#अनुभव
सुखासीन आयुष्य जगताना...
काही तारखा, दिवस, प्रसंग असे असतात की आपण विसरूच शकत नाही. यातील काही आठवणी मनाला उल्हासित करणाऱ्या असतात, तर काही आठवणी जखमांवरची खपली काढून पुन्हापुन्हा दुखावतात.
असाच एक दिवस ज्याने मला बऱ्याच गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवल्या, तो म्हणजे ऑगस्ट २०१७ मधील रक्षाबंधनाचा दिवस! आपण जे आयुष्य जगतोय त्याहून वेगळे पैलूही या आयुष्याला असतात, हे सांगणारा हा दिवस नेहमीच लक्षात राहील.
कॉलेजमध्ये मी एन.एस.एस. अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक होते. आमच्या कॉलेजकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जायचे. म्हणजे अजूनही केले जातेच. यांपैकीच एक म्हणजे दरवर्षी नेरे, पनवेल येथील जवळच्याच आश्रमाला भेट देणे. शांतिवन नावाच्या या आश्रमात लहान मुलांसोबत हा दिवस साजरा केला जातो. यासोबतच येथील वृद्धाश्रमालादेखील भेट दिली जाते आणि हीच भेट विचार करायला लावणारी ठरली.
असं नव्हतं की कधी वृद्धाश्रमाविषयी ऐकलंच नव्हतं. त्याविषयी मनात काही विचार अगदी पक्केही होतेच. राग, चीड, असं बरंच काही अर्थात तोपर्यंतसुद्धा होतंच. तरीही म्हणतात ना, एखाद्या गोष्टीची खरी दाहकता त्या गोष्टीला स्वतः अनुभवल्यानंतर जास्त चांगल्या प्रकारे कळते. असंच काहीसं माझंही झालं होतं. आईवडील आपल्यापर्यंत काही गोष्टींची झळ पोहचू देत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात कधी या विषयासोबत संबंध आलाच नव्हता. मात्र यानिमित्ताने पहिल्यांदा मला जवळून आयुष्याचे हे काही पैलू पाहायला मिळाले.
अजूनही आठवतंय की जाताना प्रवासामध्ये आमची मस्ती बघून आमचे एक सर म्हणाले होते, “जाताना इतकं हसत जात आहात; पण येताना तुमचे चेहरे असे दिसणार नाहीत.” आम्ही तेव्हा त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवाच्या बोलांना इतकंही मनावर घेतलं नव्हतं; पण परतीच्या प्रवासात मात्र सरांचे शब्द जसेच्या तसे आठवत होते. त्याला कारणही तसंच होतं.
आम्ही आश्रमात पोहोचलो आणि आश्रमाची जुजबी ओळख, व्यवस्था वगैरे पाहणं झालं. प्रत्येक विभागाचं काम पाहून छान वाटत होतं. आश्रमातील लोकांच्या कामाबद्दल ऐकून काहीसं कौतुकही वाटत होतं. मात्र खरी ओळख तर प्रत्येकासोबत संवाद साधताना झाली. एक काकू दोनच वर्षांपूर्वी तिथे दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत बोलताना समजलं की त्यांचा मुलगा वारल्यानंतर सुनेने घरातून बाहेर काढलं, कारण घर तिच्या नावे झालं होतं. एक काकी तर तीन दिवसांपूर्वीच आल्या होत्या. त्यांच्या मुलाने घराबाहेर काढल्यावर जेव्हा मुलीनेही थारा दिला नाही हे ऐकलं, तेव्हा मनात एकच विचार आला की यापेक्षा तर तो नटसम्राट कदाचित बराच होता नाही का! निदान तिथे मुलीने घरात घेतलं तरी होतं. इथे मात्र कोण आपलं आणि कोण परकं हा प्रश्नच उपस्थित झालेला. कधीकाळी चांगल्या नोकरी करणाऱ्या इतरही काही व्यक्तींना तिथे तसं हतबल पाहून मनात खळबळ माजली होती. कोणी आजाराने त्रस्त होतं तर कोणी मनातील एकटेपणाने! चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून जात होते. जरी त्या नव्या परिवारात ते सर्व जण आनंदाने राहत असतील, तरी त्यांच्या मनातला कल्लोळ आपण खरंच समजू शकतो का, असा प्रश्न मनात आला.
काय नव्हतं त्यांच्याकडे? सगळं काही तर होतं. तरीही आयुष्याच्या या वळणावर आपल्या हाडामासाच्या गोळ्यांकडून अशी वागणूक मिळणं मनाला यातना देणारं होतं. नकळत मन स्वतःच्या आयुष्यासोबत तुलना करू लागलं. आजीची सेवा करणारी माझी आई आठवली. जिवंतपणी आईवडिलांना योग्य ते सुख द्यावं या विचारांचे स्वतःचे आईवडील आठवले आणि स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटला. तसं पाहायला गेलं तर खूप साधीशी गोष्ट होती; पण आजच्या या जगात चांगलं आणि वाईट दोन्ही अगदी बरोबरीने अस्तित्वात आहे याची जाणीव करून देणारी ही गोष्ट होती. इतर वेळी 'आपलं कुटुंब' या अर्थाने पाहताना स्वतःच्या कुटुंबातील बऱ्याच गोष्टी तितक्या आदर्श किंवा मोठ्या वगैरे वाटत नाहीत. हेच जेव्हा तुलना करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र आपण कोणतं आयुष्य जगतोय हे तीव्रतेने जाणवतं.
सर जसे म्हणाले होते, अगदी तसाच अनुभव आला. परतीच्या प्रवासाला लागल्यावर ते हसणं खिदळणं कुठेतरी हरवून गेलं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यांतून ओलावा साफ झळकत होता. काही गोष्टी मनातून जाणवायला हव्या, तशाच या भावना पण मनातूनच होत्या.
खरंच, या दिवसामुळे मनात बरेच निश्चय दृढ झाले. पुन्हापुन्हा त्यांच्या भेटीला जाताना मनाचं समाधान काय असतं, हेही शिकायला मिळालं आणि बरंच काही! एकूणच काय, तर सुखासीन आयुष्य जगताना त्याची किंमत कळणं काय असतं, हे या दिवसाकडून मी शिकले.
हा प्रसंग लेखणीतून थोडक्यात एका लघुकथेमार्फत उतरवण्याचाही प्रयत्न केला होता. ज्यावर मिळालेल्या काही प्रतिक्रिया पाहून लिहिणं सार्थकी लागलं म्हणू शकते.
© कामिनी खाने
© कामिनी खाने
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास ईराकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा