Login

सुखाची व्याख्या

सुख

            सुखाची व्याख्या                                                                         सुख शोधत माणुस दुनिया पालथी घालतो..मुद्दाम दुनिया म्हणतोय जग नाही.दुनिया प्रत्येकाची वेगवेगळी असते अन् दुनियादारीही.. व्यक्तीसापेक्ष ..नाही का ?                                                         जग एकसारखं असतं .प्राणि,पशू,पक्षी,झाडे,फुले,पाने,सारं काही..असो. अशा निर्मळ , नितळ, निवांत ,निशांत,निर्भेळ,निरपेक्ष जगात माणुस नावाचा प्राणि येतो अन् सुरु होतो व्यवहार...हो व्यवहारच..नात्यांचा,भावनांचा,विचारांचा,तडजोडींचा,गरजांचा,जाणिवांचा,फायद्याचा नी गरज पडली तर मुद्दामहुन केलेल्या तोट्याचाही.. चार माणसांच्या तथाकथित चौकोनी कुटुंबाच्या सुखासाठी माणुस राबराब राबतो.एका अपूर्ण व्यवस्थेच्या परिपुर्णतेसाठी..त्या व्यवस्थेमध्ये आई,वडिल,भाऊ,बहिण कोणीही नाही..मग ती पुर्ण कशी ? कोणतं सुख बाजारातुन विकत आणुन त्या नात्यांची भरपाई करता येणार आहे ? आजी,आजोबांचा हट्ट धरुन बसलेल्या लहानग्यांना गप्प करायला किती चाँकलेटं खाऊ घालणार आहोत आपण..कदाचित दाखवलेलं ..दिलेलं प्रलोभन वेळ मारुन नेईलही..पण आपलीही वेळ येईल तेव्हा यापेक्षाही भारीतली अन् आकर्षक चाँकलेटं बाजारात आलेली असतील ..असा विचार का नाही करत आपण.. अन कोणी विषयाला हात घातला तर ऊत्तर तयार असतं ..मुलांच्या भवितव्या करिता..त्यांच्या सुखाकरिताच सगळं काही करतो आहोत ना आम्ही..अरे पण कोणी सांगितलं अशानं मुलाबाळांचं भवितव्य ऊज्वल घडेल,त्याला सुख लाभेल म्हणुन..याला कारण आहे सुखाची व्याख्याच आपल्यातल्या बहुतांशांना कळलेली नाही..अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलांना माणुस नाही तर निव्वळ नफ्या तोट्याचा विचार करणारं यंत्र बनवत आहोत हे लक्षातच येत नाही आपल्या..अन् ह्या यंत्राला सर्व इनपुट्स कोण देत असतं. आपणचं..                                                     आपल्याच पोराबाळांच्या हातुन आपलंच म्हातारपण अवघड करुन घेण्याला सुख म्हणत असतीलं तर असं सुख अशांनाच लखलाभ असो नाही का .. मग सुख कशात आहे..आपल्या चौकोनाचे कोन वाढवण्यात आहे सुख..आपल्या भाकरीत कुणाला तरी वाटेकरी करुन घेण्यात आहे सुख...बायकापोरांसहित ईतर नात्याला सामावुन घेण्यात आहे सुख..कामवालीला दमली असशील म्हणन्यात आहे सुख..आपल्या चहातला कपभर नाही दिला तरी घोटभर चहा देण्यात आहे सुख..गावाकडच्या भावाला न मागता त्याची नड ओळखुन मदत करण्यात आहे सुख..अन् मग त्यानं पाठवलेल्या घरच्या गाईच्या कच्चा दुधाचा खरवस खाण्यात आहे सुख..गावाकडं जाऊन हक्कानं..हुरडा खाण्यात आहे सुख..बहिणीला दिवाळसणाला घरी आणुन साडीचोळी करण्यात आहे सुख..पोरांच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळुन गोरगरिबाला सेल्फी न काढता मदत करण्यात आहे सुख..शेजारधर्म पाळण्यात आहे सुख..                                                                                   संत एकनाथांना गाढवाची तहान भागवण्यात जे सुख लाभलं ते आपल्याला आई वडिलांच्या सेवेत मिळत नसेल तर आपल्या सारखे करंटे आपणच नाही काय..माऊलींनी विश्व कल्याणाकरिता पसायदान मागितलं अन् आपल्याला आपल्या सख्ख्या भावाचा उत्कर्ष सहन होत नसेल तर कशी घालणार आहोत आपण सुखाला गवसणी..जगतगुरु तुकोबांनी दुष्काळात पीडलेल्या जनतेकरिता पीढीजात सावकारिला लाथ मारली ..धान्याची कोठारं खुली केली.. त्या देण्यात सुख शोधलं.. मग कळलं सुख कशात आहे..मी पणा सोडण्यात अन् देण्यात ..हे ज्याला करायला जमलं तो सुखी माणुस अन् हे ज्याला निदान समजलं तो ..माणुस.                                                                         अन् बाकीचे ? मी काय सांगु...