Login

सुनबाईच्या साडीवर सासुबाईची साडी फ्री

साडी आणि सासुसुनेचे भांडण
विनोदी लेखन

सुनबाईच्या साडीवर,सासुबाईंची साडी फ्री


विशू मार्केटमधे नवर्‍यासोबत दिवाळीच्या खरेदीसाठी गेली होती. तिच्या नवर्‍याची नुकतीच पुण्याला बदली झालेली . त्यांना खरे तर मार्केट ची काहीच माहिती नव्हती.
दिवे,रांगोळ्या आदि चिल्लर खरेदी आटोपून झाली होती. मुख्य खरेदी म्हणजे कपडे,मुलांचे ड्रेस ,नवर्‍याचा ड्रेस पण घेऊन झाले.आता स्वारी वळली होती जिव्हाळ्याच्या खरेदीकडे.साडी...
म्हणजे बायकांचा विकपाॅईंट. विशूची नजर साडीच्या दुकानांवर कधीचीच भिरभिरत होती.
समोर लटकवलेल्या साड्यांवर तिची नजर स्थिरावली होती.

'ही घेऊ का ती घेऊ
दुकान उचलून का नेऊ'
अशी अवस्था झालेली.


त्यातच एका दुकानावरच्या पाटीने तिचे लक्ष वेधले.

पाट्या पुणेरी
विनोदी भारी
विशूला ऐकून माहित होते.पण आज प्रत्यक्षात अनुभवतांना तिला मजा वाटत होती.


'सुनबाईच्या साडीवर,सासुबाईंची साडी फ्री'

विशूला पाटी वाचून हसुच आले. सुनबाईच्या साडीवर सासुबाईंची साडी फ्री . बरे झाले उलट नाही लिहीले,
'सासुबाईच्या साडीवर सुनबाईची साडी फ्री '
हुशार आहे दुकानदार .

मात्र विशूला आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मात्र त्या वरुन दाखवता येत नव्हत्या नवरोबासमोर. ती मनात म्हणत होती,'बरे झाले नाहीतरी अजून त्यांच्यासाठी वेगळी घ्यावीच लागली असती ना.'

दुकानासमोर बायकांची... अर्थात सुनबाईंची ही भली मोठी लांबलचक लाईन होती.तीही उभी राहिली लाईनमधे.
विशू शोरूममधे गेली. तिने साड्या बघणे सुरु केले.
तिथला नोकर म्हणाला , ' किती पर्यंत दाखवू ?'
विशू - दोन हजारापर्यंत दाखवा ना.

नोकर - दोन हजार च्या साडीवर पाचशेची साडी फ्री मिळेल.

नवरा - असे का?तुम्ही पाटीवर तर असे नाही लिहीले.
दोन्ही सारख्याच किंमतीच्या असा त्याचा अर्थ निघतो.हजार रुपयाच्या साडीवर हजाराची एक साडी फ्री.

विशू - अहो जाऊ द्या ना.त्या कुठे अशा भारी साडी नेसून मिरवणार आहेत म्हणते मी.त्यांच्यासाठी पाचशेची ठीक आहे ना.

चालेल हो दाखवा दादा.

नोकर - दोन हजारच्या दोन घेतल्या तर हजार हजार च्या दोन फ्री मिळतील.

आता विशू जरा विचारात पडली.पण स्वार्थ सोबत परमार्थ.
सासुबाईची स्वारीपण खुष होईल दोन साड्या पाहून.
एरव्ही तर कधी सुनेसाठी चांगले शब्द निघतच नाहीत तोंडातून. हजार रुपयाच्या दोन साड्या बघून हुरळून जातील.
ती साड्या बघतच होती.

नवरा - हे बघ.दोन घे...
विशू - बापरे ! कोण बोलतय,माझा तर कानावर विश्वासच बसत नाहीय.
अरे व्वा ! आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटते. किती पटकन होकार...व्वाव!...
दादा त्या जरी बार्डर वाल्या दाखवा ना जरा.
विशू जरा जास्तच खुशीत आली होती.
'मी मागितला एक डोळा
अन् देवाने दिले दोन...'
अशी अवस्था झाली होती तिची.

नवरा - विशू... अशी हुरळून जाऊ नकोस.
मी दोन का म्हटले ते समजून घे...

दोन दोन हजाराच्या दोन साड्यांवर एक हजाराच्या दोन साड्या फ्री.
त्यातील एक दोन हजाराची अन् एक एक हजाराची साडी आईसाठी आणि तुझ्यासाठीपण सारखीच.

त्यामुळे एक दोन हजाराची अन् एक एक हजाराची साडी तुझी तू तुझ्या पसंतीने घे.दुसर्‍या दोन आईसाठी तिच्यालायक हलक्याफुलक्या साधारण तिला आवडतील अशा निवडूयात आपण दोघे मिळून .

विशूचे लालबुंद डोळेच बोलत होते...
विशू- अहो त्या पाटीवर वाचले का काय लिहीलय ते.
नवरा - हो वाचले.सासुबाई जर खरेदीला आली तर ?
हे पुणेकर आहेत विशू.त्यांना त्यांचा धंदा महत्वाचा.त्यांना पैशाशी मतलब.
अगं घरी जाऊन कोण वापरतो हे त्यांना कसं कळतं ?काहीतरी नवीन फंडे गर्दी खेचायचे.
घरात भांडणं लावायची कामं आहेत ही.समजदारीने घे जरा.

तेवढ्यात शोरूममध्ये बाहेर कडाक्याच्या भांडणाचा आवाज आला.दोघी सासासुना भांडत होत्या साडीसाठी.सासुबाई सुनेवर आरोप करत होती तू भारी साडी घेतली आणि मला ही भुरकटली .कोणी म्हणेल का ही नवीन साडी आहे म्हणून.
आता तिचा मोर्चा दुकानदाराकडे वळला होता.तुम्ही अशी पाटी का लावली ?
सासुबाईच्या साडीवर सुनबाईची साडी फ्री
असे का नाही लिहीले ?
दुकानदार - अहो मावशी ,पहिले तसेच लिहीले होते. तर अशीच भांडणं झालीत म्हणून ...
मग बदल केला आणि असे लिहीले तरी...
आता उद्या आम्ही पाटी बदलणार आहोत.

मावशी - काय....आता अजून काय नवीन...

दुकानदार - 'सुनबाईच्या दोन साडीवर सासुबाईंची एक साडी फ्री'

आता तर तिने दुर्गेचाच अवतार धारण केला.
तोवर विशूचा नवरा बाहेर आलेला.तो म्हणतो,'अहो काकु! एवढ्या कशाला चिडता.तुम्हीपण कुणाची तरी सुन आहातच ना.सुन म्हणूनच जा ना आणि घ्या साड्या.ते काय बघायला येतात कोण सुन कोण सासु.' घरी नेऊन कोण वापरतो यांना कसं कळतं.काहीपण...आगलावे धंदे.

इकडे विशूला ते ऐकून असे झाले की काय करु अन् काय नको.

ती दुकानातून बाहेर पडली मला साडीच नको म्हणत.
©®शरयू महाजन