Login

सुखान्त

सुखान्त
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा

शीर्षक - सुखान्त

"अगं मनाली, किती लाडावून ठेवशील लेकीला. उद्या तिला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे." कल्पनाताई आपली सून मिनलला म्हणाल्या.

"अहो आई, गेला तो जमाना. आता मुली शिकतात, नोकरी करतात. तोपर्यंत त्यांच्यात परिपक्वता (मॅच्युरिटी) आलेली असते.मिनल म्हणाली.

"बरं बाई, मला वाटलं तसं बोलले मी."

"काय गं आजी, नेहमीच दुसऱ्याच्या घरी जावं लागणार, दुसऱ्याच्या घरी जावं लागणार असं म्हणत असतेस." स्वरश्री आजीवर लटकेच रागवली.

"तसं नाही गं स्वरश्री.तू तर माझी दुधावरची साय आहेस." असे म्हणत स्वरश्रीला जवळ घेतले. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला.
पण तुमचं ही खरं आहे. काळ बदलला. परिस्थिती बदलली. काळानुसार चालावं लागत.

"तसं नाही गं आजी. मी सहज म्हटलं." स्वरश्री आजीच्या गळ्यात हात टाकून बोलली.

तेवढ्यात स्वरश्रीला तिची आई मिनलने आवाज दिला. स्वरश्री, तुझ्या बाबांना चहा नेऊन दे बरं." हो आई आलेच. असे म्हणत स्वरश्री तिथून निघून गेली.

मिनल व मंदाररावांना दोन मुलं. मुलगी स्वरश्री आणि मुलगा सारांश. सारांश बी. टेक. करत होता. स्वरश्रीने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ती अभ्यासात खूप हुशार होती. पीएचडी झाल्यावर स्वरश्री एका कॉलेजवर लेक्चरर म्हणून रुजू झाली.

दिसायला सुंदर असलेल्या स्वरश्रीचे कॉलेजमधीलच एका लेक्चररवर प्रेम जुळले. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. समर त्याचे नाव. समरला दोन बहिणी होत्या. समरच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आई श्रुतिका ने आपल्या दोन्ही मुलांना वडिलांची उणीव भासू दिली नाही.

एक दिवस "माझे कॉलेजमधील एका सहकाऱ्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार." स्वरश्रीने भीत भीतच ही आपल्या आई वडिलांना सांगितली व विवाहाला संमती मागितली. दोघांनीही या विवाहाला संमती दिली.

अशारितीने समर व स्वरश्री विवाहबद्ध झाले. स्वरश्रीचा भाऊ सारांशनेही आपले शिक्षण पूर्ण केले. त्यालाही लवकरच लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली.आता मिनल व मंदाररावांची काळजी मिटली होती. लवकरच सारांशचेही लग्न उरकून टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि सान्वी नावाच्या मुलीशी सारांशचे लग्न पार पडले.

सारांश व सान्वी, समर व स्वरश्री दोघेही आपापल्या संसारात खुश होते. पण नियतीला वेगळेच मंजूर होते. स्वरश्रीच्या लग्नाला एक वर्षही व्हायचे होते.अल्पशा आजाराचे निमित्त होऊन समरचा मृत्यू झाला. स्वरश्रीवर तर आभाळच कोसळले. मिनल व मंदाररावांनाही खूप मोठा धक्का बसला. आजी कल्पनाताईने तर अंथरूणचं पकडले. समीरच्या मृत्यूने स्वरश्री अगदी वेडीपिशी झाली होती. तिने स्वतःला घरात कोंडून घेतले. काय करावे कोणालाच कळेना. स्वरश्रीच्या सासूबाई सुलोचनाताई, "पांढऱ्या पायाची, माझ्या मुलाला हिने गिळले. असे अगदी मनाला वाटेल तसे बोलत. शिक्षित असूनही बुरसटलेल्या विचारांचे प्रदर्शन करून स्वरश्रीवर राग काढत होत्या. स्वरश्रीच्या दोन्ही नणंदा सपनाताई व सोनियाताई मात्र आईला समजावायच्या.

" आई, तुला असं कसं बोलवते गं ? स्वरश्री आधीच दुःखी आहे तिला असे काही म्हणू नको. अगं समीरचे आयुष्यच तेवढे असेल. त्यात स्वरश्रीचा काय दोष? पण सुलोचनाताई कुणाचेच ऐकायला तयार नव्हत्या.

मिनल व मंदारराव या आकस्मिक धक्क्याने फार कोलमडून गेले होते. परंतु त्यांनी मन पक्के केले व स्वरश्रीला माहेरी आणण्याचे ठरवले. स्वरश्री माहेरी आली.आता मंदाररावांनी स्वरश्रीच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. आणि तिची बदली आपल्याच शहरात करून घेतली.

सारांशची पत्नी सान्वी सुरुवातीला स्वरश्री सोबत चांगली वागली. परंतु हळूहळू तिचे वागणे बदलले. तिला स्वरश्रीचे आपल्याकडे राहणे आवडले नाही. सान्वीचे वागणे हळूहळू सर्वांच्याच लक्षात आले. सारांश सान्वीला खूप समजवायचा. परंतु सान्वी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्यापुढे मंदारराव आणि मिनलही हतबल झाले.

