Login

सुखाची ओंजळ... भाग 15#मराठी - कादंबरी

Kharach khup changali batmi dilis tu beta aata pratikhi lavkrat lavkr bhetayla hava

सुखाची ओंजळ भाग 15


आधीच्या भागात आपण पाहिले की,


सुमन झोपली असताना तिला राजनी उठवलं आणि त्याच्या सोबत घेऊन गेला, आरोहिनी परत आणलं..सोड आरोही मला जाऊदे राज सोबत.…सुमन ओरडायला लागली..


आरोहिने तिला हलवू हलवू उठवलं तेव्हा सुमनच्या लक्षात आलं की हे स्वप्न होत..आरोहिने तिला झोपवलं...


दुसऱ्या दिवशी आई बाबांना सांगितलं तेही चिंतेत बसले होते..
तेवढ्यात निधी आली आणि तिनी समीरच्या अटकेची चांगली बातमी दिली, सगळ्यांना खूप आनंद झाला..


आता पुढे,


“खरच खूप चांगली बातमी दिलीस तू बेटा... आता प्रतीकही लवकरात लवकर भेटायला हवा, तेव्हाच माझ्या पोरीला न्याय मिळेल.. नाहीतर माझ्या पोरीला न्याय नाही मिळायचा...


“ काका सगळं काही ठीक होईल...प्रतीकही लवकरात लवकर सापडेल , तुम्ही काळजी करत बसू नका...


काका तुमची काही हरकत नसेल तर मी सुमनला बाहेर घेऊन जाऊ....


“ माझी काय हरकत असणार पोरी पण तिचं बाहेर यायला पाहिजे ना, ती रूम मधूनच बाहेर निघत नाही, कुणाशी बोलत नाही, धड खात नाही, पीत नाही...


 काल तर काय ते राजच स्वप्न पाहिलं.. स्वप्नात दोघेही जीव दयायला जात होते...आरोहिनी कसबस शांत करून झोपवलं तिला..


तेव्हा कुठे शांत झोपली...


“काका मी जाते तिच्या रूम मध्ये बघते तिला विचारून.. बघते काय म्हणते ती... तयार करते तिला
आणि नेते...”


निधी सुमनच्या रूम मध्ये गेली
“काय करतेस गं सुमन...


“ काही नाही.. काय म्हणतेस?.. तुला खूप खूप अभिनंदन निधी...


“ हे सगळे तुझ्या मुळे शक्य झाले आणि बघ ना आता मी तुला काय मदत करू शकत नाहीये.....”


“ माझ्या साठी इतकं करतेस, अजून काय हवं...


“ हो ना मग चल आता, आपण तयार होऊन बाहेर जाऊया..
“ बाहेर कुठे?....


“आपण किती महिने झाले कुठे गेलेलो नाही, प्लीज चल जाऊया, आईस्क्रीम खाऊया किंवा पार्कमध्ये जाऊया...”


“ माझा मूड नाही आहे प्लीज...


“असं नको बोलू ना, आता तुझ्याशिवाय कोण आहे मला, कोणाला घेऊन जाऊ मी बाहेर.. चल ना गं प्लीज ...”

निधीनी सुमनला तयार केलं आणि दोघीही बाहेर गेल्या...

घरापासून चौकापर्यंत जातं नाही तर लोकांनी बघ्याची भूमिका निभावली...


एका एका पावलावर एका एका नजरेचा कटाक्ष तिच्या काळजात घुसत होता..


अर्धा चेहरा झाकला असूनही लोक भिरभिर बघायला लागले...


सुमनचे डोळे पाणावले, तिने निधीचा हात घट्ट पकडला...
निधीनी तिचा हात सोडत तिच्या हातात हात घालून मुठी बांधली आणि सुमन कडे बघून नाकारर्थक मान हालवली जणू ती सुमनला सांगत होती की आता नाही रडायचं, लोक अशीच असतात, दोन्ही बाजूने बोलतात..आपण लक्ष नाही द्यायचं...
निधीनी सुमनचा  हात पकडून तिला पार्कमध्ये घेऊन गेली ,

तिला बाकावर बसवून प्यायला पाणी दिल...


