

स्त्रीचा उद्धार करता, स्त्री शिक्षणाचा टाहो फोडणारे पुरुष म्हणून महात्मा ज्योतीरावं फुले यांना ओळखले जाते. जातिबहिष्काराचे असहाय असे दडपण क्रियावान सुधारकांना सोसावे लागले. जिवलग नातेवाईकांचा विरोध सतत होत असे. परिणामी ज्योतीरावांचे वडील गोविंदराव यांनी मुलगा व सुन यांना घराबाहेर काढले. ते माळी समाजाचे असून देखील माळी समाजाने त्यांची नाना प्रकारे अवहेलना चालू केली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन ज्योतीराव व सावित्रीबाई यांची समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. नंतर रास्त पेठेत व वेताळ पेठेत दोन शाळा काढल्या. अस्पृश्यांसाठी शाळा काढली यास त्यांच्या प्रयत्नांना तत्कालीन मोठ मोठ्या विचारवंत समाजसुधारकांचा व राज्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत राहिला. 1852 मध्ये सरकारी विद्याखात्याकडून मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिरावांच्या शिक्षण कार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या काळात हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवा विवाह निषद्ध मानला होता. बालपणी व वारंवार उद्भवणाऱ्या प्राणघातक साथीच्या रोगामुळे पतीनिधन होऊन तरुणपणीच वैधव्य आलेल्यांची संख्या मोठी होती. केशवपन केल्याशिवाय विधवा ही अपवित्र असे. अशा बाल व तरुण विधवांचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरू झालेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीत ज्योतिरावांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा होता. वासनेला बळी पडलेल्या विधवांची फार विटंबना होत होती. गर्भपाताचे प्रयत्न होत. जन्मलेल्या बालकांची हत्याही होई. त्यांना संरक्षण देण्यासाठी फुले यांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. या गृहात अशा स्त्रियांच्या बाळंतपणाची ही सोय केली होती.ज्योतिरावांनी पुढे जो 'यशवंत' नावाचा मुलगा दत्तक म्हणून घेतला तो काशीबाई नावाच्या ब्राह्मण विद्येचा मुलगा होता. विधवांच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी चळवळ उभी केली व त्याकरता न्हाव्यांचा संपही घडवून आणला. अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नालाही त्यांनी तितक्याच मनस्वीपणे चालना दिली. अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही एक अत्यंत गंभीर अशी कायमची समस्या लक्षात घेऊन आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला. महात्मा फुले हे नगरपालिकेचे सदस्य होते समाजाच्या मौलिक परिवर्तनाकरिता समाजरचनेतील धर्मभेद मूलक विद्वेष, जातीभेदमूलक उच्चनीच् भाव, स्त्रीदास्य, हिंदू धर्म संस्थेतील मूर्तीपूजा, संस्कृत भाषेतील कर्मकांड या गोष्टीचे उच्चाटन करून समताप्रधान समाज निर्माण करण्याकरिता व अंधश्रद्धेचे निमुलन करून वैचारिक क्रांती करण्याकरिता सत्यशोधक समाजाची स्थापना फुले यांनी केली. या सत्यशोधक समाजाचे सर्व धर्माचे व जातीचे नागरिक सदस्य व्हावेत अशी योजना केली होती. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या निबंधात फुले यांनी आपल्या समग्र विचारांचे सार असलेल्या 'विश्वकुटुंबबावादाची' सुसंगत मांडणी केली आहे. हा निबंध लिहीत असताना त्यांना पक्षपात झाला होता.अशा विकलांग अवस्थेत त्यांनी हा निबंध लिहून पूर्ण केला. यात स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मूलभूत मानवी मूल्याच्या आधारावर समाज रचना कशी असावी, हे सांगितले आहे. ज्या तत्त्वांच्या आधारावर अमेरिकन राज्यक्रांती व फ्रेंच राज्यक्रांती झाली तीच तत्वे या पुस्तकात भारतीय समाज रचनेच्या संदर्भात मांडली आहे. यात सांगितलेल्या सत्यधर्म हा युटोपियाच होय. जगातल्या मोठमोठ्या सामाजिक व राजकीय क्रांत्या युटोपीयन धैर्यवादाने प्रेरित झालेल्या दिसतात. फुले म्हणतात स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने आता कोणत्याही धर्मातील मतांच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवड निवड न करणारे, या सर्व स्त्री-पुरुषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून वागावे, इतकेच काय, एकाच घरात बौद्ध धर्मी बायको, ख्रिस्त धर्मी नवरा, इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्यधर्मिपुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म होय. यात आर्थिक समता सुचित केली आहे आणि सत्यधर्मी समभाव स्वच्छ रीतीने मांडलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा ' 'मानवतावाद'हा त्यांचा जीवनध्यास होता. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे महाराष्ट्रातील महात्मा ज्योतीरावं फुले पहिले समाज सुधारक होते. ज्योतिरावांनी लोकशिक्षणाला महत्त्व दिले. जुलमी सावकारी विरुद्ध लढा देण्यासाठी पुणे व नगर जिल्ह्यात त्यांनी शेतकऱ्यांचे बंड घडवून आणले. हे बंड खतफोडीचे बंड या नावाने प्रसिद्ध आहे. जुन्नर तालुक्यात त्यांनी शेतकऱ्यांचा पहिला असहकार घडविला. खतफोडीच्या बंडाशी संबंधित व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होय. त्यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर किंग' असे संबोधले जाते. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील चळवळी सुरू झाल्या. दलिततोद्धार चळवळ, कामगार चळवळ, ब्राह्मणेत्तर चळवळ, महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य शिक्षण व समता यावर आधारलेले होते.

©® चैताली वरघट 
मूर्तिजापूर, जि अकोला 

0

🎭 Series Post

View all