Login

ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं - भाग -1

Sudya
जलदलेखन स्पर्धा- नोव्हेंबर- 2025


“ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे”  - भाग-1




सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं धनगरीवाडी हे गावं,
लहानसं, शांत, गवताच्या सुगंधाने भरलेलं असं हे सुंदर गावं,
गावातील बहुतेक लोक शेतकरी, गुरं पाळणारे.


आणि त्या गावात होता सुदर्शन पाटील, गावात तो ‘सरपंच सुद्या’ म्हणून ओळखाला जायचा.


स्वभावाने अतिशय उदार, निर्मळ, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा,


रात्र असो… पाऊस असो… भूकंप असो…
सुद्या गरजेला पहिला हजर.
कोणाची गाय हरवली तर शोधून देणारा,
कोणाचं घर पडलं तर विटा उचलून देणारा,


आजारी माणसाला खांद्यावर घेऊन दवाखान्यात पोहोचवणारा.


सगळ्यांना वाटायचं —
“सुद्या म्हणजे देवासारखा.”
पण सुद्याला वाटायचं —
“मी कोण? देव नाही. मी तर त्याने दिलंय ते देतोय.”


सुद्याचं घर साधं होतंं, पण मन मोठ होतंं.


पण माणसांच्या अपेक्षा…
त्या कुठे संपतात?


अनिरुद्ध – सुद्याचा छोटा भाऊ


आई-वडील गेले होते लहानपणीच.
सुद्यानेच भावाला वाढवलं,शिकवलं.


अनिरुद्ध पाटील, हुशार, शिकलेला, पण नितळ मनाचा नव्हता.

नेहमी सुद्याच्या नावावर गर्व करणारा, पण त्याचाच गैरफायदा घेणारा.


गावात शेतीवरून वाद झाला तरी सुद्या मध्ये पडायचा.


सुद्या समजवायचा —
“अण्णा, लोकांचं भलं करायचं. वाद नको."
पण अनिरुद्धच्या मनात एकच गोष्ट –
“माझा भाऊ सरपंच आहे. गाव त्याच्या शब्दावर चालतं.”


लोकांना हळूहळू समजायला लागलं,
की सुद्या जितका चांगला…
अनिरुद्ध तितकाच स्वार्थी.


एकदा अनिरुद्धने गावात नवी बिघाडी केली.

अनिरुद्धने शेजारच्या भिमाकाकांच्या वाडीतलं बाभळीचं मोठ्ठ झाडं तसंच तोडून टाकलं.

भिमाचं म्हणणं,
“झाड माझं.”

अनिरुद्धचं म्हणणं —
“माझ्या बांधावर आलं होतं.”


वाद वाढला.
पोलिस येणार इतका प्रसंग चिघळला.

कोणीही मधे पडायला तयार नाही.
अनिरुद्धचं नाव वाईट…
लोक घाबरलेले.


त्यावेळी सुद्या आला.


त्याने भिमासमोर हात जोडले.

“भाऊ, क्षमा कर. चूक आमच्याकडून झाली."


त्याने स्वतः नवं रोप दिलं.
काही नुकसानभरपाई दिली.
सगळं शांत झालं.

गाव म्हणालं,
“सुद्या देवासारखा. इतका चांगला!”



पण…
अनिरुद्ध?


त्याच्या मनात उलट विचार आला,
“माझं नाव का खराब? मी काय चुकलो? गावाने माझं खऱ्याचं ऐकायला पाहिजे होतं.


सुद्या रोज कुणासाठी ना कुणासाठी काही ना काही करायचाच.


कोणाचा मुलगा दवाखान्यात दाखल करणे,
पाणीटंचाईत विहिरीला मोटर बसवून देणे,
शाळेच्या मुलांसाठी वह्या-पुस्तकं.


पण हळूहळू लोकांना हे सवयीचं झालं.
त्यांच्याकडे अपेक्षा वाढत गेल्या.


आज एखादी मदत केली…
उद्या दुसरा म्हणे – “माझं?” तिसरा म्हणे – “माझं काय चुकलं?”

कुणी कितीही मदत केली तरी
त्यातलं कृतज्ञता कमी,
आणि अपेक्षा जास्त.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सुद्या आणि अनिरुद्धचं नातं कसं असतं ते )
0

🎭 Series Post

View all