Login

सत्यशोधक महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती थोडक्यात मांडलेली आहे
सत्यशोधक
महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले..


समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा वाईट चालीरीती व सत्यधर्मांची महती पटवून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती. समाजातील अनिष्ट परंपरा, अंधानुकरण यातून मार्ग काढण्यासाठी कार्य करण्याचे ठरवून समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि माणुसकी या चतु:सूत्रीवर आधारित संदेश बहुजन समाजाला सांगून समाजातील दुर्बल, वंचित घटकांना त्यांच्या हक्काचे जाणीव करून देण्यासाठी त्यांनी विडाच उचललेला होता. सत्यशोधक समाजाने समाज जागृतीचे कार्य केले त्यामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मागासवर्गीय आणि वंचित घटकांना शिक्षण देणारे सत्यशोधक समाज ही पहिली संस्था होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविली पाहिजे याची ब्रिटिश शासनात जाणीव करून दिली होती. त्यांनी अनाथ स्त्रियांच्या संगोपन, विधवा विवाह, पुनर्विवाह या विषयक जागृती केली होती. सर्वप्रथम महात्मा फुले हे स्वतः मुलींना शिकवण्याचे कार्य करीत होते. ते भारतातील आद्य शिक्षक होत. पण शाळेचा व्याप लक्षात घेऊन त्यांनी मुलींना शिकविण्यास शिक्षिका असल्यास योग्य होईल असे त्यांना वाटे. परंतु मुलींना शिकविण्यास शिक्षका मिळत नव्हत्या. यासाठी महात्मा फुलेंनी आपल्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुलेंना स्वतः शिकवले आणि त्यांना शिक्षिका केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिली शिक्षिका होत. भारतामध्ये बहुसंख्य लोक खेड्यात राहतात. त्यांना तेथे व्यवसायाचे संधी उपलब्ध नसते. म्हणून त्यांच्यामध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण होते. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की ग्रामीण भागात शेतकी आणि ग्रामीण व शहरी भागात व्यवसायिक शिक्षण देण्यासाठी तेथे तांत्रिक शाळा सुरू केल्या पाहिजे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना विविध व्यवसाय करण्याची संधी मिळेल. तसेच शहरी भागातील लोकांनी विविध उद्योगधंदे करण्यास वाव मिळेल. भारतात ब्रिटिशांच्या जोखडातून सोडविण्यासाठी बहुजन समाजातील जनतेला सर्वप्रथम शिक्षण देणे गरजेचे आहे, याची तळमळ महात्मा फुलेंना लागलेली होती. त्यांच्या शिक्षणासाठी इंग्लंडच्या राणीकडे आर्थिक मदतीसाठी मागणी केली. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वस्तीगृहे, मागासवर्गातील शिक्षक, मागासवर्गीय मुलांना व्यवसाय शिक्षण इत्यादीसाठी मागण्या मांडल्या व कार्यास लागले. शिक्षणाद्वारे मागासवर्गीयातील अंधश्रद्धा, दारिद्र, गुलामगिरी, कर्जबाजारीपणा यातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी महात्मा फुलेंनी शिक्षणाचा प्रसार शीघ्र गतीने सुरू ठेवला. इंग्रज राजवटीत शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्यात येत असे. शेतसाऱ्याच्या मोबदल्यात भारतीयांना शिक्षण देण्याची व्यवस्था करावी यासाठी भारतीय समाजात जनमत तयार करण्याचे कार्य आरंभिले होते. 'शिक्षण आणि समाज' या दोन शब्दात महात्मा फुल्यांचे जीवन कार्य साठवलेले आहे. संपूर्ण समाज प्रगती आणि उत्पादनाच्या क्षितिजाकडे वाटचाल करण्यासाठी शिक्षणाची पायाभूत गरज असते. याकरिता विद्यार्जनासाठी धर्माने लादलेली बंधने तोडून स्त्रिया आणि अस्पृश्यांकरिता शिक्षणाचे दारे मोकळी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले भारतीय क्रांतीसुर्य होत. स्त्री दुर्बल घटक शिक्षणाची दारे मोकळी करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. त्यांच्या जीवनाची चतु:सूत्री म्हणजे सदाचार,विवेक, न्यायप्रियता आणि सहिष्णुता होय. बहुजन समाजाला व अस्पृश्यना शिक्षणाचे दारे खुले करण्यासाठी आणि ज्ञानाची गंगा त्यांच्या दारापर्यंत