स्वरश्रीची अवस्था बिकट झाली होती. "ना धड माहेर, ना धड सासर." शेवटी मंदाररावांनी तिच्यासाठी एक वेगळा फ्लॅट रेंट ने घेतला. स्वरश्रीचे कशातही मन लागेना. नोकरीतूनही तिने एक वर्षासाठी ब्रेक घेतला. सारखे सारखे त्याच विचारात राहून ती अगदी एकलकोंडी झाली होती.

डॉक्टरांनी स्वरश्रीच्या आई-बाबांना सांगितले की, आपल्याला स्वरश्रीला या परिस्थितीतून बाहेर काढायच आहे.अन्यथा काहीही होऊ शकते. खरंतर अशावेळी स्त्रिला आधाराची खरी गरज असते. अशावेळी सासरच्यांनी, माहेरच्यांनी अगदी ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. नाहीतर अशा असहाय्य अवस्थेत ती टोकाचे पाऊल उचलू शकते.जेव्हा ही गोष्ट स्वरश्रीच्या दोन्ही नणंदेला कळली. त्या स्वरश्रीच्या घरी आल्या.

अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांनी स्वरश्रीला समजावले. "अग स्वरश्री समरला जाऊन जवळपास एक वर्ष होत आहे. तू किती दिवस अशी त्याच्या विरहात राहणार. तू स्वतःच्या मनाला धीर दे व यातून बाहेर निघ."आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत.

इतकेच नव्हे तर त्या दोघीनीही तिला आपल्या घरी चलण्याचा आग्रह धरला आणि अगदी बळेबळेच
आपल्या घरी घेऊन आल्या. काही दिवस सपनाताईंनी तिला आपल्या घरी ठेवलं तर काही दिवस ती सोनिया ताईंकडे राहिली.

हळूहळू स्वरश्रीच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली.या भयंकर धक्क्यातून दोघींनीही तिला पूर्णपणे बाहेर काढले व पुन्हा नोकरीवर जाण्याचा सल्ला दिला. स्वरश्री आता पुन्हा कॉलेजमध्ये जाऊ लागली.

स्वरश्री पूर्णपणे सावरल्यानंतर हळूच एक दिवस सपनाताईंनी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला. "स्वरश्री, तू मला मोठी बहीण समज. मला वाटतं तू आता दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर बरे होईल."

सोनियाताईंनीही दुजोरा दिला."अगं स्वरश्री एवढ्याशा वयात तुला वैधव्य आलं. अजून तुझ्यापुढे संपूर्ण आयुष्य पडले आहे.आम्ही चांगला मुलगा शोधून तुझे लग्न लावून देऊ."

सुरुवातीला स्वरश्री तयार होईना. परंतु हळूहळू ती यावर विचार करू लागली.

"ताई म्हणत आहे तेही खरे आहे. आयुष्यात जोडीदाराच्या मदतीची खूप गरज असते."

सासूबाई तर आपले तोंडही पाहायला तयार नाही. आपले आई वडील आपल्याला किती दिवस साथ देणार. त्यांचंही वय झालं. तेही आता थकले आहेत. भाऊ सारांश आणि वहिनीचीही आपल्याला साथ नाही.

शेवटी तिने लग्नाचा निर्णय घेतला. सपनाताई, सोनियाताई आणि त्यांच्या मिस्टरांनी स्वरश्रीसाठी चांगले स्थळ शोधायला सुरुवात केली.स्वरश्रीला अगदी अनुरूप मुलगाही मिळाला. शेखर त्याचे नाव.

शेखर आयटी क्षेत्रात काम करणारा समजूतदार मुलगा होता. त्याचे आई-वडीलही आधुनिक विचारांचे होते. सर्वांच्या अनुमतीने स्वरश्री व शेखरचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले.


आपल्या दोन्ही नणंदेच्या पायावर डोके ठेवून स्वरश्रीने त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना बिलगून ती रडू लागली. "ताई तुम्ही अगदी पाठच्या बहिणीप्रमाणे माझ्या मागे उभ्या राहिलात. खरंच तुमचे उपकार कोणत्या शब्दांत वर्णन करू मी." मागच्या जन्मात तुम्ही नक्कीच माझ्या बहिणी असाल. "अगं स्वरश्री, वेडी आहेस का तू? आमचे उपकार मानण्यापेक्षा आम्हीच तुझे उपकार मानायला हवे." कारण तू लग्नाला तयार झालीस हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आमचा भाऊ वरून हे सर्व पहात असेल तेव्हा अर्थातच त्यालाही आनंद होईल. तू आता सुखाने संसार कर. हो ताई. स्वरश्री म्हणाली.

स्वरश्री व शेखरने आजीचे आशीर्वाद घेतले.स्वरश्री आजीला बिलगून रडू लागली. ती आजीला म्हणाली, आजी आता तू लवकर बरी हो. माझी काळजी करू नको.नंतर स्वरश्रीने व शेखरने आई-बाबांचे आशीर्वाद घेतले.

सारांशच्या मनात अपराधीपणाची भावना दिसून येत होती. सान्वीच्या विचित्र वागण्यामुळे तो मनातल्या मनात दुःखी होता. सारांशला बिलगून स्वरश्री रडू लागली. सान्वी अगदी निर्विकारपणे त्यांच्याकडे पाहत होती. स्वरश्रीने साश्रू नयनांनी सर्वांचा निरोप घेतला व शेखर सोबत जायला निघाली.

समाप्त.

सौ. रेखा देशमुख
0