नवी पहाट…भाग २४
मागील भागात आपण बघितले….
" तिची काळजी आहेच, पण आता तुझी लढाई महत्त्वाची आहे. सासर सोडून माहेरी येणारी तू एकटीच मुलगिंनही ह्या जगात. अशा अनेक मुली आहेत. आणि त्या हिमतीने लढतात. त्यांचा मार्ग शोधतात. तू देखील खंबीर हो. हा समाज ना बसू देतो ना चालू देतो. म्हणून आपण आपली वाट शोधायची. जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपण करायचे. " दीपकराव नंदिनीला समजावत होते.
आता पुढे…
रात्री सगळे झोपी गेले. दीपकराव मात्र जागीच होते. त्यांची चुळबुळ सुरू होती. नीरजाची झोप मोड होऊ नये म्हणून ते त्यांच्या खोलीतून निघून बैठक खोलीत आले. पण नीरजा चा देखील डोळा लागत नव्हता. ती देखील त्यांच्या मागोमाग बैठक खोलीत आली. येताना नंदिनी च्या खोलीत जाऊन ती झोपली आहे ह्याची खात्री केली.
"काय हो झोपला नाहीत अजून?" नीरजा दीपक रावांजवळ बसत बोलली.
"नाही गं. झोप लागत नाहीये. पण तू देखील अजून जागीच आहेस?" दीपकराव बोलले
"मला देखील झोप लागत नाहीये." नीरजा
"नीरजा कंबर कसून उभी रहा. येणाऱ्या काळात आपल्याला खूप खंबीर रहावं लागेल. आपली नंदिनी हळवी आहे. त्यामुळे तिला खूप सांभाळावं लागेल आपल्याला. तुझी कामगिरी सगळ्यात महत्वाची आहे ह्या सगळ्या प्रवासात." दीपकराव
"काळजी करू नका. येणाऱ्या वादळाची जाणीव आहे मला. माझ्या लेकरांसाठी मी कधीही कंबर कसून उभी राहते. आता झोपा येणाऱ्या काळासाठी ताकत हवी आपल्याकडे." नीरजा बोलली.
थोडावेळ बसून दोघे झोपायला निघून गेले.
नंदिनीचे बी. एड चे कॉलेज सुरू झाले होते. नवऱ्यापसून वेगळी रहात असली तरी तिच्या गळ्यात अजून देखील त्याच्या नावाचं मंगळसूत्र होतच. ज्यामुळे स्वतः ला आरशात बघताना नंदिनीला त्या प्रत्येक क्षणाची आठवण येत असे ज्यातून तिला बाहेर पडायचे होते.
बघता बघता सहा महिने उलटून गेले. नंदिनीच्या सासरच्या लोकांकडून किंवा मध्यस्ती मामांकडून कोणताच फोन आला नाही. सहा महिन्यांनी एक दिवस मध्यस्थी मामांचा फोन आला, येणाऱ्या रविवारी नंदिनीच्या सासरचे लोक त्यांच्या नातेवाईकांना घेऊन येतील असा निरोप दिला. दीपकरावांनी देखील त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले.
घरात पुन्हा एकदा बैठक बसली. सगळी माणसं तिचं होती फक्त ह्यावेळेस प्रसंग वेगळा होतं. जी माणसं या आधी लग्नं जोडण्यासाठी जमली होती, तीच आता तेच लग्नं मोडण्यासाठी जमली होती. आरोप प्रत्यारोपच्या गदारोळात नंदिनीच्या आसवांना डोळ्यांबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तिने स्वतः ती परणावगी दिली नव्हती.
खूप वादविवादा नंतर शेवटचा निर्णय झाला.
ह्या नात्याचे काही भविष्या नाही, हे सगळ्यांनी मान्य केले आणि शेवटी काडीमोड करण्याचा निर्णयावर शिक्का मोर्तब झाला.
"तुमचं सामान जे काही तुम्ही दिले होते आणि लग्नात नंदिनीला आले होते ते सगळे आम्ही परत करू आणि नंदिनीला आम्ही लग्नात जे दागिने घेतले ते परत करा." असा प्रस्ताव नलिनने मांडला. त्यानुसार सगळ्यांनी तो मान्य केला. पण हे सगळं तेव्हाच होणार होते जेव्हा कोर्टातून रीतसर तलाक होईल.
