Login

सुखाच्या भिंती- भाग3

Eka Gharachi Gosht

नव्या घरी येताच सुशीलाबाईंनी अंथरूण धरले. त्यांना कधी चार खोल्यात राहायची सवय नव्हती. वसंतरावांनाही इथे करमत नव्हते. नुकतीच त्यांची रिटायरमेंट झाली असल्याने घरी बसून तरी काय करायचे? शिवाय घराचा विषय त्यांच्या डोक्यातून जात नव्हता म्हणून त्यांनी काम शोधायला सुरुवात केली.

आता वंदनाताईंनी स्वतःला घरकामात गुंतवून घेतले. त्यांना मधेच आपल्या जावेची आठवण येई. कधी कणीक मळण्यासाठी, तर कधी भाजी फोडणीला टाकण्यासाठी त्या छायाकाकूंना हाक मारत. पण लगेचच त्यांच्या लक्षात येई, आता आपण कायमचे वेगळे झालो आहोत. 


"आई, भाऊजी आणि छाया या दोघांच्या मनात आपल्या विषयी किती राग आहे, याची जाणीव परवाच झाली. वाटायचे, आपण एकत्र कुटुंबात, एकमेकांच्या आधाराने राहतो. काही दुखलं -खुपलं तर आपली माणसे आहेत.

आम्ही नेहा आणि रवी यांना पोटच्या मुलांप्रमाणे वागवलं. अभय आणि त्या दोघांत कधी फरक केला नाही. पण याचा परिणाम मात्र नेमका उलटा झाला." वंदनाताई आपल्या सासुबाईंना म्हणाल्या.


" खरं आहे गं. कधी कधी वाटते, सुरेश खरंच माझा मुलगा आहे का? त्याच्या आणि वसंताच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे अगदी. लहानपणापासूनच त्याची धरसोड वृत्ती. पण स्वतःच्या हिमतीवर तो घर विकण्याचा इतका धाडसी निर्णय घेईल असे कधी वाटले नव्हते. आपण काय गमावलं याची जाणीव नाही त्याला अजून. पण लवकरच कळेल." सुशीलाबाई आणि वंदनाताईंनी मिळून जुन्या घराला घरपण दिले होते. घरात पाहुण्यांची कायम उठबस असे. आला, गेला पाहुणा कधी उपाशी गेला नव्हता. 

जुन्या घरची आठवण सुशीलाबाईंची पाठ सोडत नव्हती. त्या आत्ता कुठे ठीक होत होत्या. नव्या घरी रुळायचा प्रयत्न करत होत्या. 

-------------------------------


इकडे सुरेशरावांनी नवं घर घेतलं. त्यातून उरलेले पैसे त्यांनी बँकेत ठेवले. अनेक वर्षे काटकसरीत घालवल्यानंतर हाती आलेले इतके पैसे पाहून छायाकाकूंना आता काय करू आणि काय नको असे झाले होते. 

-------------------------

दिवस असेच सरत होते. अभयची नोकरी छान सुरू होती. तो आता प्रमोशनवर काम करत होता. वसंतरावांनाही त्यांचा वेळ जाईल इतपत लहान नोकरी मिळाली. हळूहळू सगळेच नव्या घरी रुळत होते. 

एक दिवस रवी अभयच्या ऑफिसमध्ये आला. त्याचा चेहरा पार उतरला होता. त्याला पाहून अभयला कसेतरीचं झाले.


"रवी, आपलं घर कोणी विकत घेतलं?" अभयने विषय काढला.


"दादा, विकलेल्या घराचा व्यवहार पूर्ण झाला. एक लहान कुटुंब आई, वडील, साधारण आपल्या नेहा एवढी मुलगी असे कुटुंब राहते तिथे. त्यांनी आपल्या घराचा चेहरा पार बदलून टाकला आहे. आता आपण गेलो तरी ओळखणार नाही घर! 

ते जाऊ दे. तुम्ही सगळे कसे आहात?" 


"आम्ही ठीक आहोत. रवी, घरी काही प्रोब्लेम तर नाही?" अभय न राहवून म्हणाला.


"हम्म. माझं हे इंजिनियरिंगचं शेवटचं वर्ष आहे दादा. कॅम्पसमध्ये सिलेक्शनही झाले. पण फी भरायला पैसे नाहीत.


"का?"


"बाबांनी मोठं घर घेतलं. बाकी पैशातून आम्हा दोघांची थोडी फी भरली आणि राहिलेले पैसे बँकेत ठेवले. पण पुन्हा त्यांचा स्वभाव आणि आईची हौस नडली. घर नको नको त्या वस्तूंनी भरले आहे. साऱ्या वस्तू चैनीच्या. जीव गुदमरतो त्या घरात. आजी, काका -काकू होते, तोपर्यंत घराला घरपण होतं. आता नको वाटतं रे नवीन घरात."


"आता तुझी अपेक्षा काय? मी तुझी फी भरण्यासाठी पैसे द्यावेत की आणखी काही?" अभय रवीला निरखत म्हणाला.


"अपेक्षा काही नाही. मी केवळ माझं मन मोकळं करायला आलो होतो. पण तू फी भरायला पैसे दिलेस, तर बरं होईल दादा. मी नोकरीवर जॉईन झालो की तुझे सगळे पैसे परत करेन. नक्की." रवी शांतपणे म्हणाला.


अखेर अभयने रवीला फी भरण्यासाठी पैसे दिले पण कोणालाही न सांगण्याच्या अटीवर.

त्या दिवसापासून अभय आणि रवी पुन्हा संपर्कात आले.


क्रमशः


रवीने नक्की शिक्षणासाठी पैसे मागितले असतील की ही सुरेशरावांची नवीन खेळी असेल? हे जाणून घेण्यास पुढचा भाग वाचायला विसरू नका.


🎭 Series Post

View all