Login

सुगंधातील प्रेम १

शरद आणि मृणाल यांची पहिली भेट
भाग १ 

रात्रभर पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात वाऱ्याच्या झोक्याने खिडकीचे चर्र्र आवाज, त्या जुन्या वाड्याच्या गूढपणाला जणू अजूनच गहिरे करत होते. त्या खिडकीपलीकडे बसलेला शरद माडगूळकर हा केवळ एक म्हातारा गृहस्थ नव्हता. तो पूर्वीच्या काळाचा जिवंत अवशेष होता. त्याचा चेहरा जरी वृद्धत्वाने सैलसर झाला असला, तरी डोळ्यांत अजूनही एक ठिपक्याइतकी पण खोल गेलेली चमक होती, जणू काहीतरी शोधत होती, किंवा काहीतरी विसरायला झगडत होती.

त्याच्या हातात घट्ट पकडलेला पिळगट्ट कागदाचा डबा एक साधे भंगार नव्हते. त्यात बंद होती एक सुगंधी आठवण, अत्तराची एक नाजूक, पण अबाधित राहिलेली कुपी. त्या कुपीचा सुवास त्याच्या भूतकाळाचा एकमेव उरलेला धागा होता. त्या सुगंधात होती तिची चाहूल – मृणाल, जी गेल्या चार दशकांपूर्वी अचानक आयुष्यातून निघून गेली होती.

ती कुपी म्हणजे शरदच्या आयुष्यातल्या प्रेमाच्या, विरहाच्या, आणि न संपणाऱ्या प्रतीक्षेच्या काळाची मूर्त आठवण होती. इतरांसाठी ती एक जुनाट बाटली असली, तरी त्यांच्या मनासाठी तो पिळगट्ट डबा एक बंद दरवाजा होता. जो उघडला, तर आठवणींच्या गडद धुक्यांत माणूस हरवून जाई आणि म्हणूनच, दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला, जेव्हा हवा किंचित ओलसर आणि आठवणी जरा अधिक धारदार होत असत, तेव्हा शरद ती कुपी अलगद उघडत असे आणि त्या रिकाम्या झालेल्या तरीही सुगंध देत असलेल्या कुपीतून एक पूर्ण आयुष्य परत अनुभवत असे. कदाचित त्या कुपीच्या आधाराने तो इतकी वर्षे झाली तरी एकांतात जीवन जगत होता.

त्यांने ती कुपी अलगद उचलली. काळसर काच, झाकणाच्या भोवती एक हलकासा सोन्याचा पट्टा, आणि आतील सुवास… वास असा होता, की गतकाळ पुन्हा आठवणींच्या पायघड्या टाकत त्यांच्या श्वासात मिसळून गेला.


त्याने ती कुपी अलगद उचलली, जणू एखादे नाजूक स्मरण आपल्या हातात घेतले होते. ती काळसर काच काळाच्या धुकट आठवणींनी धूसर झाली होती, पण तिच्या झाकणाभोवती असलेला तो सोन्याचा बारीक पट्टा अजूनही हलकासा झळकत होता, एखाद्या जुन्या आठवणीसारखा, जसा दिव्यातील उजळणी वात, काचेच्या काजळीतून देखील तेज देत राहते अगदी तसेच. त्यांने झाकण सावधपणे उघडले. एक मोहक वास त्या क्षणी हवेत दरवळला.

गुलाबाची गंधरेषा, संध्याकाळच्या देवपूजेचा हलकासा गंध, आणि एका हळकुंडासारखी उबदार झळ हे केवळ अत्तर नव्हते, तर जणू एक काळच त्या वासात बंदिस्त होता. त्यांच्या श्वासात तो वास मिसळताच, डोळ्यांपुढे साऱ्याच विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या, मृणालचे पहिले हास्य, त्या टेकडीवरची संध्याकाळ, कवितेच्या ओळी, आणि तिच्या शरीरा भोवती दरवळणारी हीच ओळखीची गंधरेषा. तो काही क्षण नुसतेच बसून राहिला. हातात अत्तराची कुपी, डोळे मिटलेले, आणि मनाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा तिचे अस्तित्व ऐकू येत होते… सुगंधाच्या स्पंदनांतून.
---

१९७८ चा एक हिवाळी दिवस.

शरद नुकतेच एस.पी. कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडले होते. कवितेच्या कार्यक्रमांना जाणे, उशिरापर्यंत चहाच्या गाड्यांवर मैत्रीचे भांडण करणे, आणि सायकलवरून भर उन्हात कॉलेजकडून डेक्कन पर्यंत फिरणे हाच जणु त्यांचा दिनक्रम होता.

त्याच काळात त्यांची भेट झाली होती मृणालशी.

स्थळ होते शनिवारवाड्याच्या मागच्या गच्चीवर आयोजित केलेले एक लहानसे कविसंमेलन आणि वेळ होती कदाचित संध्याकाळची पाच सव्वा पाचच्या दरम्यानची. सूर्य मावळतीला चाललेला. गच्चीत पसरलेला गारवा आणि चहाच्या कपातून निघणारी वाफ सगळीकडे दरवळत होती.

शरद एका कोपऱ्यात उभा राहिला होता, हातात कवितेची वही गच्च पकडली होती. सगळीकडे अनोळखी चेहरे. त्या गर्दीत एक मुलगी शांतपणे एका बाकावर बसलेली होती — मृणाल.

मृणाल (हसून):"तुम्हीही कवितेला आलात ना? की गोंधळून आलात?"

शरद (थोडा गडबडून): "हो… म्हणजे... आलो. कविता ऐकायला. पण… थोडं घाबरलोय खरं तर."

मृणाल (थोडं सरसावत):"कविता घाबरायला लावतात? नक्की काय?  की कविता वाचायची आहे, म्हणून?"

शरद (लाजून):"दोन्ही. लिहितो थोडे. पण आज पहिल्यांदाच… असे लोकांसमोर…"

मृणाल (कौतुकाने पाहत):"वा! पहिले वाचन? मग तर हे ऐकणे आलेच. नाव काय सांगितलं नाहीत?"

शरद (नमस्कार करत): "शरद. शरद माडगूळकर. तुम्ही?"

मृणाल : "मृणाल. मृणाल देशपांडे. मी ऐकायला आलेय. लिहित नाही, पण कविता ऐकायला आवडतात. विशेषतः अशा बावरलेल्या नवख्या कवींच्या."

शरद (थोडं हसून, पण अजून संकोचाने):"तुम्ही एवढे सहज बोलता… मला तर शब्द सापडेनात इतकी गर्दी बघून."

मृणाल (थोडं डोळे मिचकावत):"शब्द सापडायला हवेत, शरद. शेवटी कविता म्हणजेच हृदयाचे शब्द. आणि ते तर मनात आधीच असतात, नाही का?"

शरद:"पण… कविता लिहिताना जी शांतता वाटते, ती असे… इतक्या लोकांसमोर तुटून जाते की काय असे वाटते."

मृणाल (गंभीरपणे):"काही वेळा शांतता फक्त स्वतःसाठी असते, पण काही शब्द अशा गर्दीत जास्त बोलतात… जर तुम्ही मनापासून लिहिले असेल, तर इथे कुणीही ओळखीचे नसले तरीही ते प्रत्येकाच्या मनात समजून घेतले जाते."

शरद(हलकसं हसून):"तुम्ही इतके समजून बोलता, की असे वाटते… कविता मी वाचायला लागायच्या आधी तुमच्याशी बोलत रहायला हवे"

मृणाल (हसत): "बोलूच की. कवितेनंतर चहा घेऊया. आणि… आणि  तुमचे अत्तर खूप छान आहे."

शरद (गोंधळून):"माझे…? नाही, माझ्याकडे नाही. पण… तुमच्याकडून एक मंद गंध येतोय. खूप ओळखीचा वाटतो. पण ओळखता येत नाही."

मृणाल(डोळे थोडेसे लाजवत): "हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. पण मी याचे उत्तर कधीच स्पष्ट देत नाही…"

शरद (हसून): "का?"

मृणाल (संथ स्वरात): "कारण काही गंध हे शोधत जावे लागतात… ते सांगून समजत नाहीत."

क्रमशः

©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५

0

🎭 Series Post

View all