Login

सुखाची अपेक्षा अंतिम भाग

About Happiness

"किती वाईट झाले हो बिचाऱ्या शिंदेताईंच्या बाबतीत बघा ना!
शिंदेताई व त्यांच्या नवऱ्याने आयुष्यभर खूप कष्ट केले. आता कुठे त्यांचे सुखाचे दिवस सुरू झाले होते.आणि अचानक त्यांचा नवरा हार्टअटॅकने वारला. शिंदेताईकडे आता सुखाची सर्व साधने आहेत पण जोडीदारच नाही. त्यांचा नवराही आता या सर्व सुखांचा उपभोग घेण्यास जिवंत नाही."

बागेत काही स्त्रिया बसलेल्या होत्या. व त्यातील एक स्त्री इतरांना हे सर्व त्यांच्या मैत्रीणीबद्दल म्हणजे शिंदेताईंबद्दल सांगत होती.

कविता बाजूच्या बेंचवर बसलेली होती, त्यामुळे तिला त्यांचे सर्व बोलणे ऐकू येत होते. हे सर्व ऐकून कविताचे विचारचक्र पुन्हा सुरू झाले.

'खरंच सुख नक्की कशात असतं? वस्तूत,व्यक्तीत, परिस्थितीत की अजून कशात? की फक्त आपल्या मानन्यावर अवलंबून असतं. आपल्याकडे जे आहे त्यातही आपण सुखी राहू शकतो पण अधिक सुखाच्या अपेक्षेने, आपण जे आहे त्यापेक्षा अजून मिळवण्याचा प्रयत्न करतो व दुःख पदरी पाडून घेतो.

सुखाची अशी नक्की व्याख्याही करता येत नाही आणि सुखाबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे मते असू शकतात. मला ज्यात सुख वाटतं त्यात इतरांना सुख वाटेलच असे नाही.

लहानपणी ज्यात सुख वाटायचे आता त्यात आपल्याला सुख वाटत नाही. आता आपल्याला ज्यात सुख वाटते, त्यात नंतर सुख वाटेलच असे नाही. आपण अजून वेगळ्या गोष्टीत सुख शोधण्याचा प्रयत्न करू. आयुष्यभर आपण हेच करत असतो. आयुष्य संपून जाते पण सुखाचा शोध कधी पूर्ण होत नाही.


सुख हे मृगजळासारखं असतं आपण त्याच्या मागे धावत असतो पण ते आपल्याला फक्त भासत असतं पण मिळत मात्र नाही.

आजपर्यंत मी व संदीप ज्या सुखाच्या मागे धावत होतो, ते मिळवताना छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद,समाधान, घरातील प्रसन्नता, एकमेकांवरील प्रेम व मन:शांती हे सर्व गमावून बसलो. एक गोष्ट मिळवण्यासाठी दुसरी गोष्ट गमवावी लागते. पण मला आता माझ्या वागण्याचा पश्चाताप होत आहे. कुठेतरी चूक झाली असे वाटते आहे. आयुष्यात प्रगती करावी पण मनाची शांती, घरातील सुख, नात्यातील प्रेम यांचा समतोल साधूनच. संदीपवर व पार्थवर माझे खूप प्रेम आहे. जर नात्यात प्रेम नसेल तर इतर सुखांना काय अर्थ?'

या विचारासरशी कविता घराच्या दिशेने जाऊ लागली.

वाटेतच पावसाच्या सरी तिच्या अंगावर पडताच तिला आनंद झाला. पावसाचा आनंद घेत व मनात एक वेगळा विचार, उत्साह घेऊन ती घरी पोहोचली.


रागाने बेडरूममध्ये गेलेला संदीप मोबाईल बघत होता. मोबाईलमध्ये त्याला जुने फोटो दिसले, ज्या फोटोत आनंदाचे, सुखाचे क्षण टिपलेले होते. ते पाहून संदीपच्या चेहऱ्यावर आनंद उमटला व मन सुखावून गेले.

'पार्थ व कवितामुळे आपल्या जीवनात किती आनंद आहे! सुख आहे! त्यांचा हसरा चेहरा पाहिला तरी मी माझे सर्व दुःख, टेन्शन विसरतो. बाह्य सुखापेक्षा मनाचे सुख किती मोठे असते.'

असा विचार करत संदीपने एक निर्णय घेतला व तो कविताला सांगणार होता.


कविता घरात आल्याचे कळताच तो बेडरूममधून बाहेर आला. आणि ती पावसाने भिजलेली पाहून पटकन तिला टॉवेल देत म्हणाला,

"कविता तू कपडे बदलून घे, तोपर्यंत मी तुझ्या आवडीचा छान चहा करतो."

संदीप कविताला असे म्हणाला व किचनमध्ये गेलाही.


"मी पण तुमच्या आवडीची गरमागरम कांदे भजी करते."

असे म्हणत कविता ड्रेस बदलून किचनमध्ये आली .

चहा व भजीचा मनसोक्त आनंद घेत असताना, संदीप कविताला म्हणाला,

"कविता,आपल्यावर जे कर्ज आहे, ते फेडण्यासाठी आपण हे मोठे घर विकू या. सध्या छोट्या घरात राहू. आपण दोघं मिळून आपले जे दुकान आहे ते व्यवस्थित सांभाळू.
सुखाच्या अपेक्षेने आपण धावत सुटलो पण खरे सुख विसरून गेलो."

' संदीपला आपण हाच निर्णय सांगणार होतो.'

असे कविता मनात विचार करत संदीपला म्हणाली,

"तुझ्या निर्णयात, तुझ्या सुखात माझे सुख आणि आपल्या संसाराचेही सुख."

चहा व भजीच्या आनंदाबरोबर दोघेही नात्याच्या सुखाचाही अनुभव घेत होते.