सुखाची ओंजळ भाग 13
आधीच्या भागात आपण पाहिले की,
सुमनवर ऍसिड हल्ला झाला...समीर आणि प्रतीक तिथून पळून गेले, निधीनी सुमनला हॉस्पिटलला पोहचवल...
निधीनी राजला आणि तिच्या घरच्यांना फोन करून कळवलं..
सगळे हॉस्पिटल मध्ये जमा झाले, राज आला, पाहिलं आणि निघून गेला..आरोहोनी त्याला खूपदा फोन केला पण त्यानी नाही उचलला ..
निधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली... तिनी प्रतीक बद्दल पोलिसांना सगळं सांगितलं.. मी एकमेव साक्षीदार आहे असेही सांगितले.. त्यांनी तक्रार नोंदणी केली आणि कामाला लागले...
निधीने सुमनच्या आई बाबांना सुमन आणि राज च्या लग्नाबद्दल सांगितलं.. त्यांचा तर विश्वास बसेना, निधीनी पूर्ण सविस्तरपणे सांगितलं..
पोलीस प्रतीककडे गेले पण तो घरी सापडला नाही..
समीर वर केस दर्ज झाली त्याची केस कोर्टात गेली..
आता पुढे,
दोन महिने उलटून गेले तरी प्रतीक अजून पोलिसांच्या हाताला लागलेला नव्हता...
सुमनच्या फोनची रिंग वाजली आणि सुमन भानावर आली, तिच्या जुन्या वाईट आठवणीतून बाहेर आली.. तिने फोन उचलला
“ हॅलो...
“ हॅलो सुमन...
“ कोण बोलतय?..
“ अग मी निधी बोलत आहे, विसरलीस मला?..
“ मी कुठे विसरले?.. तू विसरलीस मला... आतापर्यंत एकही फोन केला नाहीस इतक्या दिवसात....
“ सॉरी यार सुमन, मला तुला फोन करायचा होता पण नाही करू शकले, मी दुसऱ्या कामात अडकले होते पण मी आज संध्याकाळी तुला भेटायला येते घरी...
“ नाही ग, तू नको येऊ.. मला माझा चेहरा कोणाला दाखवायचा नाहीये ग...
“ तू हो म्हण किंवा नाही मी आज संध्याकाळी येणार आहे बाय
अस म्हणत निधीनी फोन ठेवल
आरोही खोलीत आली
“दि डॉक्टर आलेत, चल बाहेर..
“तू जा , मी येते...
“ बाबा म्हणाले की तुला सोबत घेऊन ये, उठ ना... आरोही ने सुमनला उठवून हळूहळू खोलीच्या बाहेर नेलं आणि हॉलमध्ये सोफ्यावर नेऊन बसवलं...
“ कशी आहे सुमन?...
“ मी बरी आहे डॉक्टर ...
“बरी आहेस, दिसत तर नाही आहेस आणि चेहरा असा का पाडुन ठेवलास जरा चेहऱ्यावर स्माईल आण...
“खरंच डॉक्टर मी बरी आहे....
“ काका मी तुम्हाला पुढच्या ऑपरेशन बद्दल बोललो होतो, त्याच्यासाठी आपल्याला पैशाची गरज आहे, तुमचं काही मॅनेजमेंट झाले का?.
“ हो हो डॉक्टर मी करतो ना, मला थोडा वेळ द्या....
“हे बघा, आपल्याला लवकरात लवकर सर्जरी करावी लागेल, ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करा तोवर मी पण बघतो, जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आपण ही सर्जरी करून घेऊया..मग पुढल्या सर्जरी साठी आपल्याला हिला दुसऱ्या शहरात पाठवाव लागेल... ते पुढचं पुढे बघू आता सध्या या सर्जरी साठी आपण तयार राहुयात......
आरोहीनी सगळ्यांसाठी चहा आणला, सगळ्यांनी चहा घेत गप्पा मारल्या आणि डॉक्टर निघून गेले...