“बघितलस निधी, म्हणून मी म्हणाले होते मला नाही यायचंय..बाहेरच्या जगाची मला भीती वाटायला लागलीय ग...ही लोक कशी बघतात...त्यांच्या नजरेतच मला विद्रूपता दिसते.... म्हणून मी येत नव्हते...


“सुमन शांत हो,काहीही झालं नाही ...


“काहीच कस नाही...


“हे बघ सुमन, आता तुला या सगळ्याची सवय करून घ्यायला लागेल.... लोक काय... बोलतील बोलतील आणि गप्प बसतील...


 ह्या लोकांमुळे आपण आपलं जगणं थांबवायचं का?.. 
नाही ना.. ते वाईट बोलतात आणि चांगलही बोलतात.. आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं सुमन.... 


हे बघ, तिथे ना आईस्क्रीम वाला उभा आहे, मी पटकन आईस्क्रीम घेऊन येते तू बस...


 निधी आईस्क्रीम आणायला गेली, सुमन बाकावर बसलेली... थोड्या वेळात तिच्या पायाजवळ एका लहान मुलीचा  बॉल आला, ती मुलगी धावत धावत आली... तिने पायाजवळचा बॉल उचलला आणि वर मान केली तर तिला सुमनचा चेहरा दिसला आणि ती जोरात किंचाळली ....तशी तिची आई  मागेहून धावत धावत आली ,


“काय झालं.. काय झालं बेटा?...काय केलं हिनी..
“ काय ग.,काय केलंस माझ्या मुलीला...


“आई तिनी मला काहीच नाही केलं पण तिचा चेहरा....मुलगी बोलता बोलता गप्प झाली...


 त्या बाईने सुमनच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि 


“चल चल बेटा... अशा लोकांसामोर यायचं नाही, अशी लोक चांगली नसतात..हिची  छाया पण तुझ्यावर पडली ना तर तुझेही काही बरं वाईट होऊन जाईल.. चल बेटा...
 असं म्हणत ती बाई तिथून निघून गेली...


 सुमनला खूप वाईट वाटलं, सुमन तिथून उठली आणि निघाली..


 काही क्षणात निधी आईसक्रीम घेऊन आली,  तिला बाकावर सुमन नाही दिसली.. तिने आवाज दिला


“ सुमन.. सुमन... सुमन.... कुठे गेली ही आत्ताच तर इथे होती.. निधीनी शोधाशोध सुरू केली, काही अंतरावर जाऊन निधी थबकली तीचे पाय तिथेच थांबले, तिनी बघितलं की,
सुमन रागारागात रडत रडत चेहऱ्यावर जोरजोरात पाणी मारत होती, निधी तिच्याजवळ गेली...


“ सुमन सुमन थांब, थांब सुमन काय करतेस?... का करतेस?.. काय झालं तुला?. तिथे बसायला सांगितलं होत ना मग का आलीस इकडे?..


“ मला नाही बसायचय, तू घरी चल,  मला नाही बसायचय....


“ सुमन शांत हो, आणि आपण घरी जाणार नाही आहोत, सुमन तुला हे करावच लागेल,  या जगाशी तुला लढावच लागेल... मागे फिरून चालणार नाही.. तू चल माझ्या सोबत, चल...


निधीनी तिला बाकावर बसवुन तिचा चेहरा पुसून दिला आणि ओढणीनी चेहरा झाकून तिच्या हातात आईसक्रीम दिल...
“ हे बघ, तुझ्या आवडीचा फ्लेवर आणलंय, तूला आवडतो ना.....


“ राजला पण आवडतो... सुमन चेहरा पाडत बोलली....


“ सुमन सोड ना ग, आता त्याचा विषय नको... आज आपण बाहेर आलो आहोत, छान मूड फ्रेश करायला  मग बाकी काही नको...


 दोघींनी आईस्क्रीम खाऊन घेतली आणि त्या झोपाळ्यावर झुलायला गेल्या, सुमन झोपाळ्यावर बसली आणि निधीनी तिला झुलवल..


