Login

सुखाच्या भिंती -भाग 4

Eka Gharachi Gosht

वर्ष सरले. रवी नोकरीवर जॉईन झाला. मिळालेला पहिला पगार त्याने आठवणीने अभयच्या हातावर ठेवला. 

"रवी, मी साशंक मनाने तुला पैसे दिले होते. पण तू त्याचा खरंच योग्य तो उपयोग केलास. यातच आले सारे. मला तुझे पैसे नकोत." अभयने ते सगळे पैसे त्याला परत दिले.

तो रवीला आपल्या घरी घेऊन आला. त्याला पाहून सुशीलाबाईंना खूप आनंद झाला. सगळेच आपला राग काही काळ विसरून गेले आणि बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना भेटून रवीला खूप बरं वाटलं.


सारं काही सुरळीत झालं. आता सुशीलाबाईंना आणि वंदनाताईंना अभयच्या लग्नाचे वेध लागले. अभयने सुरुवातीला थोडे आढेवेढे घेतले. मात्र त्याचा अस्पष्ट असा होकार पाहून वंदनाताईंनी मुली पाहण्यास सुरुवात केली. 

वसंतरावांची होणाऱ्या सुनेबाबत एकच अट होती, ती म्हणजे, तिने हे घर, आपल्या माणसांना कायम धरून राहावे, वागावे.


आता विवाहसंस्थेत नाव नोंदवल्याने अभयला खूप सारी स्थळे येऊ लागली. केवळ फोटो पाहून काही स्थळांना अभयने नकार दिला. आता याच्या गळ्यात माळ कोण घालणार? याची चिंता वंदनाताईंना सतावू लागली. 


एक दिवस वंदनाताई गडबडीने घरी आल्या. सुशीलाबाई आणि त्यांच्यात खूप सारी गहन चर्चा झाली. या दोघींच्या चेहऱ्यावरून आनंद नुसता ओसंडून वाहत होता. दोघी खूप उत्साहात होत्या. त्यांनी अभयला काहीही न सांगण्याच्या अटीवर वसंतरावांना आपले गुपित सांगितले. तसा वसंतरावांचा उत्साह दुणावला.


"अभय, हा मुलीचा फोटो पाहून घे. तुझ्या आजीला आणि मला आवडली. दिसायला सुंदर आहे. शिवाय बायोडेटा आणि पत्रिकाही जुळते तुझ्या पत्रिकेशी." वंदनाताई एक फोटो अभयच्या हातात देत म्हणाल्या. 


वसंतराव आणि सुशीलाबाई दोघे अभयचा चेहरा निरखत होते. 


"कशी आहे रे मुलगी? आपल्याच गावची आहे म्हणे." सुशीलाबाई खुदुखुदू हसत म्हणाल्या.


"मग हसायला काय झाले? मुलगी आहे तशी बरी. पण आजी, तुम्हाला पसंत आहे ना? झाले तर मग." अभय फोटो निरखत म्हणाला.


तसा वंदनाताईंचा चेहरा खुलला. "मग मुलगी पाहायला कधी जायचे सांग. त्यानुसार मंडळींना कळवावे लागेल आपल्याला."


बऱ्याच चर्चेनंतर रविवारचा दिवस निश्चित करण्यात आला. अभयला मुलगी आवडली होती. त्याला उगीचच वाटून गेलं, तिचं आणि आपलं काहीतरी खास नातं आहे.


"आई, हे नातं जुळून आलं तर आपले भाग्य म्हणायचे आणि वसंत, तुम्हाला सांगून ठेवते मी सांगितलेलं गुपित अभयला इतक्यात कळता कामा नये. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.

त्याला मुलगी आवडलेली दिसते. आता तिलाही आमचा लेक आवडला की झाले." आज बऱ्याच दिवसांनी वंदनाताई, वसंतराव आणि सुशीलाबाई मनमोकळ्या गप्पा मारत होते. 


इतक्यात पाहुण्यांचा फोन आला. 'रविवारचा कार्यक्रम शनिवारी घेऊ. आम्हीच मुलगा पाहायला येतो.' काहीतरी अडचण होती त्यांची. मग वंदनाताईंनी अभयला विचारुन या बदललेल्या बेताला होकार देऊन टाकला.

--------------------------------


दुसऱ्या दिवशी अचानक सुरेशरावांना घरी आलेलं पाहून वसंतराव चिडले.


"दादा, चुकलो रे मी. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. तोंड दाखवायची आणि माफी मागायची देखील लाज वाटते मला." सुरेशरावांनी वसंतरावांचे पाय धरले.


"वंदना, याला आधी इथून जायला सांग."


"उधळले ना सगळे पैसे? तरीच आलात इथवर.." सुशीलाबाई चिडून म्हणाल्या. हे ऐकून सुरेशराव मान खाली घालून उभे राहिले. 

"तुला माझा मुलगा म्हणायची देखील लाज वाटते सुरेश. हे काय करून घेतलं आहेस? एकदा स्वतःला आरशात बघ. आपल्या मनाशी प्रामाणिक असशील तर स्वत:च्या नजरेला नजर देता येईल. नाहीतर.."


हे ऐकून सुरेशराव सुशीलाबाईंच्या पायाशी वाकले. "कोणत्या तोंडाने माफी मागू आई? मी आयुष्यभर चुका करत आलो आणि तुम्ही सर्वांनी त्या सांभाळून घेतल्या. पैशाच्या हव्यासापोटी मी तुलाही धमकी दिली. राहतं घर विकायला काढलं. दादा - वहिनी होते, तोवर सारं ठीक होतं. पण घर विकलं आणि सगळं बिनसलं. पैशांसाठी मी त्यांना कायमचं दुखावलं."


"मी आधीच सांगितलं होतं. पुन्हा माझ्या दारात यायचं नाही म्हणून. तुझा मुलगा कमावतो ना आता? त्याच्याकडे माग हवं ते. माझ्याकडून काडीचीही मदत मिळणार नाही याला. मला याच तोंड बघायची देखील इच्छा नाही. याला इथून जायला सांग वंदना." वसंतराव मधेच म्हणाले. 


"वहिनी, निदान तू तरी असे वागू नको." सुरेशराव वंदनाताईंना म्हणाले. 


"भाऊजी, आजवर किती सांभाळून घेतलं तुम्हाला. तुम्ही चांगले पांग फेडले याचे. मला जास्त बोलायला लावू नका." वंदनाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. 


सुरेशरावांना कळून चुकलं आपली नाती कायमची दुरावली. ती केवळ आपल्यामुळेच आणि ते तिथून निघून गेले. 


"एक आई म्हणून खूप काळजी वाटते रे सुरेशची. पण त्याची वृत्ती धड नाही. कितीही समजावले तरी पालथ्या घड्यावर पाणी." सुशीलाबाई वसंत रावांना म्हणाल्या.


क्रमशः


आता वंदनाताईंचे गुपित नक्की काय असेल? अभय आणि त्या मुलींत खरंच काही नातं असेल? की आणखी काही? यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका.







🎭 Series Post

View all