Login

सून म्हणजे ?    भाग १

आजारी सुनेल नणंद आल्यामुळे स्वयंपाक करायला लावतात, आणि त्यात ती चक्कर येईन पडते. पुढे जाऊन घेण्यासाठी कथा नक्की वाचा

सून म्हणजे ?    भाग १


@लघुकथा
©®आरती पाटील - घाडीगावकर


" मेघा, कीर्ती आलीये गं. उठ पटकन आणि मस्त चहा आणि भज्जी बनव. तिला फार आवडतात. " सुलोचनाबाई मेघाला उठवत म्हणाल्या.

मेघाला बरं वाटत नसल्यामुळे तिने ऑफिसमध्ये हाफ डे घेतला आणि आराम करण्यासाठी घरी आली. तिला अचानक आलेलं पाहून सुलोचना बाईंना नवल वाटलं पण त्यांनी काहीही विचारलं नाही. मेघा तिच्या रूममध्ये जाऊन झोपली आणि तिला येऊन अर्धा तास सुद्धा झाला नाही आणि तिची नणंद कीर्ती घरी आली. सुलोचना बाईनी मेघाला चहा आणि भज्जी बनवण्याची ऑर्डर दिली. तिला पुढे काही बोलायची संधी न देता त्या बाहेर गेल्या सुद्धा.

मेघा बाहेर आली आणि म्हणाली, " आई..... अहो, मला बरं वाटत नाहीये म्हणून मी ऑफिसमधून लवकर आलेय. आज तुम्ही ताईंना चहा द्याना. "

" वाह वहिनी, नणंद घरी आली आणि तू आजारी पडलीस गं. माझं काही करायचं नाही सरळ सांग ना. कशाला कारण देतेस. नसेल करायचं तर नको करुस. मी जाते घरी. मला वाटलं आईशी बसून बोलता येईल. पण कसलं काय ? " कीर्ती तोंड वाकडं करत म्हणाली.

" कशाला जातेस. आणि का करणार नाही ती. हे घर माझं आहे. आम्हांला बरं नसायचं तरी पूर्ण घराचं काम आम्ही करायचो. हिला चहा - भज्जी बनवायला जड आहेत का ? ते काही नाही जा मेघा स्वयंपाक घरात आणि ताईसाठी चहा - भज्जी बनव. " सुलोचनाबाई म्हणाल्या.

मेघाला भांडण प्रकार आवडत नव्हता, त्यात आजारपणामुळे तिला बोलायचं सुद्धा त्राण नव्हतं. मेघा गपचूप स्वयंपाक घरात गेली आणि चहा - भज्जी बनवू लागली. तिच्या अंगात ताप होता. चक्कर येत होती, डोळे चुनचुनत होते पण आराम नव्हता. तिने कशी तरी चहा - भज्जीची प्लेट त्या दोघींसमोर ठेवली आणि आपल्या रूममध्ये जाऊ लागली. ते पाहून पुन्हा सुलोचनाबाई म्हणाल्या, " मेघा स्वयंपाक बनवायला घे. ताई राहणार नाहीये. त्यामुळे ती जेवून निघेल. त्यामुळे आतापासून सुरू कर. ताईला लवकर जाता येईल. "

"आई मी नंतर जेवण ऑर्डर करेन. आता मला आराम हवा आहे. " मेघाचा आवाज खोल गेला होता.

" वाह गं वाह... बाहेरच  जेवण खाऊ घालणार का आता तिला ? ते काही नाही. जा स्वयंपाकाला लाग. आणि हो वाटण पाटा - वरवंटा घेऊन कर. त्यानेच चव येते. गोडात खीर बनव. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लवकर कर. तिला उशीर व्हायला नको. " सुलोचनाबाई ऑर्डर सोडून लेकीसोबत गप्पा मारत बसल्या.

मेघा परत स्वयंपाक घरात गेली. कामाला सुरुवात केली. थोड्या थोडया वेळाने सुलोचनाबाई म्हणायच्या, " अळूवडी बनव. "
" खिरीत ड्रायफ्रूट जास्त टाक. "
"दोन तरी चटण्या बनव. "

इकडे थोड्यावेळाने मेघाला चक्कर आली आणि ती पाट्यावर पडली. ती लगेच बेशुद्ध पडली आणि रक्त वाहू लागलं. इकडे सुलोचनाबाई आणि कीर्ती आपल्या गप्पांमध्ये रमल्या होत्या.

जवळपास पंधरा - वीस मिनिटांनी निखिल ( मेघाचा नवरा ) घरी आला. कीर्तीला पाहून त्याने चौकशी केली आणि मेघाला आवाज दिला. तिने उत्तर दिलं नाही ते पाहून सुलोचनाबाई म्हणाल्या, " हिची नाटकं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. ताई आलीये ते खुपतंय तिला. तिच्यासाठी स्वयंपाक बनवायला सांगितला तर बरं वाटत नाही सांगत होती. नणंदच करायला नको बाकी काही नाही. "

कीर्ती नाक उडवत, " नाहीतरं काय ? मी येणं आवडत नाही तिला. म्हणून अशी वागते. "

निखिल, " आई तिला खरंच बरं नाहीये कालपासून. आज महत्वाची मिटींग होती म्हणून गेली. पण नाही जमलं तिला तिथे बसायला म्हणून तिने बॉसला सांगून ते काम दुसऱ्यावर सोपवलं आणि डॉक्टरकडे जाऊन सरळ घरी आली. निघताना तिने मला फोन केला होता. या मिटिंगनंतर प्रमोशन ठरणार होते. त्यामुळे खोटं बोलून यायचा प्रश्न नाही येत. ती तिचं प्रमोशन का सोडेल ? जाऊ दे मी बघतो ती कुठे आहे. " असेल म्हणत निखिल स्वयंपाक घरात गेला आणि समोरच दृश्य पाहून घाबरला.

" मेघा  ss मेघा ss... काय झालं तुला ? " निखिल घाबरून तिला कुशीत घेऊन बोलत होता. निखिलचा आवाज ऐकून दोघी धावत आत आल्या आणि दृश्य पाहून घाबरल्या.