सुमन तिच्या रूम मध्ये जाऊन बसली तितक्यात पुन्हा फोन वाजला..
“ हा निधी बोल...
“ अगं मी खाली आली आहे...
“ हो हो ये ना ये वरती माझ्या रूम मध्ये...
“ ओके ओके...
निधी सुमनच्या रूम मध्ये आली आणि तिच्या चेहऱ्याकडे काही क्षण बघतच राहिली...
हॉस्पिटलमध्ये एक-दोनदा भेटल्यानंतर निधी पुन्हा तिला भेटायला जाऊ शकली नव्हती म्हणून आज तिला सुमन कडे बघून एकदम तिचं मन भरून आलं होत..... ती सुमनला बिलगली तिच्या डोळ्यातुन आनंदाश्रू निघाले...
“ सुमन सुमन आय एम सो सॉरी, मी तुला भेटायला नाही येऊ शकले माझी खूप इच्छा होती पण मी नाही येऊ शकले... मला माफ कर सुमन... मला माफ कर...
“ निधी प्लीज तू माफी का मागतेस... नाही आली ठीक आहे ना, तसही कुणीही मला भेटायला आलेले नाही आहे...
“ बस ना तू बस...
“ कसं चाललंय तुझं सगळं?.. कशी आहेस तू?....”
“ मी बरी आहे आता, मला माझी काळजी नाही गं.. मला तुझी काळजी आहे .....
“माझी काय काळजी करायची?.. अगं मी बरी आहे एकदम ठणठणीत, ही बघ तुझ्या समोर उभी आहे.. अजून काय हवं....
“ सुमन मला कळत नाही तुझ्या हसण्या मागचं दुःख ...मला जाणवत नाही असे वाटते का तुला... सगळ्यात जास्त दुख मला जाणवते, आनंदी पणाचा मुखवटा तु चेहऱ्यावर घातलास ना त्याच्या मागचे दुःख मला जाणवते...
तुला कल्पना नसेल पण असे दुःख मी पण झेलले, आणि मला पण खूप त्रास झाला ....जेव्हा हे सगळं घडलं ना त्या क्षणी असं वाटलं की नाही हे जग सोडून द्यावे, जगायची इच्छा उरली नव्हती ग....
“ निधी काय बोलतेस तू...
मला सांग तू वेगळी राहतेस ना , की समीर सोबतच राहतेस...
“ नाही ग मी वेगळी राहते... समीरची आई एकटीच असते, समीर तर जेलमध्ये आहे...
सुमन हळू आवाजात
“ आणि प्रतीक?....
निधीनी नकारात्मक मान हलवून ‘नाही ग... त्याचा अजूनही काही थांगपत्ता लागलेला नाहीये,, पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत, सगळीकडे शोधाशोध करत आहेत त्याचा अजून पत्ता लागलेला नाहीये...
सुमन आता आपण हरायचं नाही, आपण रडायचं नाही...आता फक्त लढायचय...तू एकटी नाही आहेस मी तुझ्यासोबत आहे.. आई-बाबा तुझ्या सोबत आहेत आणि हो सुमन मी आई-बाबांना तुझ्या आणि राजबद्दल सगळं सांगितलं ...
“ निधी अग पण....
“ नाही सुमन त्यावेळी ते सांगणे खूप गरजेचे होते.. मी सगळं सांगितलं पण तू काळजी करू नकोस, ते तुझ्यावर नाही रागावले...
“ निधी राज कुठे आहे ग?...
निधी नकारात्मक मान हलवून “माहिती नाही ग?.. त्यादिवशी तो दवाखान्यात आला होता, त्यानंतर जो गेला तो आलाच नाही... त्याचा फोनही लागत नाही , आधी लागायचा रिंग तरी जायची आता बंदच दाखवतोय.. कुठे गेला?.. कधी गेला?.. काय करतोय?... आहे की नाही?.. काहीच माहिती नाहीये.....
