मागील भागात आपण पाहिले की आजी मीनाआत्याच्या चेहर्यावर हसू आणण्याची संहिताला विनंती करते. आता बघू पुढे काय होते ते.
" आजी, आत येऊ का?" वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी संहिताने आजींना विचारले.
" आपल्याच घरात कसल्या परवानग्या मागतेस? गुपचूप आत यायचं." आजी प्रेमाने ओरडल्या. यावर संहिता फक्त हसली.
" बोला.. काय म्हणताय?"
" आजी, तुमचेच काम. मला विचारायचे होते, मीनाआत्यांनी लग्न नाही का केले?"
" ती गेली का ऑफिसला?" आजींनी विचारले.
" हो.."
" मूर्खपणा ग नुसता. आयुष्याची वाट लावून घेतली आहे." आजी उद्वेगाने बोलत होत्या.
" म्हणजे?" संहिताला काहीच समजत नव्हते.
"ठरलेलं लग्न मोडलं या मुलीने नको त्या हट्टापायी. एवढा चांगला मुलगा तो. जीव जळतो ग त्याची आठवण जरी झाली तरी." आजींच्या डोळ्यात पाणी होते.
" आजी, प्लिज मला समजेल असं सांगा ना.."
" सुरूवातीपासूनच सांगते. घरातलं शेंडेफळ आणि तीन भावांची एकुलती एक बहिण म्हणून लहानपणापासूनच सगळ्यांनी मीनाला डोक्यावर बसवून ठेवले होते. एकाने नाही म्हटलं की दुसरा हिची इच्छा पूर्ण करणारच. त्यामुळे ही एवढी हट्टी झाली की कोणाचं काही ऐकायचीच नाही. पुढे कसं होईल हिचं याचं सतत टेन्शन असायचं मला. त्यात हिला कॉलेजमध्ये भेटला अजय. हिचं मन जपणारा, निर्व्यसनी, घरचे चांगले कुटुंब. घरी आला होता भेटायला. सगळ्यांना पसंत होतं.
पण सगळं मनासारखे झाले तर काय हवं होतं. लग्नाची तयारी सुरू झाली आणि हिची नाटकं सुरू झाली. प्रत्येक गोष्ट माझ्याच मनासारखी झाली पाहिजे हा अट्टाहास. त्या लोकांनी एकदा समजून घेतले, दोनदा घेतले पण सतत? किती समजवलं हिला, जसं तुला मन आहे तसं त्यालाही आहे. त्याच्याही काही अपेक्षा असतीलच ना. पण नाही. ही त्याच्यासाठी करणार ते ही स्वतःच्या मूडने. त्याने मात्र करायचे हिच्या इच्छेने. लग्नाची पत्रिका मात्र उंटाच्या पाठीवरची काडी ठरली. त्यांच्या पत्रिकेची डिझाईन हिला पटली नव्हती म्हणून तिने ती बदलायचा हट्ट धरला. त्याने एकदोनदा स्वतःची इच्छा सांगायचा प्रयत्न केला पण हिच्या डोक्यातच घुसले नाही. मी जे सांगते तेच योग्य आणि बरोबर हे एवढं तिच्या डोक्यात घट्ट बसलं होतं की तिने त्याचे काहीच ऐकून घेतले नाही. ती पत्रिका त्याच्या आईवडिलांनी निवडलेली होती. त्यांनाही महत्व होते ना. शेवटी नाईलाजाने त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. कारण जर लग्नाआधी ही समोरच्याच्या मताला किंमत देत नसेल तर नंतर काय देणार? आणि संपलं सगळं." आजींनी डोळ्यातलं पाणी पुसलं. संहिता स्तंभित होऊन ऐकत होती.
" मग?"
" मग काय? तो गेल्यावर हिला जाणीव झाली स्वतःच्या चुकीची. पण त्याला सॉरी म्हणायची लाज वाटली असावी बहुतेक. आता बसली आहे रडत. मला सांग केली असती थोडी तडजोड तर काय बिघडलं असतं? आणि तो तरी कुठे मोठे काय सांगत होता? पण समोरच्याला आपलेही काही मत असू शकते हा विचारच करत नाही ही. इथेतरी काय वेगळं करते? भावजयींवर आणि त्यांच्या सुनांवरही आपली मते लादत असते. त्यांनी ऐकून घेतले थोडेफार पण आता नेत्रा का ऐकून घेईल सांग? मग नुसती धुसफूस चालू असते. मी मरायच्या आधी हिचं सगळं मार्गी लागले ना, तर डोक्यावरचे ओझे उतरेल माझ्या." आजी संहिताला विनंती करत होत्या.
" आजी, त्या काकांचे लग्न झाले का?" संहिताने विचारले.
" काय माहित? नंतर त्याने संबंधच ठेवला नाही."
"त्यांचे नाव तरी सांगाल?"
