Login

सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही

तुझ्याकडे मागे कामाला होती ,पण तू फार कटकट करते असं म्हणाली.
सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही—
-
सुरेखाबाई सारख्या आत-बाहेर चकरा मारत होत्या, तोंडाने बडबड ही चालूच होती” यांचे हे असंच असतं ,कामाची काही आहे कां काळजी? , नऊ वाजून गेले स्वयंपाक कसा होणार?” —

खरंतर सुरेखा बाईंच वय झालं होतं स्वयंपाक करण त्यांनी कधीचच सोडल होत पण् तरीही ताबा, तो म्हणजे घराचा सोडला नव्हता. , अंगातला सर्व जोर बोलण्यात.
एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की तो थांबत नसे.

‘आज कोणावर?’

थांबा - थांबा, आता तुमचा अंदाज असेल, ही सगळी मुक्ता फळ सुनबाई करता असणार !पण यावेळी तुम्ही चुकला, कारण सुनबाई शैला तर स्वयंपाक आटपून ऑफिस ला जायच्या तयारीला लागली होती.
ही सगळी चिडचिड कामवाली रखमासाठी होती..

रोज आठ वाजता येणारी रखमा अजून साडेनऊ वाजत आले तरी उगवली नव्हती. तिला झालेला उशीर पाहून शैला ने कामापुरती भांडी घासून घेतली व स्वयंपाक करून घेतला होता.

रखमा समोर दिसताच सुरेखा बाईंनी बॉम्ब फोडला “अगो घड्याळ पहा !म्हणजे तुझा मोबाईल त्यात आहे ना घड्याळ? की नुसतेच गप्पा मारायला आहे तो?”

रखमाला आज घरून निघायला उशीर झाला होता घरात सासूची कटकट आणि इकडे यांची. आता तिचेही डोके जरा सटकले.
“काय आजी एक दिवस उशीर झाला तर इतकी बोंबाबोंब कशापाई?”

“म्हणजे काय अगं ठरलं होतं ना कामावर लावताना? तेव्हा तर अगदी खूप म्हणाली होती की आठच्या ठोक्याला तुमच्या घरात पाय ठेवीन.”
“ हो आजी पण माणूसच आहे ना मी पण .” होतो कधितरी उशीर.

तेवढ्यात शैलाने इशाऱ्याने रखमाला आत बोलवून घेतले व नको बोलू म्हणत चहाचा कप तिच्या हातात दिला व ती ऑफिसला जायला निघाली.

रखमा पटापट कामे अटपू लागली. सुरेखा बाई तिथेच उभे राहून तिचे काम पाहत होत्या.
“ अगं जरा जोर लाव भांड्यांना नुसते साबणाने विसळते. आणि या सोफ्याच्या खालचा केर काढलाच नाही?”
आज एकतर उशीर झालेला होता आणि दुसरं आजींचं बोलणं रखमाचे ही डोके पार सटकले , ती म्हणाली “आजी तुम्ही दुसरी कामवाली पहा ना,२००० पेक्षा कमीत नाही मिळणार “.

“हो हो -पाहीन ना तुला काय वाटतं तुझ्यासारख्या छप्पन मिळतील.”
त्यांच्या या अश्या स्वभावाला कंटाळून आधी पण दोन-तीन कामवाल्या सोडून गेल्या होत्या.

सुरेखा बाईंना कामवाली तर हवी होती पण कशी, काम स्वच्छ हव, पैसे कमी घेणारी आणि जे काम सांगू ते निमुटपणे करणारी खाडे न करणारी. आणि त्यांची बडबड ऐकून घेणारी..

पण महागाईच्या या जमान्यात इतक्या कमी पैशात अशी मिळणार कशी ?आहे तीच टिकवून घ्यावी ना पण हे त्यांना कोण समजवणार?

रखमा काम करून निघून गेली ,

दुसरे दिवशी दहा वाजायला आले तरी रखमा आलेली नव्हती. शैलाही ऑफिसला गेलेली आता काय करावे?
सुरेखा बाईंनी समोरच्या बिल्डिंग मधल्या पुष्पा लिमये कडे फोन केला, रखमा तर केव्हाच काम करून गेली असे त्यांनी सांगितले, वर पुष्पा ताईं खोचक पणेम्हणाल्या “का ?तुमचं घर सोडलं का तिने, न सांगता ?काय बाई कमाल आहे ना!आजकाल ह्या काम वाल्यांचे मिजाज फार संभाळावे लागतात, वगैरे उपदेशाचे डोज दिले..

आता काय करावे सुरेखा बाईंना वाटले उगाचच भोचक पुष्पी ला विचारले आता ही सर्व दूर वाटत फिरेल.”

आलीयासी असावे सादर म्हणत कशीबशी भांडी घासली, उभे राहून पाय दुखायला लागले होते सुरेखा बाईंचे, पण सांगणार कोणाला?”

संध्याकाळी त्या काही बोलल्या नाही पण एकूण घराची व त्यांची अवस्था व पाहून शैला ला अंदाज आलाच.

दुसऱ्या दिवशी शैलाने ने रखमाला फोन केला त्यांचे काय बोलणे झाले ते सुरेखा बाईंना समजले नाही त्या आशेने शैला कडे पाहू लागल्या.
शैला किचनमध्ये गेली व भांडी घासू लागली त्यावरून सुरेखा ताईने अंदाज लावला पण स्पष्ट विचारण्याचे त्यांना धाडस झाले नाही..

फार डोक्यावर बसल्या आहेत या कामवाल्या म्हणत त्यांनी दोन-तीन मैत्रिणींना कामवाली विषयी विचारपूस केली पण कोणीही रिकामी नसल्याचे कळले .
आशा खवचटपणे म्हणाली “अगं एकीला विचारले तुझ्याकडे मागे होती ती कामाला पण् तू फार कटकट करते असं म्हणत होती”.

दोन-तीन दिवस झाले आता सुरेखा बाईंचा धीर व अंगातली शक्ती दोन्ही संपुष्टात आली. मुलं व शैला ही कंटाळली होती.

शनीवारी सुरेखा बाई रस्ते पलीकडच्या देवळात जात असत. आज जरा लवकरच निघाल्या मनात होते पाहू कोणी कामवाली भेटते कां?
परत येताना रस्तेवर इकडे तिकडे पाहताना त्यांचा पाय घसरला, अगदी पडणारच तेवढ्यात कोणीतरी धरलं .
‘आजी अहो केळीच साल पडलं होतं. सुरेखा बाईंना चक्कर आल्यासारखं होत होतं त्यांनी पाहिलं रखमा त्यांचा हात धरून उभ करत होती ती त्यांना धरून घरी घेऊन आली .

शैला कामावर निघतच होती. ‘काय झालं तिने विचारले ?’
‘पाय मुरगळलेला वाटतोय.’

शैला गोळी शोधून देत म्हणाली ‘ही घ्या व पडून रहा मी येतेच दोन तासात, हाफ डे घेऊन’.

रखमा स्वयंपाक घरातून पाणी व गोळी देत म्हणाली ‘आजी पडून रहा मी क्रीम लावून देते’.
तिने प्रेमाने क्रीम लावून दिले सुरेखा बाई पाहत होत्या. रखमाने इतक्या प्रेमाने सर्व केले आपण हिला किती बोललो,त्यांनी तिचा हात घट्ट धरला पण बोलल्या काहीच नाही..डोळे मिटून पडून राहिल्या .मनात आलं आता पुढच्या महिन्यात पैसे वाढवून देऊ, पण् बोलल्या कांहीं नाहीं..

रखमाने भांडी घासून ,केर, लादी सर्व केलं.

‘आजी मी दोन घरचे करून येते ‘म्हणत निघून गेली.
काम करून परत आली तेव्हा दोन तास उलटले होते.
‘ आजी उठा, घ्या चहा, बरं वाटेल म्हणत तिने चहा दिला तेवढ्याच शैला ही परत आली.

‘ कसं वाटतंय आता?
बऱ च् ठीक आहे उद्यापर्यंत बरं वाटेल. चहा पिऊन रखमा म्हणाली मी निघू आता ?

असे विचारताच शैला काही बोलणार तेवढ्यात सुरेखाबाई ठसक्यात म्हणाल्या” हो- पण उद्या उशीर करू नको, आणि तुझे दोन दिवसाचे खाडे झाले आहेत मी लिहून ठेवेन.’असं सुरेखा बाईंनी म्हणता शैला व रखमा एकमेकींकडे पाहून हसल्या, शैलाने डोक्यावर हात मारला. रखमा मनात म्हणाली इतकं सगळं घडलं पण्”सुंभ जळाला तरीपण पीळ कायम आहे…
—----------------------------------------------