भाग ३
संध्याकाळचे साडेसहा वाजले होते, तुळशी बागेतील राम मंदिरामध्ये शांत घंटा नाद सुरू होता. आजूबाजूला संध्याकाळच्या आरतीची तयारी सुरू होती. हळुवार वाऱ्याच्या झुळकीत दोन हृदय अखेरचा संवाद साधत होती. शरद आधीपासूनच मंदिराच्या बाहेर असलेल्या कठड्यावर बसला होता. मृणाल हळूहळू चालत आली. तिच्या डोळ्यात ओल होती, डोळे लालबुंद झाले होते, जणू काही ती पूर्ण दिवस रडत होती. तिच्या चेहऱ्यावर गंभीर शांतता पसरली होती.
शरदने हसण्याचा प्रयत्न केला, "मी विचार केला होता की आज काही कविता वाचायला नको, फक्त तुझ्या नजरेतून समजून घ्यावे लागेल सगळे"
मृणाल हळू स्वरात उद्गारली "शब्द हेच कधी कधी जास्त दुखवतात शरद, म्हणूनच मी आज गप्प आहे"
"डोळ्यातले पाणी जास्त बोलतय आज, काय सांगणार आहेस मृणाल", शरद हळूच म्हणाला
मृणालने डोळे खाली केले, दोघे मंदिराच्या बाहेर एका कठड्यावर बसले.
मृणाल श्वास आवरत म्हणाली, "शरद बाबांनी माझे लग्न ठरवून टाकले, बोलणे झाले, सगळे ठरले, आता काहीच राहिले नाही"
शरद काही क्षण शांत झाला "म्हणजे आपण दोघे"
मृणाल नजरेतून थेट पहात म्हणाली, "शरद मी तुला कधीच विसरणार नाही, पण तुला गमावण्याशिवाय माझ्या हातात काहीच नाही."
शरदचा चेहरा शांत झाला पण डोळ्यात धग दिसत होती.
"आपल्यातले प्रेम खरे होते ना?"
मृणाल डोळ्यातून अश्रू ढाळत, "हेच तर त्रास देत आहे, खरे आहे म्हणूनच आता वेगळे होणे अशक्य वाटत आहे."
मंदिराच्या घंटा वाजू लागल्या दोघे क्षणभर शांत उभे राहिले, वाऱ्याची झुळूक त्यांच्या श्वासात मिसळली.
शरद: पण तू अशी कशी मला सोडून जात आहेस मी येऊ का तुझ्या घरी?
मृणाल: त्याचा काहीही उपयोग होणार नाही शरद, मी त्यांच्याशी बोलली नसेल असे वाटते का तुला?
शरद: मग आपण पळून जाऊ, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत की मी तुला कुठल्या चांगल्या ठिकाणी घेऊन जाईन, पण तुला जास्त त्रास होऊ देणार नाही हे मात्र नक्की.
मृणाल: पळून जाणे हे उत्तर नाही. आपण दोघे आनंदित होऊ शकू पण आपल्या घरच्यांचे काय? माझ्या नंतर माझ्या दोन बहिणी आहेत त्यांचे भविष्य यामुळे अंधारात जाईल.
शरद: तू इतरांचा विचार का करतेस. मी नंतर सगळे व्यवस्थित करायचा प्रयत्न करेन, सध्या आपण पुणे सोडून गेलेलेच बरे.
मृणाल: नाही शरद, तुला वाटेल की मी तुला फसवत आहे, पण मी हे करू शकत नाही. माझ्या आनंदासाठी मी कुटुंबाला काहीही त्रास होऊ देणार नाही.
शरद: याचा अर्थ तू सगळे आधीच ठरवले आहेस, मग मी काय म्हणणार.
मृणाल: तू मला माझ्या या निर्णयात सहकार्य करशील ना.
शरद: आणि तू, तू मला सोडून राहू शकशील.
मृणाल: रहावेच लागेल, आता पुढे आपली भेट कधीच होणार नाही. तू देखील कधी प्रयत्न करू नकोस.
शरद: ठीक आहे, जशी तुझी मर्जी, पण जर तू कधीही मागे वळून पाहिलेस तर मी तिथेच असेन. मला कधीही आवाज दे मी असेल तसा तुला भेटायला येईन.
त्याने तिच्या हातावर हलका स्पर्श केला, पण मृणालने लगेच हात मागे घेतला.
शरद संथ आवाजात पुढे बोलत राहिला, "जा मृणाल, तू तुझ्या वडिलांचे शब्द पाळ, पण आपले प्रेम तुझ्या मनात जपून ठेव, मी माझ्या कवितेत त्याला नक्कीच जपीन.
"शरद मी तुला कधी विसरणार नाही आणि कदाचित पुढच्या जन्मात कधीतरी......." मृणाल अश्रू पुसू लागली.
"मी तुझी वाट पाहत बसेन" शरद उसने हास्य आणून म्हणाला.
मृणाल हलकेसे हसली, पण डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. ती वळली आणि न बोलता मंदिराच्या बाहेर निघाली. शरद तसाच बसला होता. शांत पण आतून कोसळलेला मंदिरात आरती सुरू झाली होती.
त्या दिवसापासून शरदने तिला गमावले, पण ती कायम त्याच्यात होती. तिच्या आठवणी तिचा गंध आणि त्या राम मंदिरात झालेला शेवटचा संवाद कायमचा त्याच्या मनात साठवून ठेवलेला होता.
शरद भानावर आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शरदने रेल्वे पकडली. सातारा स्टेशनावर उतरल्यावर एक रिक्षा घेतली आणि अरोरा वृद्धाश्रमात पोहोचला.
तेव्हा सूर्य थोडासा कललेला होता. वाऱ्याच्या झुळकीत उन्हाची सोनसळी रेषा उभी होती. वृद्धाश्रमाच्या अंगणात मृणाल एक झोपाळ्यावर बसलेली होती. केस पांढरे, चेहऱ्यावर सुरकुत्या, पण डोळ्यात तोच ओळखीचा गहिवरलेला भाव दिसत होता.
शरद काहीच बोलला नाही.
त्याला पाहताच तिने एक मोहक हास्य दाखवले.अगदी पूर्वीसारखे नसले तरी त्यात शरदला आनंदी करण्याची ताकत होती.
फक्त त्याने एक नवीन अत्तराची कुपी तिच्या हातात ठेवली, अगदी तसाच सुवास देणारी आणि त्याच दुकानातून घेतलेली, "नीलकंठ अत्तर भंडार".
ती हसली… तेवढेच त्याला पुरेसे होते. आणि काही मिनिटातच मृणालने बसल्या जागी जीव सोडला. अगदी शांतपणे जसे काही तिच्या मनाची तृप्ती झाली होती. शरद तिच्या जवळच होता. शेवटच्या क्षणी तिच्या ओठांवर एकच वाक्य आले.
"आपल्या प्रेमाचा साक्षीदार हाच मंद सुवास…"
शरद त्या दिवशी त्यांच्याकडची जुनी कुपी देखील तिच्या हातात ठेवून आला. तिच्या डाव्या हातात.
ती कुपी तिच्या सोबत गेली.
---
आज, शरद त्या वाड्याच्या खिडकीजवळ पुन्हा बसलेला आढळला. हातात तोच डबा. डब्यात त्या अत्तराच्या कुपी ऐवजी रिकामेपण, तरीही त्याला देखील एक मंद वास होता.
त्याने तो उचलला, नाकाजवळ नेला, आणि अलगद डोळे मिटले.
अजूनही त्याला तिचा सहवास जाणवत होता. अजूनही मृणाल त्याच्या श्वासात होती.
समाप्त
©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५
जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा