कान्हा तुला याचना (कविता)

याचना
तापली उन्हे करपले शेत जाळती मने उन्हाच्या झळा
रानोरानी सान पाखरे फिरफिर फिरती शोधण्या जळा

पशू खंगले गवत वाळले हिरवा चारा दिसेना कुठे
कसे मिळावे चारा पाणी सूर्य कोपला निवारा कुठे

नाही गोकुळ नाही गोपी दिसला नाही कुठेच कान्हा
गोपालक तो असुन का पण जाळते उन सुकला पान्हा

तिन्ही जगाचा पालक कान्हा कसा हरवला कुठे लोपला
उन्हात फिरुनी गोपगोपिका घाम गाळून जीव चालला

धावत ये रे सख्या श्रीहरी करांगुलीवर घे गोवर्धन
मनास खचल्या जीवा थकल्या उन्हापासून दे संरक्षण

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे