सुखद आठवण
नऊ महिने नऊ दिवस उलटले पण डिलिव्हरी काही होईना म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. काळजीपोटी त्यांना म्हणाले, “अहो डॉक्टर, दिवस पूर्ण झाले तरीही अजून डिलिव्हरी कशी काय झाली नाही?”
डॉक्टर म्हणाले, “होतं असं कधी कधी, तारीख मागेपुढे होऊ शकते. तुम्ही काही काळजी करु नका. तुम्ही उद्या सकाळी या आपण बघू काय करायचे ते.”
डॉक्टरांच्या बोलण्यामुळे आम्हाला जरा दिलासा मिळाला. एक रात्र कशी तरी काढली आणि सकाळ होताच मी आणि माझा नवरा दोघांनी पुन्हा हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी मला परत एकदा चेक केले. सगळे नॉर्मल आहे असे सांगितले आणि ते मला म्हणाले, “आपण तुम्हाला कळा चालू व्हायचे इंजेक्शन देऊया. कळा सुरू झाल्या की डिलिव्हरी होण्यास मदत होईल.”
आम्ही म्हणालो, “ठीक आहे डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसं करू पण काही अडचण यायला नको.”
"काही होणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा. हायपर होऊ नका म्हणजे झालं." असे हसत हसत बोलून डॉक्टरांनी मला सलाईन लावली आणि त्यातून इंजेक्शन सोडले. काही वेळातच मला जोराच्या कळा चालू झाल्या म्हणून डिलिव्हरीसाठी मला आत घेण्यात आले. बाळाचे वजन जास्त होते आणि बाळाचे डोके मोठे होते त्यामुळे डिलिव्हरी होण्यात थोडा त्रास होऊ लागला. तब्बल दीड तास प्रयत्न केल्यावर डॉक्टरांना यश आले आणि मला बाळ झाले.
बाळाकडे पाहताक्षणी सोसलेल्या कळांचा मला विसर पडला. कारण माझे बाळ इतके सुंदर दिसत होते की त्याच्याकडे बघून मलाच विश्वास बसत नव्हता की एवढे गोरेपान गुबगुबीत बाळ मला झालेय. बाळाच्या तळहाताचा जो कलर होता तोच कलर संपूर्ण शरीराचा होता. ते इतके गोरेगोरेपान दिसत होते. जन्मत:च त्याच्या डोक्यावर भरपूर प्रमाणत काळेभोर जावळ होते. बाळाचे वजन चार किलो होते.
माझ्या गुटगुटीत बाळाला जेव्हा मी पाहिले तेव्हा जगातील सर्वात मोठे सुख माझ्या पदरात पडले असे फील होत होते. पहिले बाळ अन् तेही मुलगी म्हणून सुरुवातीला मला मुलगा की मुलगी हे सांगण्यात आले नाही. पण नंतर जेव्हा सांगितले तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झालेला.
मला जनरल वार्डमध्ये शिफ्ट केले तेव्हा सगळेजण माझ्या लेकिकडे ‘आ’ वासून पहायचे. कारण एक दोन दिवसांचे बाळ जणू दोन तीन महिन्याच्या बाळाएवढे दिसत होते. काही सिस्टरनी तर तिचा फोटोसुद्धा काढून घेतला होता.
माझ्या आयुष्यात माझ्या मुलीचे येणे हीच माझी संपूर्ण आयुष्यातील खूप गोड आणि सुखद आठवण आहे.
माझ्या लेकीसाठी चार ओळी -
माझ्या जीवनाची कळी
नाजूक कन्या रत्नाने खुलली
तिच्या येण्याने वाटते जणू
वाळवंटातही बाग फुलली
नाजूक कन्या रत्नाने खुलली
तिच्या येण्याने वाटते जणू
वाळवंटातही बाग फुलली
—------
©® सौ. वनिता गणेश शिंदे.