" अजय..." संहिताने फेसबुकवर नाव टाकले. त्याच नावाच्या एकदोन प्रोफाईल आल्या.
" आजी, यातले नक्की कोण?" संहिताने आजींना फोटो दाखवले.
" हा बघ.." आजींनी दाखवलेला फोटो संहिताने क्लिक केला. प्रोफाईल लॉक होते.
" आता यांची माहिती काढायची तरी कशी?" संहिताच्या डोक्यात चक्र सुरू झाले. तिने त्या अकाऊंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मेसेंजरला मेसेजही करून ठेवला. "बघू , यांचं नक्की काय सुरू आहे. लग्न झालं नसेल तर पुढे विचार करता येईल नाहीतर.." आजींशी बोलून संहिता बाहेर आली. नशीब सुनिताताईंनी तिला काही विचारले नाही. जेवणं झाली. पाठचं आवरून वगैरे झाल्यावर संहिताने मोबाईल हातात घेतला. तिच्या मेसेजला उत्तर आले होते.
" तुमच्या नात्यात मीना म्हणून कोणी आहे का? आडनाव ओळखीचे वाटते आहे." संहिताने लग्नानंतर सासरचं आडनावही फेसबुकवर लावले होते. तिने लगेचच रिप्लाय दिला.
" माझ्या सासूबाई लागतात त्या?"
" कसे शक्य आहे?"
" का नाही?"
" कारण तिचे अजून लग्नही झालेले नाही."
" तुम्हाला काय माहित?" संहिताला मेसेज पाठवताना हसू येत होते. ती पुढे टाईप करणार तोच समोरून फोन आला. संहिताने मनाचा हिय्या करून फोन उचलला.
" तुम्ही कोण आहात नक्की?" समोरचा आवाज दुखावलेला वाटत होता. संहिताने मस्करी करायचा विचार सोडला.
" त्या आत्या आहेत माझ्या नवर्याच्या. त्या नात्याने माझ्या सासूबाईच झाल्या ना?"
" तू विशालची बायको का? कारण अनिशचे लग्न मागेच झाले. मंथन अजून लहान आहे."
" एवढी माहिती आमच्या कुटुंबाची?"
समोरून काहिच उत्तर आले नाही.
समोरून काहिच उत्तर आले नाही.
"काका तुमचे लग्न झाले का?" संहिताने परत विचारले.
"त्याचा काय संबंध?"
" झाले असेल तर मग विषय नको वाढवायला. पण नसेल झाले तर मला आवडेल तुम्हाला भेटायला." संहिता मोजूनमापून बोलत होती.
" कुठे आणि कधी?"
" आज संध्याकाळी? तुम्ही सांगाल तिथे."
अजयने पत्ता सांगून फोन ठेवला. संहिता आधी एकटीच जायचे ठरवत होती पण नंतर तिला विशालचे बोलणे आठवले. परत वाद नको म्हणून विशालला फोन करून सगळं तिने त्याच्या कानावर घातले. अजय तिला भेटायला येणार हे ही तिने सांगितले. ते ऐकून विशाल तिनताड उडाला.
अजयने पत्ता सांगून फोन ठेवला. संहिता आधी एकटीच जायचे ठरवत होती पण नंतर तिला विशालचे बोलणे आठवले. परत वाद नको म्हणून विशालला फोन करून सगळं तिने त्याच्या कानावर घातले. अजय तिला भेटायला येणार हे ही तिने सांगितले. ते ऐकून विशाल तिनताड उडाला.
" तू त्याला फोन केलास?"
" मी नाही केला. त्यांनी केला." संहिताने नाक मुरडले.
" तेच ते.. तू बोललीस त्याच्याशी?" विशालचे प्रश्न संपत नव्हते.
" होय.. आणि ते आता मला भेटणार आहेत. तू येशील सोबत?"
" संहिता, हे जास्तच होते आहे."
" बरं.. मग मी आजींना जाऊन सांगते विशाल नाही म्हणतो म्हणून."
" तू पण ना अति आहेस.. आपण काका यायच्या आधी भेटू. त्याच्याशी काय बोलायचे ते ठरवू. माझे ना हातपाय गार पडत चालले आहेत." विशाल बोलला.
" गरम पाण्यात ठेव. मग होतील नॉर्मल." संहिता खिदळत म्हणाली.
" संहिता.."
" बोल."
" आय लव्ह यू. तू जे काही करते आहेस ना माझ्या कुटुंबासाठी." विशाल बोलत होता.
" भरपूर कौतुक झाले. बाकीचे नंतर. आपल्याला आधी त्या अजयकाकांना भेटायला जायचे आहे." संहिताने फोन ठेवला. ती विचार करू लागली आता या मीनाआत्या आणि अजयकाकाचे लग्न परत कसे जुळवायचे.
काय वाटते, मिळेल का संहिताला यात यश? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा