Login

सुखाची अपेक्षा भाग 2

About Happiness

कविता आपल्याच विचारात असताना, अचानक तिचे लक्ष समोरच्या बेंचवर बसलेल्या एका जोडप्याकडे गेले. त्यांचे नुकतेच लग्न झालेले होते असे वाटत होते. ते दोघे एकमेकांचे छान फोटो काढत होते. सेल्फी काढत होते. जगातील सर्वांत सुखी हेच असावे. असे त्यांना बघून कविताला वाटत होते. कारण दोघेही आपल्याच विश्वात रमलेले होते. दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सुख म्हणजे नक्की काय असतं.. सुख म्हणजे हे चं असावं.. असे कविताला वाटत होत.

हे पाहून कविताला आपल्या भूतकाळातील आठवणी आठवल्या. संदीपशी लग्न जमल्यानंतर, त्याच्याशी बोलण्याची, त्याला भेटण्याची जी ओढ असायची... आतुरता असायची आणि त्यात जो आनंद होता, सुख होते... ते शब्दांत व्यक्त करणे अवघड होते. फोनवर त्याचा आवाज ऐकण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी मनाला जी आस लागलेली असायची... ती फोनवर त्याचा आवाज ऐकताच, त्याला भेटताच पूर्ण व्हायची. तो एक वेगळाच आनंद होता! ते एक वेगळेच सुख अनुभवाला मिळायचं! सुख सुख म्हणतात ते हे चं का? असं त्यावेळी वाटायचं.

आज त्या क्षणांची नुसती आठवण आली तरी खूप बरे वाटते. आताही त्या सुखद आठवणी आठवताच कवितेचे मन सुखावून गेले आणि एवढ्यात तिचे लक्ष बागेत खेळणाऱ्या छोट्या मुलांकडे गेले. ते सर्व मुले खेळत असताना, धडपडत होते, पडत होते आणि पुन्हा उठत खेळत होते. त्यांच्या आई त्यांना रागवत होत्या. पडताना त्या आपल्या मुलांना सावरत होत्या; पण ते सर्व मुले खेळण्यातच गुंग झाले होते. एकमेकांना अगोदर कधी ओळखत नव्हते होते की नाही? पण एकत्र खेळण्याची ते सर्वजण मजा घेत होते.

'यापेक्षा वेगळा आनंद...वेगळे सुख अजून काही असू शकते का?'

असा विचार करत कविताला आपले बालपण आठवले.


बालपणाला आनंद देणाऱ्या व सुख देणाऱ्या गोष्टी किती छोट्या होत्या! तेव्हा चॉकलेट,आईस्क्रीम व खेळणी हे सर्व किती सुख देऊन जायचे! खरंच बालपणातील तो निरागस आनंद मोठे झाल्यावर पुन्हा का मिळत नाही?
त्या खेळणाऱ्या मुलांच्या आईकडे पाहून कविताला ती आई झाली, त्या क्षणाची आठवण आली. त्या क्षणात किती आनंद होता! किती सुख होते! त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आई झाल्यानंतर, प्रत्येक स्री आपला सर्व त्रास विसरून फक्त मातृत्वाचे सुख अनुभवत असते.

पार्थ झाल्यानंतर त्याची काळजी घेणे, त्याचे हसणे, बोलणे हे सर्व कविताला आठवत होते.
'संदीप व मी पार्थचे आई-बाबा म्हणून किती आनंद घेत होतो!

संसाराच्या छोट्या छोट्या गोष्टींत आनंद घेत होतो. सुख उपभोगत होतो.'


क्रमशः
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all