कथेचे शिर्षक: सुखाचा काळ
विषय: बालपण देगा देवा
स्पर्धा: गोष्ट छोटी डोंगराएवढी
दिवाळीच्या दोन तीन दिवस आधी मामींचा फोन आला,
"दीदी यावेळी मामाच्या गावाला यायचं विसरु नका. दोन तीन दिवसांची सुट्टी काढून या."
"मामी मला यायला आवडलं असतं, पण सर्वांना दिवाळीची सुट्टी असल्याने पेशंट जास्त असतात. दिवाळी झाल्यावर पेशंट कमी झाले की मी नक्की येईल." मी उत्तर दिले.
"तुम्ही दरवेळेस असंच बोलतात आणि येत नाहीत. लहानपणी सुट्टी लागल्यावर दुसऱ्या दिवशी हक्काने मामाला घ्यायला बोलवायच्या आणि सुट्टीचा एकही दिवस वाया न घालवता इकडे निघून यायच्या. एवढं काम करु नका, शरीराला व मनाला थोडे दिवस आराम द्या. जमलं तर येऊन जा." मामींनी एवढं बोलून फोन कट केला.
मामींसोबत बोलून झाल्यावर माझ्या मनात विचार आला की,
मलाही शरीराला व मनाला आराम द्यावा वाटतो, पण महिन्याला इ म आय भरण्याइतके पैसे कमवावे लागतात. लहानपणी कसलंच टेन्शन नसायचं. दिवाळीची सुट्टी म्हटलं की, नवीन कपडे घ्यायचे आणि मामाच्या गावाला जायचं हे एवढंच समीकरण माहीत होतं.
कधीकधी असं वाटतं की, मोठं व्हायलाच नको होतं. लहानचं रहायला पाहिजे होतं. मोठं झाल्याबरोबर अनेक व्याप मागे लागले आहेत. कुठंही गावाला गेलं तरी दोन दिवसांच्या वर राहता येत नाहीत. वाढत्या वयासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या ते करु देत नाहीत.
लहानपणीचा काळ किती सुखाचा होता. आता आठवलं तरी एकदम भारी वाटतं. माझं मामाचं गाव आमच्या गावापासून 150 किलोमीटरवर आहे. आम्ही लहान असताना दोन बस बदलून जावं लागायचं. पहिली बस नाशिकच्या बसस्टँडवर थांबली की, कँटीनमध्ये मिसळपाव, वडापाव किंवा भजी खाऊन दुसऱ्या बसमध्ये बसून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करायचो. रस्त्याने आजूबाजूला डोंगर दिसायला लागले की, आपलं मामाचं गाव जवळ आलं आहे, याचा अंदाज यायचा. सकाळी ८ ला घरातून निघालं की पोहोचायला संध्याकाळी ६ वाजून जायचे.
माझा एक मामा गावात तर एक मामा मळ्यात रहायचा. मळ्यातील मामाच्या घरी जायचं म्हटल्यावर गिरणा नदी पार करुन जावे लागायचे. आमचं गाव म्हणजे एकदम दुष्काळी गाव. आम्हाला इकडे नदी तुडुंब भरुन कधी दिसलीच नाही. आमच्या टीव्हीवर नॅशनल व दूरदर्शन असे दोनचं चॅनल दिसायचे. मामाच्या घरी मात्र केबल असल्याने सर्वच चॅनल होते. आम्ही मामाकडे गेल्यावर दिवसभर टीव्ही चालू असायचा आणि रिमोट माझ्या हातात असायचा. चित्रपट पाहण्याचा छंद त्या काळात झोपसला जात होता.
मळ्यातील मामाच्या घरी जाताना नदी ओलांडताना सगळेजण एकमेकांच्या हातात हात घेऊन नदी पार करायचो. अनेकवेळा पाण्याच्या प्रवाहामुळे आपला तोल जाऊन पाण्यात पडू की काय? अशी भीती वाटायची. नदी पार करण्यात एक वेगळीच मजा असायची. मामाच्या घरासमोर अंगणात एक जांभूळचे झाड होते. करवंद आणि जांभूळ खाण्याची पुरेपूर मजा आम्ही तिथे घ्यायचो. त्याच झाडाखाली मामा- मावशीच्या मुलांसोबत अनेक खेळ खेळलो होतो.
गावात कुठे जायचे असले की, मामा त्याच्या बैलगाडीत न्यायचा. मामाच्या गावाला गेलं की, तेथून जवळचं असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या गडावर जायचो म्हणजे जायचोच. भावाबहिणींसोबत गड चढण्याची मजा काही औरचं होती. ही सगळी मजा करत असताना सुट्टी कधी संपून जायची हेही कळायचे नाही.
आता कारने मामाच्या गावाला जायला तीन - साडेतीन तास लागतात, तरी जाणं होत नाही. मामाच्या मळ्यात जायला नदीवर पूल झाला आहे, त्यामुळे पाण्यातून जाण्याची मजाही नाही. भाऊ बहीण सगळेच मोठे झाल्याने आपापल्या कामात व्यस्त झालेत, त्यामुळे आता एकत्र कोणी जमतही नाहीत. आता ते लहानपण राहिलं नाही आणि तो काळही राहिला नाही.
बालपणीचा काळ म्हणजे सुखाचा काळ होता. तो कधीतरी पुन्हा जगता यावा, असं मनापासून वाटतं.