#कौटुंबिक कथालेखन
सुख आले माझ्या दारी - भाग २
आपल्या मुलीची ही मनःस्थिती पाहून उषा हतबल झाली. सागरची आई शालिनी आणि त्याचे बाबा श्रीकांतराव दोघेही सारासार विचार करणारे होते. सागरचे बाबा कामानिमित्ताने उषाच्या ऑफिसमध्ये येत जात असत. ते नेहमी अगत्याने उषाची विचारपूस करायचे. सागर चांगल्या कुटुंबातील मुलगा होता. बहुतेक अनुचा काहीतरी गैरसमज झाला असा म्हणून ती तिला म्हणाली,
"अनु तू अशी हार मानू नकोस. आपण सविस्तर बोलूया सागर आणि त्याच्या घरच्यांशी. नक्की काय झालंय ते आपण जाणून घ्यायला हवं. सागरच्या आई शालिनीताई असं वागतील असं वाटत नाही." या गोष्टीला अनुने स्पष्ट नकार दिला आणि त्यानंतर तिची कळी खुललीच नाही. सागरला अमेरिकेत तिथेच राहणारी एक मुलगी आवडायला लागली होती आणि त्याने तिच्याशी लग्न केलं. खरं सांगण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती . अनुच्या मनात आलं हे सर्व लग्न झाल्यावर झालं असतं तर आपण काय केलं असतं. अनुला सागर असं कधी वागेल असं वाटलच नाही. मुलगा किंवा मुलगी कोणीही प्रेमाला इतकं हलक्यात घेवू नये. प्रेम ही एक अखंड निभवायची निखळ भावना, बंधन असते. मनात आलं की ते झुगारून टाकणारा प्रेम करण्याच्या लायकीचा नसतो.
म्हणूनच दोन वर्षांनी का होईना अनुत झालेला हा बदल उषाला खूप सुखावून गेला. रात्री दोघी निवांत बसल्या असताना अनुने तिला अजय बद्दल सर्व सांगितलं. अजय गेल्या पाच सहा महिन्यांपासून अनुच्या बस स्टॉप वर बस पकडत होता. खरं तर अजय अनुच्या कॉलेज मध्येच होता. त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं जे त्याने कधीच व्यक्त केलं नव्हतं. अजय कायम अनुच्या नकळत तिला न्याहाळत असायचा. त्याच्या लक्षात आलं होतं की ही मुलगी खूप दुखावलेली दिसतेय. त्याला ती खूप आवडायची पण ती कधीच इथे तिथे पाहत नव्हती. एक दिवस अजय पुढे येवून अनुला म्हणाला,
"हाय अनू तू मला ओळखलं नाहीस का? मी तुझ्या कॉलेजमध्येच होतो. बरेच दिवस तुला बस स्टॉप वर पाहतोय." अजयने स्वतःची ओळख दिली तरी अनुने एक हलके हसू देवून पुढे बोलणं टाळलं. असेच एक दिवस खूपच गरमीमुळे अनुला बस स्टॉपवर भोवळ आली. तेव्हा रांगेत उभ्या असलेल्या अजयने तत्परतेने तिला पाणी दिलं. ती ते प्यायला तयारच नव्हती तेव्हा तो तिला म्हणाला,
" तू आता हे पाणी प्यायलं नाही तर तुला हॉस्पिटल मध्ये न्यावं लागेल." तेव्हा तिने ते पाणी घेतलं. त्याला थँक्यू म्हटलं. अजयला वाटलं की आता ती आपल्याशी बोलायला लागेल. पण छे! अनु कडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा त्याने एक दिवस एक कागद अलगद तिच्या पर्सला चिकटवला ज्या वर लिहिले होते "प्रत्येक पुरुष हा फुला मधील मकरंद संपल्यावर दुसऱ्या फुलाकडे झेपावणाऱ्या भुंग्यासारखा नसतो तर काही दीपस्तंभासारखे स्थिर आणि अंधार दूर करून कायम आधार देणारे असतात". अनुला वाटले की ह्याला आपण काहीच न सांगता कसं काय कळलं. पण त्याच्या ह्या विचारांमुळे ती प्रभावित झाली. हळू हळू ती त्याच्या कडे पाहून हसू लागली. अजयने ठरवलं की हिला बोलतं केलं पाहिजे. उषाला पण अनुच्या वागण्यातील बदल दिसत होता.
अनु मात्र खूप सावधपणे वागत होती. अजयने तिच्या मनात शिरकाव केला असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा त्याने संध्याकाळी तिला भेटायला सांगितलं. नंतर ते वरचेवर भेटत गेले तेव्हा त्याला अनुने सारं काही सांगितलं. त्याला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला,
" मी तुझ्या आईशी बोलतो. त्यांची परवानगी असेल तर मी तुला माझ्या घरी नेईन. माझे आई-बाबा खूपच उदारमतवादी आहेत. त्यांना तू नक्कीच आवडशील." अजय असं बोलला म्हणूनच आज अनु घरात शिरली ती वेगळ्याच खुशीत. तिला तिचा दीपस्तंभ मिळाला होता. जिच्या जीवनातील आनंद हिरावला गेला होता तिला जीवनगाणे प्राप्त झाले होते.
उषाने मनोमन देवाचे आभार मानले. तिने देवापुढे साखर ठेवली. दुसऱ्याच दिवशी अनु अजयला घरी घेवुन आली. पाहता क्षणीच उषाला त्याच्या डोळ्यातील विश्वास दिसला आणि खात्री पटली की हा आपल्या लेकीला आयुष्यभर सुखी ठेवेल. अनुला वाटलेच नव्हते की आपल्या आयुष्यात पुन्हा हे सुख येईल. अनुच्या मनात आलं खरं प्रेम ओळखणे आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी आकर्षणाला प्रेम समजले जाते आणि फसगत होते. खरं प्रेम कोणत्याही परिस्थतीत शेवट पर्यंत साथ निभावतं अगदी आयुष्यात आलेल्या मोहाच्या क्षणांवर मात करून.हल्ली खूप जणांचे प्रेम जुळते पण काही काळानंतर 'ब्रेकअप ' होतं जे खूपच कॉमन झालंय. त्यात कोणाला काही वावगं वाटत नाही . अनुला मात्र मनापासून वाटत होतं की प्रेम हे एक पवित्र बंधन आहे. प्रेम म्हणे आंधळं असतं. पण त्यातील खाच खळगे ओळखून समोरच्या व्यक्तीला पूर्ण जाणून विवाह करणे योग्य आहे . अनु सारख्या हळव्या व्यक्ती ला योग्य वेळी कोणाची साथ मिळाली नाही तर अशी व्यक्ती कधीच आनंदी जीवन जगू शकत नाही. जे बिनधास्त व्यवहारी असतात ते मात्र 'तू नही तो और सही' बाण्याने पुढे जातात.
अजयच्या घरी अनुचं खूपच प्रेमाने स्वागत झालं. आई-बाबा तिला आशीर्वाद देत म्हणाले, "अनु तू तुझ्या माहेरी असल्यासारखंच इथे वागायचं. तू आमची मुलगीच आहेस लक्षात ठेव. काय हवं नको ते अगदी हक्काने सांगायचं." अजयची लहान बहीण नीताला तर तिला एक मैत्रीण मिळाली म्हणून खूपच आनंद झाला. अनुला आपल्या आयुष्यात हा दिवस येईल असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणून मनमन देवाचे आभार मानत म्हणाली, 'या सुखांनो या'.
समाप्त
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा