Login

सुख आले माझ्या दारी - भाग १

एका मुलीला नव्याने प्रेम मिळते

सुख आले माझ्या दारी - भाग १

अनु आज घरात शिरली तीच खूप खुशीत चक्क "एकाच ह्या जन्मी जणू" हे गाणं गुणगुणत. तिचा आजचा मुड काही न्याराच होता. उषा, अनुची आईही तिच्याकडे पहातच राहिली. आज दोन वर्षांनी ती इतक्या खुशीत होती. उषाने काही काळ तिला त्या धुंदीत राहू देणं पसंत केलं कारण तिला माहित होतं की दिवसभरात काय झालं ते रोज रात्री ती तिला न चुकता सांगतेच. आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उषा हरखून गेली. दोन वर्ष एव्हढा मोठा काळ अनुने स्वतःला एका कोषात गुरफटून घेतलं होतं. ती जास्त कोणाशी बोलायची नाही की कोणात जास्त मिक्स व्हायची नाही. तीचं जग म्हणजे फक्त ती आणि तिची आईच होती. अर्थात त्याला कारणही तसेच होते.

उषाला तो दिवस आठवला जेव्हा अनुने येवून तिला सांगितले होते की सागरला तिच्याशी लग्न करण्यात आता काही स्वारस्य वाटत नाही. उषाच्या पायाखालची जमीनच सरकली. एक तर उषाचा संसार आधीच मोडला होता. तिचा नवरा संजय आणि ती दोघं अनु लहान असतानाच विभक्त झाले होते. अनुच्या बालमनावर विपरीत परिणाम होवू नये म्हणून तिने तिला तिचे बाबा बोटीवर नोकरी करतात असे सांगितले होते. अर्थात अनु मोठी झाल्यावर तिने खरं काय ते सांगितलं होतं. उषाची नोकरी चांगली होती म्हणून ती एकाकीपणे अनुला उत्तम रीतीने वाढवू शकली त्यात तिला सांभाळणाऱ्या शैला ताईंचा मोलाचा वाटा होता. उषाला वाटले जे आपल्या वाट्याला एकाकीपण आले ते आपल्या लेकीच्या वाट्याला तरी येवू नये.

अनु आणि सागरचा प्रेमविवाह होणार होता. ते दोघं एकाच ऑफिस मध्ये कार्यरत होते. दोघेही एकमेकांना अनुरूप होते. एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांना कळलंच नाही. आणि मग एका सुंदर संध्याकाळी ती आणि सागर फिरायला गेलेले असताना सागर एकटक पहात होता. ती खूपच देखणी दिसत होती. निमगोरा वर्ण, सरळ रेशमी पाठीवर मोकळे सोडलेले केस, काळेभोर तेजस्वी डोळे. त्याची नजर तिच्यावर हटतच नव्हती. अनु त्याच्याकडे पाहत म्हणाली,

"आज मी काही वेगळी दिसते का. असं का पाहतो आहेस?"

"अनू अजून आपण किती दिवस असंच फिरायचं आहे. तू माझ्या घरी कधी येणार आहेस?"

"अरे तुझ्या घरी मी कितीतरी वेळा आले आहे. आज तुला झाले तरी काय?"

"अगं तू आता कायमची माझ्या घरी कधी येणार आहेस?. आपण आता लग्न करायला हवं. मी आजच माझ्या घरी सांगणार आहे. तू पण सांग. तुझ्या आईला आनंदच होईल."

दोघांनी आपापल्या घरी सांगितले.सारं काही आलबेल असल्या मुळे विरोध होण्याचं कारणही नव्हतं. लग्न ठरलं. अनु आणि सागर एकमेकांच्या घरी आता भावी जावई आणि भावी सून या नात्याने जावू येवू लागले. विधिवत दोघांचा साखरपुडा झाला. दरम्यान सागरला अमेरिकेहून चांगली जॉब ऑफर आली म्हणून लग्न तिथे स्थिरस्थावर झाल्यावर करण्याचे ठरले. सागर अमेरिकेला गेला. दोघानाही विरह सतवत होता. तशा आशयाचे दोघांचं ऑनलाईन बोलणं होवू लागलं. अनुला इथेच असल्या मुळे सागर बरोबर घालवलेले क्षण प्रकर्षाने आठवत होते . सुरुवातीला सागर कडूनही असा प्रतिसाद येत होता. कालांतराने त्याच्याकडून येणारा प्रतिसाद जुलुमाचा राम राम वाटू लागला. अनुला त्याच्या वागण्यातील बदल जाणवला तिने एक दिवस त्याला विचारलं,

"सागर तुला काही टेन्शन आहे का? व्हिडिओ कॉल वर माझ्याशी हल्ली पूर्वीसारखा बोलत नाहीस. काय असेल तर सांग मी तुला नक्कीच मदत करेन."

"अग तसं काहीच नाही गं. काम खूप असतं म्हणून बोलायला वेळ मिळत नाही. घरी आल्यावर खूपच दमून जायला होतं. बाकी काही नाही."

एक दिवस अनु ने सागरला लग्ना संबंधी विचारले असता तो पळपुटा सरळ म्हणाला,

"अगं आता मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही. तुला तर माहिती आहे आपण दोघांनी भावी जीवनाची किती स्वप्नं पाहिली आहेत. परंतु माझ्या आईला आता तुझा स्वभाव आवडत नाही. मी आईच्या मनाविरुद्ध लग्न नाही करू शकत." अनुला कळेच ना की तिच्या स्वभावात न आवडण्या सारखं काय आहे. त्याच्या आईला तर आधी ती खूप लाघवी आणि समंजस वाटत होती. ती कधीही त्याच्या घरी गेली की त्याची आई तिच्याशी खूपच मनमिळाऊपणे वागत होती. खरं तर अनु खरं खोटं करू शकत होती. पण तिने विचार केला की ज्याच्या बरोबर आपल्याला उभा जन्म घालवायचा त्याचा जुलूमाचा रामराम हवाय कशाला. असे लग्न करून तो किंवा मी कोणीच सुखी होणार नाही. म्हणून ती त्याच्या मार्गातून दूर झाली .