 खूप महिन्यानंतर सुमन अशी झोपाळ्यावर झुलली होती, तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला दिसला, सुमनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून निधीला खूप बरं वाटलं...
 सुमन आज खळखळून हसली...


थोड्या वेळाने तिथे सुमनच्या बाकीच्या मैत्रिणी आल्या..
 त्या मागेहुन जोरात ओरडल्या..

“ सुमन.... अशा जोरात ओरडल्या सुमन दचकली मागे फिरून पाहिले तर पायल, निकिता, दुर्वा आणि प्रीती अशा चार चार मैत्रिणी उभ्या होत्या.. सुमनला त्यांच्याकडे बघून खूप आनंद झाला, त्यांनी पण एकेक करून सुमनला आलिंगन दिलं आणि सगळ्यांनी तिला विचारपूस करायला सुरुवात केली... 


“कशी आहेस सुमन?.. आता कस वाटतय तुला?… सगळे एकावर एक प्रश्न विचारू लागले..
 निधी ओरडली..

“ अगं थांबा थांबा , एक एक जण बोला, तिला उत्तर देऊ द्या ..
तुम्ही सगळे एका वेळी बोलाल तर तिला घाबरल्यासारखे होईल ...जरा शांत रहा...”


 सगळ्या एका ठिकाणी जाऊन बसल्या आणि मग सुमनने बोलायला सुरुवात केली,


“ मी ठीक आहे... तुम्ही सगळे कसे आहात?..
“ आम्ही पण मस्त ....


“आज इतक्या दिवसानंतर तुम्हाला माझी आठवण आली, इतक्या दिवसात कुणीही कॉल केला नाही मला...


“ सॉरी ग, खरच सॉरी , मला ना तुला भेटायला यायचं होतं पण घरच्यांनी नाही येऊ दिलं-  प्रीती बोलली
 त्यानंतर तिच्या हो ला हो करत दूर्वा पण बोलली,


“ हो ग सुमन माझ्याकडे हाच प्रॉब्लेम होता, मी पण नाही येऊ शकले...


 सगळ्यांनी आपापले प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली...


“ ठीक आहे ग पण आज आपण भेटलो ना आणि खरच मला खूप बरं वाटल, ये पण तुम्हा सगळ्यांना कसं कळलं मी इथे आहे ते...


“ निधीने आम्हाला फोन केला, आम्हाला सगळ्यांना फोन करून बोलावलं..
“ अच्छा,हा सगळा निधीचा प्लॅन होता..


“ घरी एकटीच बसली असतेस, तुला काहीतरी चेंज हवा म्हणून निधीही हा प्लॅन केला.. 


“ तुम्ही सगळे आलात ना मला खरंच खूप बरं वाटलं खरंच बरं  वाटलं....


 खूप महिन्यानंतर सगळ्यांची भेट झाल्यामुळे सगळे खूप खुश होते, सगळ्यांनी खूप धमाल केली, खूप मजा केली.. सुमनला काहीही जाणवू सुद्धा दिल नाही, सुमनला पण खूप बरं वाटलं...


 संध्याकाळ झाली आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले...
 निधी पण सुमनला घेऊन घरी आली,
“ काका.. काकू..


“ अरे आलात तुम्ही पोरींनो...


“ हो काका, तुमची अमानत घेऊन आलेय... आता माझी जबाबदारी संपली.. असं म्हणत सगळे हसले.. आतून आरोही आली तिने निधी जवळ जाऊन तिचा हात पकडून


“ थँक्स निधी, थँक्यू सो मच.. सुमनदी साठी किती करतेस ग तू... आजचा तुमचा दिवस खूप छान गेला आहे, आम्हाला सगळ्यांना कळलंय....


“कसं काय ?.तुला कसं कळलं?.


“ मी आत्ताच प्रीतीला फोन केला होता, तिने मला सगळं सांगितलं.. खरंच तुझे किती आभार मानावे तेवढे कमीच, खूप करतेस ग तू..


