Login

सुई आणि धागा 1

कथा एका स्त्रीची
सुई आणि धागा

"आई, अगं आपण एक एक धागा जसा जोडावा तसे नाती जोडली आहेत. कितीही संकटे आली कितीही काहीही झाले तरी आपण कोणतंही नातं तोडलं नाही. नात्यातून आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपण त्या नात्याला घट्ट पकडून एक वेल जोडली आहे; पण ही आत्ता आलेली आणि हिने त्या बेबी आत्याला असे का बोलावे? परवा पण त्या सुनू आत्याला ही काही बाही बोलली. असे करून एक एक नाते दुरावेल ना? ही तर अगदी सुईने धागा उसवावा तशी एक एक नाते बाजूला करत आहे. अशाने आपण एकटे पडू." रोहन नेहमीप्रमाणे त्याच्या बायकोची तक्रार त्याच्या आईकडे करत होता.

"हे बघ बाळा, धागा हा सुईमध्ये ओवूनच शिवावा लागतो. उसवलेले शिवताना फक्त धाग्याचा वापर होत नाही तर त्याला सुई देखील तितकीच गरजेची आहे, नाहीतर त्या सर्व धाग्यांचा गुंता होऊन जातो." रोहनची आई रोहनला समजावून सांगत होती.

"पण आई, अशाने सगळी नाती बाजूला जातील ना? तू तिला समजावून सांग. काही ठिकाणी आपण थोडसं माघार घेतलेलं कधीही चांगलंच. उगीच अहंपणा करून काही उपयोग नाही. अशाने सगळे नाते दूर राहतील." रोहन पुन्हा म्हणाला.

*********
रोहन आणि श्वेता यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती. तसे त्यांचे अरेंज मॅरेज. तसे बघून करून त्यांनी लग्न केलं होतं. रोहनच्या आईच्या माहेरची मंडळी असल्यामुळे त्यांनी लगेच पसंती दर्शवली आणि त्यांचे अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. रोहन आणि श्वेताचे जेव्हा लग्न झाले तेव्हा ते सर्वजण भाड्याच्या घरात राहत होते. लग्न झाल्यावर सुरुवातीलाच त्या दोघांनी पहिल्यांदा आपले स्वतःचे हक्काचे घर घ्यायचे असे ठरवले होते. त्यानुसारच श्वेता सुद्धा लगेचच नोकरीला लागली. त्या दोघांचा पगार आणि थोडेसे कर्ज घेऊन त्यांनी अगदी दोनच वर्षात स्वतःचे हक्काचे घर घेतले. त्याचा आनंद त्या सर्वांना झाला होता. त्यानुसारच आज त्या घराची वास्तुशांती होती. अगदी जवळच्याच पाहुण्यांना त्यांनी आमंत्रित केले होते. खूप गर्दी करून मोठ्याने हा सोहळा करण्यापेक्षा अगदी छोटसं पण व्यवस्थित रीतसर हा सोहळा करावा अशी त्या दोघांची इच्छा असल्यामुळे रोहनच्या आई-बाबांनीही त्याला संमती दिली, शिवाय त्यांचे म्हणणे होते की खूप नातलग बोलावून हा सोहळा केला की खूप खर्च होईल त्यापेक्षा बजेटमध्येच हा सोहळा करूया, त्यानुसार हा सोहळा करण्याचे ठरले.

अगदी जवळचे म्हणता म्हणता शंभर लोक गोळा झाले. एकाला सांगून दुसऱ्याला नाही कसे म्हणायचे असे रोहनचे बाबा म्हणू लागले, त्यामुळे रोहनच्या नातलगांपैकी जवळपास बऱ्याच लोकांना सांगण्यात आले आणि श्वेता मात्र अगदी थोड्याच लोकांना बोलावली होती. त्यामध्ये त्या दोघांच्या ऑफिसची मंडळी इतकेच होते. मित्र-मैत्रिणींना इतर वेळी बोलावून एक छोटीशी पार्टी करण्याचे त्यांनी ठरवले होते. रोहनच्या बाबांना सख्खी एकच बहीण होती आणि चुलत मात्र पाच बहिणी होत्या, शिवाय त्यांचे सख्खे चुलत भाऊ असे मिळून एकूण पंधरा जणांचं भाऊ-बहिणींचं कुटुंब होतं. त्या सर्वांना आमंत्रित केले होते.

रोहन, श्वेता आणि रोहनचे आई-बाबा असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. रोहन हा त्याच्या आई-बाबांचा एकुलता एक मुलगा होता. असे चौकोनी कुटुंब अगदी गुण्यागोविंदाने राहत होते. आज वास्तुशांत असल्याने श्वेता बरीच नटली होती. तिच्या लग्नानंतरचा हा पहिला इतका मोठा कार्यक्रम होता. आज स्वतःच्या हक्काच्या घरात जाणार हा आनंद वेगळाच होता, शिवाय लग्नानंतरचा पहिला कार्यक्रम त्यामुळे ती खूप नटली होती.

हळूहळू एकेक पाहुणे कार्यक्रमासाठी येऊ लागले होते. श्वेताने त्यांच्या आदर सत्कारामध्ये कोणतीच कसूर सोडली नव्हती. ती प्रत्येकाचे अगदी अगत्याने स्वागत करत होती. रोहन देखील तिच्या सोबतच होता. त्यांनी पूजेसाठी आई-बाबांना बसवले होते आणि पाहुण्यांचे मानपान ते दोघे पाहत होते. प्रत्येक जण आत येताना त्या दोघांचे कौतुक करत होते. घरही तितकेच छान असल्यामुळे प्रत्येकांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. बेबी आत्याही तिच्या मिस्टरांसोबत आणि दोन मुलींसोबत तिथे आल्या होत्या. सर्वांच्या छान गप्पा रंगल्या होत्या. खूप दिवसांनी सर्वांची भेट झाली असल्याने प्रत्येक जण एकमेकांची विचारपूस करत होते आणि शेवटी कार्यक्रमास व्यवस्थितपणे सुरुवात झाली.

🎭 Series Post

View all