Login

सून मी या घरची.. भाग ९

कथा घराला बांधून ठेवणाऱ्या सूनेची


सून मी या घरची.. भाग ९


मागील भागात आपण पाहिले की आत्या संहिताला वाटेल तसे बोलते. विशाललाही संहिताचा राग आलेला असतो. आता बघू पुढे काय होते ते.

" संहिता, मी तुझे डोळे झाकणार आहे." विशाल संहिताला म्हणाला. संहिताचे डोळे झाकून तिला बेडरूममध्ये नेले. विशालने तिच्या डोळ्यावरचा हात काढला. संहिता बघतच राहिली. काव्या, मंथन आणि विशालने मिळून खोली सजवली होती. मध्ये केक ठेवला होता. ती आत येताच मंथनने फुगे फोडले. सुनिताताईंनी संहिताच्या आईबाबांना व्हिडिओ कॉल केला होता. आपल्या मुलीचे कौतुक ते डोळे भरून बघत होते. केक कापून झाल्यावर सगळे निघून गेले. खोलीत फक्त विशाल आणि संहिताच होते. विशाल एकटक तिच्याकडे बघत होता. त्या नजरेने विचलित झालेली संहिता उठली.

" मी केक ठेवून येतेच."

" केक नंतर पण ठेवता येईल आधी वाढदिवसाचे गिफ्ट तर देऊ दे." विशाल संहिताजवळ आला. संहिताने डोळे बंद केले.

" डोळे मिटून घेण्यासारखे काहीच नाहीये." विशाल मिस्किलपणे संहिताच्या कानात कुजबुजला. संहिताने कृतककोपाने त्याच्याकडे बघितले. विशालने संहिताच्या हातात डबी दिली. तिने ती उघडली. त्यात ह्रदयाच्या आकाराचे एक पेंडण्ट होते.

" उघड.."
संहिताने ते उघडले तर आत दोघांचेही फोटो होते.

"आपण दोघेही या ह्रद्यासारखे एकरूप होऊ यात ना? इतर कोणामुळेही आपले नाते नको बिघडायला. प्लिज.." विशाल म्हणाला.

" पटलं मला. इतरांसाठी तुझ्या नि माझ्यात दुरावा नको." विशालच्या मिठीत जात संहिता म्हणाली.

" नशीब माझं तुला पटलं हे. नाहीतर नुसतं धाकधूक होत होतं. कशी रिॲक्ट होशील म्हणून."

" मी काय एवढी खाष्ट आहे?" संहिता त्याच्या छातीवर बुक्का मारत म्हणाली.

" एवढी नाही.. ते सिरियलमधली सासू असते ना फक्त तेवढीच." विशाल मस्करी करत म्हणाला.

" थॅंक यू.. मला हे सर्व खूप आवडलं." विशालच्या छातीवर डोकं ठेवत संहिता म्हणाली.

" ही तर फक्त सुरूवात आहे. उद्या तर खरी धमाल आहे."

" काय आहे सांग ना."

" आत्ताच सगळं सांगितलं तर मजा काय? उद्या सकाळी समजेलच."

सकाळपासून संहिता फक्त फोनवर बोलत होती. विशालने सगळ्यांनाच सुट्टी घ्यायला लावली होती बहुतेक. दुपारी सगळेच जेवण्यासाठी एकत्र आले होते. जेवण जरी बाहेरून मागवलं होतं तरी सुनिताताई आणि नेहाकाकूने मिळून संहिताच्या आवडीच्या सुरळीच्या वड्या आणि ओल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या. सगळे गप्पा मारत बसले होते. अचानक आलेल्या मधूकाकांना बघून सगळे गप्प झाले. नेहमीप्रमाणे ते एका कोपर्‍यात जाऊन बसतील असे सगळ्यांना वाटले. पण तसे न करता मधूकाका चंदूकाकांच्या शेजारी बसले.

" मला बघून गप्प का बसलात? चालू ठेवा तुमच्या गप्पा.. मंथन तुझा हा बाप त्या दिवशी तुला सिगारेटवरून ओरडला म्हणे." तो विषय ऐकून मंथनने मान खाली घातली. आता मधूकाका काय बोलतील या विचाराने संहिताला टेन्शन आले.

" अरे, मान खाली काय घालतोस? याने कॉलेजमध्ये काय पराक्रम केले आहेत ते ऐकलेस तर समजेल की तू ही याचाच मुलगा आहेस."

" दादा, नको ना त्या जुन्या आठवणी." चंदूकाका अस्वस्थ होत म्हणाले.

" काकू, तू सांगतेस की मी सांगू?" मधूकाकाने आजीला विचारले.

" ती गोष्ट तुझ्याच तोंडून ऐकण्यात मजा आहे. सांग तूच." काका बोलायच्या आधीच त्यांना काय सांगायचे आहे ते ओळखून आजी हसू लागली. मधूकाका जुन्या गोष्टी सांगत होते आणि त्यांचे किस्से ऐकून सगळे खोखो हसत होते. ते बघून शैलाकाकूंच्या डोळ्यात पाणी आले. पण यावेळेस ते आनंदाश्रू होते.

" मी आलेच.." असं म्हणत शैलाकाकू बाहेर गेल्या. पहिली पंगत झाली तरी त्या आल्या नाहीत म्हटल्यावर सुनिताताई आणि नेहाकाकूंना टेन्शन आले.

" कुठे गेल्या असतील वहिनी?"

" मी बघून येते पटकन." नेहाकाकू म्हणाल्या.

" ही घ्या गरमागरम बासुंदी.. मी केलेली आहे, माझ्या हाताने." बोलताना देखील शैलाकाकूंच्या आवाजात आज अभिमान होता.

" आई, अगदी छान झाली आहे." कधी नव्हे ते अनिश बोलला.

" हो.. सुरेख झाली आहे. तू लग्नानंतर पहिल्यांदा केली होतीस अगदी तशीच. तुझ्या हाताला चव आहे पण.." आजोबा बोलले.

" आळशीपणा नडतो.." आजींनी वाक्य पूर्ण केले.

" आता नाही होणार तसे. सगळ्या वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी परत येतील." काकू डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाल्या. सगळ्यांची जेवणं झाल्यावर परत एकदा गप्पांची मैफल जमली. संहिताने शैलाकाकूंना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. आढेवेढे न घेता त्यांनी गायला सुरुवात केली.

" जीवनात ही घडी अशीच राहू देत,
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचु दे.." काकूंचे गाणे झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. मधूकाकांनी डोळे पुसले. ते अचानक उभे राहिले.

" आज आपल्या सगळ्या कुटुंबासमोर मला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या हातून झालेली चूक तुम्हाला माहित असेलच. त्या चुकीनंतर मी आपल्या कुटुंबापासून दूर होत गेलो. मला असं वाटत होतं की आपल्या कुटुंबामुळेच ती व्यक्ती माझ्यापासून दूर गेली. तो राग शैला, अनिशवर निघायचा. आपल्या नवीन सूनबाईंनी एक छोटेसे उदाहरण देऊन माझी चूक दाखवली. असं नव्हतं की मला ती माहित नव्हती पण कबूल करायची हिंमत नव्हती माझ्यामध्ये. राम सीतेसाठी झुरला, पण तिचा त्याग केल्यानंतर. इथे माझी बायको समोर असताना सुद्धा मी तिच्याशी तुसडेपणाने वागत होतो. तुम्हा सगळ्यांशी बोलत नव्हतो. सगळं लगेच सुरळित होईल असं नाही म्हणत मी. पण सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन."

" ते माझं वाढदिवसाचे बहुमूल्य गिफ्ट असेल." संहिता म्हणाली. सगळे कौतुकाने संहिताकडे बघत होते. हे चालू असताना मीनाआत्या मात्र तोंड फुगवून बसली होती. आजीं सगळ्यांचे फुललेले चेहरे बघत होती. त्यात मीनाआत्याचा पडलेला चेहरा तिला सलत होता. संहिता नमस्कार करायला आजींजवळ आली. आजींनी तिला एक छानशी साडी दिली.

" संहिता, आज तुझा वाढदिवस. मी तुला काहीतरी द्यायला पाहिजे, त्याऐवजी मी तुझ्याकडे काही मागू?"

" आजी, ही साडी दिलीत ना? अजून काय द्यायचे? आणि असं काय विचारताय? काय हवे ते सांगा ना."

" तू शैलाच्या चेहर्‍यावर जसे हसू आणलेस, तसे मीनाच्या चेहर्‍यावर आणशील? तिच्या चिंतेने मी ना जगू शकते ना सुखाने मरू शकते. करशील एवढं माझ्यासाठी?" आजींचे बोलणे बाजूला उभा असलेला विशाल ऐकत होता. संहिताने विशालकडे बघितले. विशालने मान हलवली.

" आजी, नक्की प्रयत्न करेन." आजींनी तिला जवळ घेतले.

" नक्की कर ग.. या म्हातारीचे आशीर्वाद मिळतील.


संहिता करू शकेल का आजींची इच्छा पूर्ण?बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all