“ असं बोलून बोलून तु मला परकी करणार आहेस का, अशी खूप म्हणतेस तू घरचीच आहेस, घरचीच आहेस, आणि आता परकं करतेस..


“नाही ग,अस नाही..
“चल मी निघते..
निधी निघाली...


 प्रीती घरी गेली आणि तिच्या घरी कळलं की ती निधीच्या सांगण्यावरून सुमनला भेटायला गेली होती, तर तिच्या घरच्यांनी तिला खूप रागवलं, आता तिच्यासोबत राहायचं नाही, बोलायचं नाही वगैरे वगैरे... संपूर्ण बोलून झाल्यावर त्यांनी सुमनच्या वडिलांना फोन केला आणि त्यांनाही चार गोष्टी सूनावल्या


“ हे बघा, सुमनचे बाबा.. आम्हाला आमच्या मुलीला तुमच्या मुली सोबत राहू द्यायचं नाहीये, तुम्ही तुमच्या मुलीला समझवा, बाहेर जातानी आमच्या मुलीला फोन करून बोलवायचं नाही, आम्हाला हे चालणार नाही... आता तुमच्या मुलीच जीवन वेगळ आहे आणि आमच्या मुलीच जीवन वेगळ आहे... उगाच तिच्या सोबत राहुन माझ्या मुलीच काही बरे वाईट झाले तर कोण जबाबदार राहणार आहे त्याला, तुम्ही घेणार आहात का जबाबदारी.. तुम्हाला तुमची पोरगी सांभाळता येत नाही तुम्ही दुसऱ्याची पोरगी काय सांभाळणार.. असे म्हणून तिने फोन ठेवला..


 सुमनच्या बाबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, सुमन ची आई बघत होती


“ काय हो कुणाचा फोन होता?..


“ नाही.. कुणाचा नाही.. 


“सांगा ना कुणाचा फोन होता?.. तुमच्या डोळ्यात टचकन पाणी आलं..


“ प्रीतीची आई...
“ प्रीतीची आई, तिने का फोन केला..


“  आज ह्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या ना, कदाचित ते त्यांना आवडलेलं नव्हतं, म्हणून म्हणाल्या की आमच्या मुलीला तुमच्या मुली पासून लांब ठेवा...


 सुमननी आतून सगळं ऐकलं, तिला खूप वाईट वाटलं.. आपल्यामुळे सगळ्यांना त्रास होत आहे ही भावना तिच्या मनात घर करून गेली आणि तिच्या मनात वेगळे विचार घोळू लागले.. ती रूम मध्ये गेली रूमचा दार लावला आणि खूप ढसाढसा रडली..


 आरोहिच्या लक्षात आल आणि आरोही तिच्या मागे मागे गेली..


“ दि.. दार उघड प्लीज.. प्लीज दार उघड....दार लावून बसू नकोस ग ..


“ नाही मला एकटी राहू दे.. राहू दे मला..  मला तुझ्याशी बोलायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, सुमन रडत रडत बोलत होती...


 रात्री झाली तरी सुमनने दार नाही उघडला, तिच्या रूम मध्ये अंधार झालेला तरी तिनी लाइट सुरू केलेले नव्हते...
 दरवाजावर थाप पडली, बाबांनी खूपदा दार ठोठावला तेव्हा ती बोलली ...


“ प्लीज मला कोणाशीही काही बोलायचं नाहीये...
 पलिकडून आवाज आला


“ बाळा, मी तुझा बाबा... कोणी काही बोललं तरी तुझा बाबा तुझ्या सोबत आहे, तू जगाची काळजी करू नकोस त्यांच्याशी लढायला तुझा बाप जिवंत आहे...तू दार उघड.. दार उघड.. आम्हाला आत येऊ दे.. संध्याकाळपासून अशी एकटीच बसलीस,  तुला असं बघवत नाही.. आमचा जीव लागत नाही..


“ ये बाळा बाहेर ये.. दोन घास खाऊन घे...

असं म्हणत बाबा दरवाजाला डोकं टेकून

विनवण्या करत होते...


 क्रमश:

0

🎭 Series Post

View all