सुख म्हणजे नक्की काय असतं. भाग - १
"ए उठ इथून, आजपासून तू माझ्या नजरेसमोर यायचं सुद्धा यायचं नाही. लग्नाला चार दिवस झाले नाही तर माझ्या मुलाला गिळून बसली. आमचंच चुकलं, तुला या घरात सून म्हणून आणायलाच नको होतं. जन्म झाल्या झाल्या आई गेली आणि लग्न झाले नाही तर नवरा गेला. अपशकुनी कुठची." आरतीच्या सासुबाई वनिता आरतीला बडबड करत होत्या आणि ती बिचारी एका कोपऱ्यात बसून निमूटपणे ते ऐकत होती. तिच्याकडे दुसरा पर्याय तरी काय होता म्हणा.
"आरतीचा जन्म झाला तेव्हाच तिची आई हे जग सोडून गेली. त्यानंतर आरतीच्या बाबांनी नामदेव रावांनी तिचा सांभाळ केला पण आरती एवढी लहान होती की तिला आईचीच गरज होती म्हणून तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या बायकोने म्हणजेच मीनाने आरतीला छान सांभाळलं पण फक्त तिला मुलगा होईपर्यंत. आरती आठ वर्षांची असताना तिच्या सावत्र आईला मुलगा झाला आणि तिथूनच आरतीच्या आयुष्याची फरपट चालू झाली.
आरती शाळेत जात होती पण फक्त नावालाच. घरी आलं की घरातली सगळी कामं त्या एवढ्याशा जिवाला करावी लागत होती. तिची सावत्र आई मीना फक्त दोन्ही वेळचं जेवण काय ते बनवायची, बाकी सगळी कामं आरती कडून करून घ्यायची. शाळेला सुट्टी असली की आरतीला शेतात जळणासाठी लाकडं आणायला सुद्धा जावं लागायचं. आरतीच्या बाबांना हे सगळं दिसत होते पण ते मीनाला काहीच बोलत नव्हते. तिला काही बोलायला गेलं तर ती मुलाला घेऊन निघून जाईल. याची भिती त्यांना होती.
आरतीचा सावत्र भाऊ पारस याला सुद्धा आरतीच सांभाळयची. त्याला तिचा लळा लागला होता पण तो सुद्धा जसा मोठा होत गेला तसं आरती बरोबर तुच्छतेने वागू लागला. त्याने तिला कधी बहिण समजलेच नाही. आरतीला आपल्याच आई वडिलांच्या घरात मोलकरणी सारखी वागणूक मिळत होती.
तिच्या बाबांना ते सहन होत नव्हते. म्हणून कसं बसं तिचं बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि तिचं लग्न सुहास सोबत लावून दिलं. सुहास शेती करत होता पण घरची परिस्थिती चांगली होती. त्याचे आई बाबा पण तेव्हा चांगले वाटत होते पण लग्नाला चार दिवस झाले आणि सुहासचा ॲक्सिडंट मध्ये जागीच मृत्यू झाला. त्यामुळे परत आरतीच्या वाट्याला दुःखच आले.
आज तिच्या नवऱ्याला जाऊन पंधरा दिवस झाले होते पण या पंधरा दिवसांत आरतीला नाही नाही ते ऐकून घ्यावे लागत होते. तिच्या सासुबाईंनी बाबांना तिला त्यांच्याकडे घेऊन जायला सांगितले पण त्यांनी सरळ नकार दिला. आता आरतीला माहेरही नव्हते आणि सासरही असून नसल्यासारखे होते. सासरे रघुनाथ तसे बरे होते पण त्यांचंही सासुबाईंच्या पुढे काही चालत नव्हते. त्यात तरणा ताठा मुलगा गेल्यामुळे ते खुप दुःखी होते आणि खचले सुद्धा होते. ते आपल्याच विचारात मग्न असायचे. आताही सासूबाईंच्या बडबडीने ती एका कोपऱ्यात बसून रडत होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा