मागील भागात आपण पाहिले की संहिता मधूकाकांशी काकूंबद्दल बोलते. मीनाआत्याने मंथनला सिगारेट ओढताना पकडले असते. आता बघू पुढे काय होते ते.
" काय? कसला विचार चालू आहे?" बेडवर पडलेल्या संहिताचे लक्ष वेधून घेत विशालने विचारले.
" कुठे काय? उगाचच."
" हो का? पण तुझ्या चेहर्यावर काहीतरी वेगळेच दिसत होते. बोल पटकन." विशाल संहिताच्या केसांतून हात फिरवत म्हणाला. संहिताने त्याला दिवसभर घडलेल्या घटना सांगितल्या. त्या ऐकून विशाल गंभीर झाला.
" संहिता, तू यामध्ये पडू नयेस, असं मला वाटतं."
" का? " संहिताने आश्चर्याने विचारले.
" संहिता, हे कुटुंब आहे. आपण एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाणं वेगळं, मजा करणं वेगळं आणि कोणाच्या खाजगी गोष्टीत बोलणं वेगळं. तू सध्या खाजगी आयुष्यात बोलते आहेस."
" पण ही जर आपली माणसे आहेत तर मग यांच्या अडचणी दूर करणं आपलं कर्तव्य नाही?" आश्चर्याने संहिताने विचारले.
" खूप रात्र झाली आहे. मला उद्या ऑफिस आहे. झोप आता." विशाल तोंड फिरवून झोपायला गेला. संहिता बघतच बसली. माझी माणसं म्हणणारा विशाल हाच का? तिच्या मनात विचार आला. दुसर्या दिवशी ऑफिसला जातानाही विशाल फारसा संहिताशी बोलला नाही. संहिताला थोडे वाईट वाटले, पण तिने त्याची नंतर समजूत काढायचे ठरवले. आता मात्र तिचा फोकस होता मंथनवर.
" मंथन, माझ्यासोबत जरा बाहेर येतोस का?" आपल्या खोलीत पुस्तक डोळ्यासमोर ठेवून बसलेल्या मंथनला संहिताने विचारले.
" आईला विचार. तिने कॉलेजला सुद्धा नाही जाऊ दिले आज." आई चिडल्याचे दुःख मंथनच्या चेहर्यावर दिसत होते.
" मी विचारलं आहे काकूंना. त्यांचा विचार बदलायच्या आधी चल लवकर." संहिता मंथनसोबत घराबाहेर पडली.
" तू पण चिडली आहेस का वहिनी माझ्यावर?"
" मी का चिडू? तोंड तुझे, सिगरेट ओढणार तू. माझा काय संबंध?"
" पण वहिनी.. मी खरंच फक्त हातात घेतली होती." मंथन बोलत होता.
" हे बघ मंथन सिगरेटचे दुष्परिणाम तुलाही माहित आहेत मलाही. तुझं तू ठरवायचं आहे काय करायचं ते. मी तुला बाहेर आणलं आहे काव्याबद्दल विचारायला. तिचे काय सुरू आहे सध्या?"
मंथन बोलत नाही म्हटल्यावर संहिताने परत विचारले.
मंथन बोलत नाही म्हटल्यावर संहिताने परत विचारले.
" तुला नाही सांगायचे तर तसं सांग. परत विचारणार नाही."
" वहिनी, काव्या फेल झाली आहे सेमिस्टर मध्ये. तिच्या कॉलेजमधून तक्रार आली आहे , ती लेक्चरला बसत नाही अशी."
" तिचं काही अफेअर?" संहिताने विचारले.
" अजून तरी नाही. पण ती सतत भटकत असते. आईचं ऐकत नाही. बाबांना जर समजलं तर ते मारतील तिला खूप म्हणून आई त्यांच्या कानावर घालत नाही. आत्याने जर माझ्याबद्दल बाबांना सांगितले ना तर मला नक्की मार बसणार." कल्पनेनेही मंथन घाबरला होता.
" बाबा मारतात?" सतत हसणारे चंदूकाका मारतही असतील यावर संहिताचा विश्वास बसत नव्हता.
" हो.. म्हणून मला लवकर मोठं होऊन इथून बाहेर पडायचं आहे."
" मग मोठं होण्यासाठी सिगारेट ओढणं बरोबर आहे? ते ओढून तुझा ताण तात्पुरता जाईल. पण नंतर काय?" संहिता बोलत होती. तसा मंथनचा चेहरा पडला.
" ते मित्रांनी खूप आग्रह केला म्हणून."
" उद्या मित्र जीव द्यायला सांगतील. देशील का? जे मित्र तुला चुकीच्या मार्गावर नेत आहेत ते चांगले?"
" वहिनी, मी प्रॉमीस करतो मी नाही ओढणार सिगारेट परत." ते ऐकून संहिताच्या चेहर्यावर हसू आले.
" प्रॉमीस करतो आहेस पण पाळशील कितपत?"
" वहिनी, नक्की पाळणार. तू मला बाहेर याच्यासाठी आणलं होतंस?"
" हो पण आणि नाही पण. मला काव्याचे कॉलेज बघायचे आहे."
" आत्ता?"
" हो.."
संहिता आणि मंथन दोघे काव्याच्या कॉलेजपाशी गेले.
" काव्याला फोन करू का?" मंथनने विचारले.
" तू नको करूस , मीच करते." संहिताने काव्याला फोन लावला.
" हॅलो वहिनी."
" काव्या, अग आहेस कुठे?"
" कुठे म्हणजे काय? कॉलेजमध्ये. लेक्चर चालू होईल माझे आता. ब्रेक होता म्हणून बाहेर आले होते."
"कॉलेजच्या कँटीनमध्ये आहेस का?"
" असं का विचारते आहेस तू?"
" अग तुझ्या आवाजासोबत दोन चहा, तीन कॉफी असे आवाज आले म्हणून विचारलं."
"हो.. हो. कँटीनमध्येच आहे. चल ठेवू फोन?" काव्याने घाईघाईत फोन ठेवला.
" मंथन चल." संहिता त्याला घेऊन कॉलेजच्या आत गेली. प्रिन्सिपल सरांना भेटायचे आहे सांगितल्यावर पालक म्हणून त्यांना आत सोडले.
" मंथन, मी सरांना भेटते. तू काव्या कँटीनमध्ये आहे का बघ. तसा मला मेसेज कर."
प्रिन्सिपल सरांना भेटून आलेली संहिता चिंतेत होती. मंथनच्या म्हणण्यानुसार काव्या कँटीनमध्ये नव्हती. लेक्चरला तर गेले काही दिवस ती बसतच नव्हती. "काय चालू आहे या काव्याचे?" संहिता विचार करत होती. संहिताने न राहवून काव्याला परत फोन केला. यावेळेस तिने उचलला नाही. त्यावर मेसेज आला, लेक्चर सुरू आहे.
" मंथन, तुझ्याकडे काव्याच्या कोणत्या मित्रमैत्रिणींचा नंबर आहे?"
" तिच्या एका मित्राचा आहे."
" त्याला फोन लावून बघ सध्या काव्याचे काय सुरू आहे ते."
" वहिनी..." फोनवर बोलून झाल्यावर मंथनने हाक मारली. दोघे घरी आले. संहिता काकूंशी बोलायला म्हणून गेली. काकांचा चढलेला आवाज बाहेरपर्यंत ऐकू
येत होता.
येत होता.
" काम काय असतं तुला? फक्त दोन मुलांकडे लक्ष ठेवायचं ते ही जमत नाही? ही तुझी मुलगी कुठे गेली होती ते ही माहित नाही? आज मला रस्त्यात दिसली म्हणून घरी घेऊन आलो. तो दिवटा काय सिगारेट ओढतो. येऊ दे त्यालाही. नाही फोडून काढलं तर बघ." काकांचं लक्ष दरवाजात उभ्या असलेल्या मंथनकडे गेलं.
" या, आत या. सिगारेट ओढायला शिकलात म्हणे तुम्ही. फार मोठे झालात का?" काकांनी मंथनवर हात उगारला तोच संहिता मध्ये पडली. ते बघून नेहाकाकू घाबरल्या.
" संहिता, तू नको मध्ये पडू."
" काकू, मला मध्ये पडायचे नाहीच. पण वयात आलेल्या मुलांवर विनाकारण हात उगारणे बरोबर आहे का?"
" संहिता.."
संहिता वाचवू शकेल मंथन आणि काव्याला काकांच्या रागापासून? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा