Login

सुभेदाराची सून (शिवाजी महाराजांच्या गोष्टी)

Subhedarachi Sun

स्वराज्य स्थापनेचा काळ होता आणि स्वराज्य अधिकाधिक वाढवण्यासाठी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सतत मोहिमा काढत असत. त्यातच कल्याणवर स्वारी करण्याचा बेत आखला गेला आणि त्या मोहिमेची जबाबदारी महाराजांनी आबाजी सोनदेव यांच्यावर सोपवली.

“ आबाजी पंत कल्याण प्रांत आपल्या स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो स्वराज्यात आणण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत.” महाराज म्हणाले.

“ महाराज कल्याण म्हणजे विजापूरकरांचा संमृद्ध आणि खूप महत्त्वाचा सुभा आहे.त्यात बरेच गडकोट ही येतात. मुलाना हयाती हा तिथला सुभेदार आहे. मी कल्याण सुभा आपल्या स्वराज्यात सामील करूनच परत येईन.” आबाजी सोनदेव म्हणाले.

“ आम्हाला खात्री आहे आबाजी पंत तुम्ही कल्याण सुभा आपल्या स्वराज्यात सामील कराल. आई जगदंबा आपल्या पाठीशी आहे.” महाराज म्हणाले.

आबाजी सोनदेव यांनी कल्याण मोहीम आखली आणि त्यांनी मावळ्यांना घेऊन कल्याण सुभ्यावर आक्रमण केले. शत्रू पक्षाकडून ही निकराचा लढा देण्यात आला पण त्यांचा लढा अयशस्वी झाला आणि कल्याणचा सुभा आबाजी सोनदेव यांच्या हाती आला. मावळ्यांनी सुभेदार मुलाना हयाती याला बंदी बनवलं. आणि कल्याणचा खजिना लुटला.

मुलाना हयाती याच्या सूनच्या सौंदर्याची चर्चा आबाजी सोनदेव यांनी ऐकली होती. त्याकाळी मुघल आणि निजाम जेंव्हा शत्रूंवर आक्रमण करत तेंव्हा त्यांच्या लेकी बळींना देखील उचलून नेऊन बाटवत असत. लुटीमध्ये स्त्रिया ही अंतर्भूत होत असत. आबाजीला वाटलं की आपण जर महाराजांना कल्याणच्या लुटीबरोबर ही सौंदर्यवाती उपहार स्वरूपत दिली तर महाराज आपल्यावर खुश होतील. म्हणून त्याने मुलाना हयाती याच्या सुंदर सुनेला देखील कैद केलं.

आबाजी सोनदेव कल्याणची लूट घेऊन महाराजांच्या दरबारात पोहोचले आणि ती लूट महाराजांना पेश केली. त्याबरोबर कैद करून आणलेला मुलाना हयाती देखील होताच.

“ वा आबाजी! तुम्ही कल्याणचा सुभा आपल्या स्वराज्यात सामील केलात. आम्ही खूप खुश आहोत. कल्याणच्या सुभेदरपदी आम्ही तुमची नियुक्ती करतो.” महाराज खुश होत म्हणाले.

“ महाराज आणखीन एक अमूल्य भेट आम्ही तुमच्यासाठी कल्याणच्या लुटीत आणली आहे.ती तुमच्यासमोर पेश करण्याची आज्ञा असावी.” आबाजी म्हणाले.

“ आज्ञा आहे. पेश करा अशी काय भेट तुम्ही आमच्यासाठी आणली आहे? दाखवा तरी आम्हाला.” महाराज म्हणाले.

आणि आबाजी सोनदेव यांनी इशारा केला तसं दोन सैनिक एका तरुण मुलीला घेऊन महाराजांसमोर हजर झाले. अगदी केतकीच्या फुला सारखा गोरा रंग, मृगनैनी डोळे, तरतरीत नाक,नाजूक लाल गुलाबाच्या पाकळ्यांसारखी जीवनी, लांब सडक काळेभोर केस आणि नाजूक बांधा. एखाद्या अप्सरेला सुद्धा लाजवेल अशी ती सौंदर्यवती खाली मान घालून थरथर कापत आता आपल्याबरोबर काय गहजब होणार या विचाराने जागीच थिजली होती. आणि तिचे सासरे मुलाना हयाती असह्यपणे खाली मान घालून उभे होते.

“ महाराज ही मुलाना हयातीची सून आहे. हिच्या सौंदर्याची चर्चा सर्व दूर आहे म्हणून आम्ही नजराना म्हणून तुमच्यासाठी हिला घेऊन आलो आहोत.” आबाजी अभिमानाने म्हणाले.

“ वाह किती अप्रतिम सौंदर्य आहे हे; जणू त्या परमेश्वराने यांना घडवण्यासाठी खास वेळ काढला असावा. तुमच्या सौंदर्याची किर्ती आम्ही ऐकून होतो पण आज प्रत्यक्ष तुमचे दर्शन झाले माते.आमच्या आईसाहेब तुमच्या इतक्या सुंदर असत्या तर आम्ही देखील इतकेच सुंदर झालो असतो.” महाराज म्हणाले आणि मुलाना हयाती आणि त्याची सून महाराजांकडे आश्चर्याने पाहू लागले.आबाजी सोनदेव मात्र अचंबित झाला.

“ महाराज तुम्ही….” तो पुढे बोलणार तर महाराज त्याच्यावर कडाडले.

“ खमोश आबाजी पंत! आपण ही लुटीमध्ये यांच्या अशा लेकीबाळी उचलून आणायला लागलो तर आपल्यात आणि यांच्यात फरक तो काय? आमच्यासाठी कोणतीही पर स्त्री माते समान आहे. मग ती शत्रूची सून असली तरी आणि तुम्ही ही लक्षात ठेवा आबाजी पंत अशी गुस्ताखी पुन्हा होता कामा नये. आपण स्वराज्यासाठी लढणारे मावळे आहोत. आपले राज्य हे श्रींचे राज्य आहे. आपण मोहिमा काढतो. गड-किल्ले सुभे आपल्या राज्यात सामील करून घेतो. खजिने लुटतो पण कोणतीही स्त्री या लुटीचा भाग होऊ शकत नाही.स्त्री म्हणजे वस्तू नाही तिला नजराना म्हणून पेश करायला. तुम्ही सगळ्या सरदारांनी हे ध्यानात असू द्या. पुन्हा अशी गुस्ताखी होता कामा नये. सोडा रे यांना.”

ते रागाने बोलत होते. आणि सैनिकांनी मुलाना हयातीच्या सुनेची सुटका केली. ती महाराजांसमोर हात जोडून उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. इतका वेळ खाली मान घालून उभा असलेला मुलाना हयाती त्याचे ही हात महाराजांसमोर आपोआप जोडले गेले.

“ माफी असावी महाराज पुन्हा अशी गलती होणार नाही.” आबाजी सोनदेव हात जोडून म्हणाला.

“ अशी गलती पुन्हा झाली तर परिणाम चांगले होणार नाहीत. कोण आहे रे तिकडे जाऊन शालू-चोळी आणि ओटीचे साहित्य घेऊन या. इतक्या सुंदर माता आज आपल्या दरबारात आल्या आहेत त्यांचा उचित मानपान व्हायला हवा. माते कल्याण सुभ्यातील तीन गावांचा कर आम्ही तुम्हाला साडी-चोळीसाठी बहाल करत आहोत.मुलाना हयाती तुमच्याबरोबर आमचे वैयक्तिक शत्रुत्व नाही. तुम्ही तुमच्या पुत्रवधूला घेऊन जाऊ शकता.यांची ओटी भरून झाली की यांच्यासाठी मेना आणि पालखीची व्यवस्था केली जावी. मुलाना हयाती जिथे म्हणतील तिथे त्यांना सोडून या.” महाराजांनी आज्ञा दिली.

“ या अल्लाह! हमने जैसा सुना था उससे भी बढ़कर पाया आज. दुश्मन की बहू को माँ कहने वाला. उसे सम्मान देनेवाला राजा आज पहली बार देखा.महाराज आपकी माँ बहुत सुंदर होंगी जिसने आप जैसे बेटे को जना. आज आपके सामने ये हयाती मुजरा करता है। आपके पाक मिजाज और नजरने कायल कर दिया आपने हमे। शिवजी महाराज की जय।” तो कृतकृत्य होऊन म्हणाला.

“ या तुम्ही मुलाना हयाती. यांना सुरक्षित सोडून या यांच्या पुत्रवधूसहित.” महाराज म्हणाले.

ही घटना मात्र कायम सगळ्यांच्या काळजावर कोरली गेली. ज्यांनी शत्रूच्या सुनेला देखील माता म्हणून संबोधले. ज्यांच्यासाठी पर स्त्री म्हणजे आई समान होती. ज्यांच्यासमोर शत्रूही नतमस्तक झाला. आशा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

झाले बहु होतील बहु
पण याच्या सम हाच!

जय शिवजी!
जय भवानी!
शब्दांकन
स्वामिनी चौगुले