Login

सुंदर ही संध्या

नातं लेखणी पलीकडचं....संबंध सेतू

'ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी' वाटलं गेल्यावर्षी प्रमाणे असेल, त्यामुळे ग्रूप जाहीर झाल्यानंतर सुद्धा संजना मॅडम यांना मॅसेज करून ग्रूप द्यायला सांगितलं. त्यांनी आठव्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा असे सांगितलं. मग काय, मी गेले आणि शांतपणे ग्रुपची लिंक ओपन करून ग्रुपमध्ये जाऊन बसले. ग्रूप मधील सगळ्याजणी एकदम 'बाईपण भारी देवा' सिनेमासारख्या काही ना काही गोष्टीत तरबेज. स्पर्धेत काय काय फेऱ्या असणार आहे, ते जसे सांगितलं गेलं, त्याप्रमाणे ह्यांनी तयारी सुरू केली. अगोदर पटकन कॅप्टन पदाची निवड झाली. नंतर संबंध सेतू, त्या कोण कोणाबद्दल लिहणार, यावर चर्चा सुरू झाली आणि पटकन लिस्ट तयार सुद्धा केली. आता माझ्या डोक्याचं टेन्शन वाढलं, कारण इथे माझ्याच कथा पूर्ण झाल्या नाहीत आणि मी कोणाबद्दल कसे लिहू? आता बाहेर जरी निघायचं झालं तर मला काय कोणी सोडणार नाही, हे मला माहिती होते. लिस्ट तपासून पहिली, माझ्या नावासमोर संध्या नाव होतं. 
                      'संध्या' मी परत नाव वाचलं; मला काही कळलं नाही. ज्या संध्या नावाच्या व्यक्तिला मी शोधत आहे ती हीच संध्या तर नाही, म्हणून प्रोफाईलवर जाऊन प्रोफाईल फोटो तपासून पाहिला; नाही ती ही नव्हती. माझी मावशी तिचंही नाव संध्या, मी तिला शोधत होते. देवाने काहीशी तशीच संध्या माझ्या आयुष्यात पाठवली. पण मला असे अचानक बोलणं अवघड जात होतं. ग्रूपमध्ये यांच्या सगळ्यांच्या खूप गप्पा चालत होत्या, कधी अधून मधुन मी पण डोकावत होते; पण माझ्याकडे कामाचा खूप लोड असल्यामुळे मला फार बोलायला जमत नव्हते. नेमक्या जेव्हा संध्या बोलत असत तेव्हाच मी नसायचे. मी त्यांना मॅसेज केला, "मला तुमच्याविषयी लिहायचं आहे." ह्या वाक्याने आमच्या मुंबईपासून ते पुण्यापर्यंतचा सेतू बांधायचा मोहिमेला सुरुवात झाली. मस्त मनमिळाऊ, दिलखुलास अशा अवली कलाकाराशी माझी मैत्री झाली. कलाकार म्हणजे ती आहे इंटेरियर डिझायनर तेही मॉड्यूलर फर्निचरमध्ये. दुसरी तिच्यात लपलेली कला म्हणजे अर्थात लेखन आणि वाचन. लग्नानंतर तिने लिखाण सुरू केलं ते ही तिच्या अहोंच्या संमतीने आणि त्यांच्या पाठिंब्याने म्हणून ती अजूनही लिखाणात त्यांचं नाव लावते. ती सगळे श्रेय त्यांनाच देते. 

               एक गोष्ट आमच्या दोघींमध्ये सारखी आहे, ती म्हणजे जो पर्यंत स्वतःच्या मनाला पटत नाही तो पर्यंत लिहायचं नाही. जर स्वतःला आपलं लिखाण आवडलं तर समोरच्याला आवडेल, यावर आमचा पक्का विश्र्वास. तिने लिहलेली कथा मधुमालती खूप सुंदर आहे; या कथेला खूप जास्त वाचकवर्ग आहे. तसेच तिचं लिखाण आता सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे; अगदी आई, मामा, बहिण आणि मैत्रिणी सुध्दा; पण आम्हाला वेळ मिळत नाही आणि मिळाला तर लिखाणाचा आळस येतो. पण त्यातही एखादी स्पर्धा असेल तर ती एकदम कंबर कसून जोमाने लिखाणाला सुरुवात करते आणि सगळ्यांच्या अगोदर पूर्ण करते. तशी जरी ती सामान्य असली तरी घरातली लाडकी, सगळ्यांची आवडती अशी संध्या; सगळ्यांना तिच्या प्रेमळ स्वभावाने भुरळ पाडणारी एक सांज. तिच्यासोबत लिखाणाबद्दल  बोलायला मला खूप आवडतं. वैचारिक गप्पा एकदम सुंदर होतात. मी तिला माझ्या डोक्यात येते ते ते विचारत असते; त्यातून मला लिखाणासाठी बरेच मार्गदर्शन लाभते. तिने त्या दिवशी लिखाणाविषयी मांडलेलं मत मला जास्त आवडलं. मी तिला विचारले होते की "कथेत शृंगारिकपणा किती असावा, तुम्हाला काय वाटते आजकाल शृंगारिक कथेलाच जास्त वाचक वर्ग मिळतोय आणि त्यामुळे कदाचित कथेचा दर्जा खालावतोय, याबाबतीत तुमच काय मत?" 

ती म्हणाली, 
"ह्यावर मी न बोललेलंच बरं.. नाहीतर माझ्या घरी दगडफेक होईल. फक्त एवढंच म्हणेल की लेखन असू देत किंवा विनोद असू देत, कमरेखाली गेलं की पायदळी तुडवलं जातं ह्याची दखल शृंगारिक लेखकांनी घ्यावी. लोक वाचतील पण लपून,  कारण शारीरिक भूक सगळ्यांची असते. पण दाद म्हणावी तशी मिळणार नाही;  मग का मराठी साहित्याचा दर्जा कमी होईल असं लिखाण करायचं? आधीच समाजाच्या बाजारात मराठी माणसाची किंमत कमी आहे आणि त्यात साहित्यात ही कमी केली तर आपलं सगळ्यांचं नुकसान आहे."

तिने मांडलेल हे मत खूप विचार करण्यासारखे आहे. अशीच आमची मैत्री, अर्थात हे नातं दिवसेंदिवस ह्याच वैचारिक आणि भावनिक गप्पांवर अजूनच खुलत आहे. 
तिच्यावर मी लिहेन तेवढं कमी आहे पण तिच्याबद्दल नाहीतर आमच्या नात्याबद्दल लिहायचं आहे म्हणून सध्या एवढंच;  कारण नातं हे प्रत्येक वेळी शब्दात मांडता येत नाही.  
तर जूनच्या दोन तारखेला सुरू केलेला हा आमचा ग्रूप, संजना मॅडमनी एकदम विचार करून संबंध सेतूची तारीख जवळपास तीन महिने म्हणजेच सत्तर दिवसांनंतरची ठेवली. आपल्याला कोणत्याही व्यक्तीला समजून घ्यायला, त्यांच्यासोबत नात घट्ट होण्यासाठी एवढा वेळ हा लागतोच. त्यामुळे आमचा सेतू तर भक्कम बांधला गेला आहे. त्याला लेखणीची जोड आहे. 

समाप्त.