सुमन पटकन तिच्या तोंडावर हात ठेवत,
“ नाही ग, अस म्हणू नको.. असेल तो, कुठे तरी असेल... तो कुठेही असला ना तो माझी आठवण काढत असेल...
“ सुमन सॉरी प्लीज खोटे स्वप्न बघू नकोस ग, मला सांग त्याला तुझ्याबद्दल खरं जर काही वाटत होते तर तो असा का निघून गेला?... अगं लग्न केलं होतं ना त्यानी, बायको होतीस ना तू त्याची.. मग असा कसा गेला निघून.. कुणाशीही काहीही न बोलता तो निघून गेलाय....
सुमन तरी तू त्याच्याबद्दलच विचार करतेस...
“ माझ मन मला सांगतय ,तो माझी आठवण करतो.. माझं मन मला सांगतय निधी. माझी आठवण करतो तो..
“ खोटी आशा ठेवू नको सुमन... आता तुझ आयुष्य बदललय, आता त्याच आयुष्य वेगळे आणि तुझं वेगळ... आधीचे दिवस वेगळे होते आताचे दिवस वेगळे आहेत...
“ सुंदरताच सगळं काही असत का ग?.. माणसाच्या मनाला काहीच किंमत नाही..त्याच्या चांगुलपणाला काहीच किंमत नाही....
“ सॉरी सुमन आपल्यासारखेच सगळ्यांचे विचार नाही ग, जग फक्त सुंदरता बघतो, त्याच्या आतमधल्या मनाला किंवा चांगुलपणाला नाही बघत.. पण सुमन तू काही कमी सुंदर नाही आहेस.. माझी मैत्रीण आहेस तू आधीही सुंदर होतीस आणि आताही सुंदरच आहेस...
“ हरभराच्या झाडावर चढवायची तुझी सवय काही गेली नाही.... तू बदलणार नाही आहेस...
“ बदलायला मी राज नाही सुमन...
जीव जाईल पण तुला सोडणार नाही सुमन...
चल मी निघते, उद्या मला कोर्टात वकील साहेबांनी बोलवलय, समीरच्या विरोधात मी केस टाकली होती, मला त्याच्यापासून घटस्फोट हवाय पण तो द्यायला तयार नाहीये... पण मी माझे प्रयत्न करत राहील.. मलाही माझ नवीन आयुष्य सुरू करायचंय....
“ आपल्या दोघींचे नशीब किती सारखेच आहेत ना, तुही जीवनाची नवीन सुरुवात करतीयेस आणि माझ्या जीवनाची नवीन सुरुवात होतीय.. दोघींचे वेळवेगळे रस्ते एकाच वाटेवर येऊन मिळाले....
“हो ना...
“ही दोस्ती तुटायची नाही...
कळलं का....
थोडी का असेना सुमनच्या चेहऱ्यावर स्माईल आली...निधी तिथून निघाली..
निधी खोलीतून बाहेर आल्यावर आरोही तिला
“ निधी थँक्स ग, तुझ्यामुळे थोडी का होईना सुमनदीच्या चेहऱ्यावर स्माईल आली, ती थोडी तरी हसली.. मी तुला रोज तर नाही म्हणणार पण मधमधात येत जा ग तिला भेटायला, प्लिज रिक्वेस्ट करते मी तुला...
“ रिक्वेस्ट करायची गरज नाही आहे ग, ती जशी तुझी बहिण आहे ना तशी माझी मैत्रीण आहे, माझी हक्काची मैत्रीण आहे, जीव जाईल पण आता ही मैत्री तुटायची नाही... दोघीही हसल्या, निधी निघाली...
थोड्या वेळाने आई खोलीत आली,
“ सुमन बाळा जेवुन घे थोडं...
“ आई भूक नाही गं...
“ जेवून घे बाळा थोडसं ..
आई तिच्याजवळ बसली आणि आईने तिला घास भरवला.. तसं सुमनच्या डोळ्यातुन चटकन पाणी खाली आलं, आईने डोळे पूसले..
“ नाही बाळा आता रडायचं नाही, रडण्याचे दिवस दुसऱ्यांचे येणार आहेत...आता रडायचं नाही बेटा आता जगायचं ....
तू काळजी करू नकोस आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, आता तुला काहीही त्रास होणार नाही, तुला कुठेही काहीही कमी पडू देणार नाही.. आई म्हणत सुमन आईला बिलगली तितक्यात आरोही आली
“अरे वा ती तुझी मुलगी, तिला भरवलंस आणि मी तुझी मुलगी नाही का?.. मला नाही भरवणार...
“ नाही ग, तुम्ही दोघी माझ्या काळजाचा तुकडा आहात.. माझ्या जिवापेक्षा दोघी प्रिय आहात.. आमच्या जीवनात तुमच्या दोघी शिवाय आहेच कोण?. आपलं चौकोनी कुटुंब आता आनंदित राहावं एवढीच देवाचरणी प्रार्थना करते मी.. माझ्या दोन्ही मुली सोन्यासारख्या आहेत, गुणी आहेत, अजून काय पाहिजे मला..”
यांचं बोलणं सुरू होतंच तेवढयात बाबा आले,
“ अरे वा मला सोडलं ,चौकोनी कुटुंब म्हणालीस आणि मला सोडलं....
“ नाही हो ,या तुम्ही या ... भरवू का तुम्हाला...
“ मुलींसमोर काय बोलतेस?...
“ गंमत केली हो ..
“बाळा तू जेवून घे मी पाणी आणते तुझ्यासाठी...
थोड्या वेळात घरी ईंन्स्पेक्टर आले,
“ इन्स्पेक्टर साहेब.. तुम्ही या ना.. बसा...
“सुमन आहे ना?..
“ हो आहे ना.. तुम्ही बसा मी आवाज देतो तिला..
“ सुमन.. सुमन बाळा... बाहेर ये इंस्पेक्टर साहेब आलेत ...
सुमन बाहेर आली.. बसली..
“ कशी आहेस सुमन?..
“ मी बरी आहे...
“ तू आम्हाला काही माहिती देऊ शकशिल प्रतीक बद्दल...
“ हो...विचाराना.. विचारा तुम्ही..
“ कसा होता तो प्रतीक?.. म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये शिकत होता त्यामुळे तुला माहिती असेल..त्याचा स्वभाव कसा होता?..
“ तो माझ्याशी नेहमीच विचित्र बोलायचा, विचित्र वागायचा... माझ्यात आणि राजमध्ये जे काही होतं ते सगळं त्याला माहिती होतं त्यामुळे तो मला नेहमी ब्लॅकमेल करायचा.. एक दोनदा राज आणि त्याच्यामध्ये मारहाण पण झाली होती, आम्ही त्याच्या घरी सांगणार होतो पण गोष्ट कशाला वाढवायची म्हणून गप्प बसलो.. माझ आणि राजचं लग्न झालय हे त्याला माहिती होतं त्या गोष्टीवरून तो नेहमी ब्लॅकमेल , मला तुझ्याशी लग्न करायचे राज चांगला मुलगा नाहीये असं सांगायचं ...
“आता राज कुठे आहे?..
“ मला नाही माहित...
“ पण सुमन तू आत्ताच म्हणालीस ना तुमचं लग्न झालं, तुम्ही मंदिरात लग्न केलं होतं, मग राज आता कुठे आहे?. तो कुठे गेला तुला सोडून?...
“ सॉरी.. सॉरी पण तुमच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही आहे, तुम्ही बाकी सगळ विचारा पण राजबद्दल मला विचारू नका कारण तो सध्या कुठे आहे?.
काय करतोय?..
मला काहीच माहित नाही...
क्रमशः