नेण्याचे महान कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. उपेक्षित समाजात शिक्षणाच्या मार्गाने समोर आणण्याचे कार्य त्यांनी केले. ते एक सत्यशोधक समाज सुधारक लोकशिक्षक होते. जनसामान्यांनी त्यांना 'महात्मा' म्हणून गौरविले. ते मानवतावादी होते. महाराष्ट्राचे ते 'मार्टिन ल्युथर' म्हणून संबोधले जातात. तसेच ते भारतातील आद्यशिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मेकॉलेचा पाझर पद्धतीला कडाडून विरोध केला होता. कारण त्यांनी शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पांझरत आले पाहिजे असा विचार मांडला होता. महात्मा फुले यांच्या मते प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण द्यावे नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण द्यावे प्रथम उपेक्षित त्यांना शिक्षण नंतर अपेक्षितांना शिक्षण हे सूत्र अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली होती. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा केला होता. पुणे येथे मुलींची शाळा स्थापन करून स्त्री शिक्षणाचे सर्वोत्तम मुहूर्तमेढ रोवली. मुलींना प्रथम स्वतः शिकविले व मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका मिळत नव्हत्या म्हणून धर्मपत्नी सावित्रीबाई फुलेस स्वतः शिकवून त्यांना शिक्षिका केले. तसेच अस्पृश्यांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा काढल्या होत्या. त्यांनी स्थापन केलेल्या शाळांची संख्या अठरा होती.महात्मा फुलेंनी समाज परिवर्तनाचे कार्य करीत असताना त्यांना स्वतःचे घरदार सोडावे लागले. पण त्यांनी त्याची परवा केली नाही. सत्यशोधक समाजाची स्थापना करून जुन्या रुढीला मूठमाती देण्याचे कार्य आरंभिले होते. त्यामुळे समाज जागृती होऊन समाजात एक नवा विचार संचारत होता. त्यांच्या वेळी काही पुढारलेल्या घराण्यातील मुली वाट चुकून आडवळणाने जात होत्या. त्यांना सरळ मार्गाला लावण्याचे कार्य त्यांनी आरंभिले होते. विधवांच्या बाळाला आशय देण्यासाठी अनाथ बालगृहाची स्थापना केली होती. एकंदर सांगायचे म्हणजे विधवेपासून झालेल्या मुलाला स्वतः दत्तक घेऊन त्यांचे लग्न लावून दिले. आणि एक नवा आदर्श जनतेपुढे ठेवला. त्यांनी तृतीय रत्न हे शीर्षक असलेले नाटक लिहिले त्या नाटकात पंडित पुरोहित धर्माच्या नावावर खोटे प्रलोभन देऊन अशिक्षित लोकांना कसे फसवतात आणि ख्रिश्चन पादरी निष्पक्ष धर्माच्या आधारावर अशिक्षितांना सुद्धा खरे ज्ञान देऊन कसा योग्य मार्ग दाखवतात हे यात दर्शवलेले आहे. आपला बहुसंख्य समाज निरक्षर असून त्यास लिहिता वाचता येत नव्हते हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लक्षात आले होते म्हणून त्यांनी समाज प्रबोधनातून शिक्षणाचा मंत्र 'तृतीय रत्न' या नाटकातून मांडला. यात 'रत्न' चा वापर नेत्र म्हणजेच डोळा या अर्थाने केला असावा. म्हणून शिक्षणाला त्यांनी माणसाचा तिसरा डोळा म्हटले आहे. एक अडाणी अशिक्षित शूद्र पती-पत्नी हे ख्रिश्चन पादऱ्यांचे विचाराने प्रभावित होऊन अशिक्षित व शूद्र जातीच्या लोकांना पंडित पुरोहित कशी लुबाडतात हे त्यांच्याशी लक्षात आले, आणि शिकणे, वाचणे, लिहिणे याचे महत्त्व त्यांना समजले. त्या पती-पत्नीने निर्धार केला की सावित्रीबाई फुले रात्र शाळेत मुलींना, बायांना शिकवण्यासाठी जायचे, अशा प्रकारे त्यांना साक्षात्कार होऊन त्यांचे डोळे उघडले आणि शिक्षण घेण्याची प्रेरणा त्यांच्यामुळे निर्माण झाली अशा प्रकारे शिक्षणरुपी त्यांना तिसरा डोळाच मिळाला, म्हणून महात्मा ज्योतिबांना फुलांनी शिक्षणावर अधिक भर दिलेला दिसून येतो. समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि माणुसकी या चतु:सूत्रीवर आधारित संदेश बहुजन समाजाला सांगून समाजाचे दुर्बल, वंचित घटकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी विडाच उचललेला होता.

©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
0

🎭 Series Post

View all