पण गोष्टी इतक्या सहज होणार नव्हत्या. सगळ्या नातेवाईकांच्या समोर मान्य केलेल्या अटी आता नंदिनीच्या सासरच्यांना मान्य नव्हत्या. तलाक पेपर कोर्टात तर दाखल झाले पण नीरज दिलेल्या तारखेला हजर राहत नव्हता आणि राहिलाच तर " आम्ही नंदिनीला परत न्यायला तयार आहोत." असे सांगायचा. त्यामुळे प्रत्येक वेळेस निकाल लांबनिवर पडत असे..
बघता बघता नंदिनीचे बी. एड पूर्ण झाले. पुढील अभ्यासा साठी नंदिनी ने एम एड ला दाखला मिळवला. ह्या वेळेस मात्र तिने तिच्या गत आयुष्यातील आठवणी काढून ठेवल्या आणि नव्याने सुरुवात करायची ठरवली. गळ्यातील मंगळसूत्र काढले. नाव देखील वडिलांचे लावले आणि त्याच त्याच आठवणी नकोत म्हणून लग्न झाले आहे हे सांगणे तिने टाळले.
पण ते वर्ष तिच्यासाठी खूप कठीण जाणार होते ह्याची कल्पना तिला नव्हती.
एम. एडला नंदिनी पूर्णपणे ढासळली होती. तिच्यात आत्मविश्वास राहिला नव्हता. सुरुवातीला काही दिवस खूप छान गेले पण एक दिवस अचानक सगळं बदलले. एम एडला नंदिनीला ज्या गाईड मिळाल्या होत्या त्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. इतका तिला त्रास झाला की नंदिनी कॉलेजला जायला निघायची पण बस स्टॉप वरून घरी परत यायची. तिचे पाय लटलटायला लागायचे. कॉलेजच्या नावाने तिला घाम फुटून निघायचा.
हे असे रोज होत होते. त्यामुळे नीरजा रोज नंदिनी सोबत तिच्या कॉलेजला ज्यायची, कॉलेज संपे पर्यंत तिथेच थांबायची आणि तिला परत घेऊन यायची असा खेळ एम. एड चे ते दोन वर्ष चालला. मानसिक दृष्ट्या नंदिनी खूप खचली होती. अशाच परिस्थितीत तिने नेटची परीक्षा दिली आणि विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तिसऱ्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली.
"मी तुला खूप वेगळं समजत होते. पण तू तशी नाहीस." कॉलेजच्या शेवटच्या दिवशी गाईड मॅडमने नंदिनीला थांबवले.
"म्हणजे मी समजले नाही." नंदिनी घाबरत बोलत होती.
"सांगते. त्या आधी तुझ्या आईला आत बोलावं." मॅडम नंदिनीला म्हणाल्या.
नंदिनीने बाहेर तिची वाट बघत बसलेल्या नीरजाला बोलावले. तशी नीरजा आत गेली.
"मॅडम ही माझी आई." नंदिनीने नीरजा आणि मॅडमची ओळख करून दिली.
"नमस्कार." करत मॅडमने नीरजा आणि नंदिनीला बसण्यास सांगितले.
"तुमची मुलगी तशी नाही जशी मी समजत होते. किंवा असे म्हणा की, जसे मला सांगण्यात आले होते." मॅडम बोलल्या.
मॅडम च्या ह्या वाक्याने नंदिनी आणि नीरजा एकमेकीनकडे बघत होत्या. त्यांना समजत नव्हते की, नक्की काय म्हणत होत्या मॅडम.
"नंदिनी तू तुझ्या सासरी का जात नाहीस?" मॅडमने प्रश्न केला.
एम. एडच्या कॉलेज मध्ये कोणालाच माहीत नव्हते की, नंदिनीचे लग्नं झाले आहे. मॅडम च्या बोलण्याने नीरजा आणि नंदिनी अजूनच संभ्रमात पडल्या. डोळ्यात असंख्य प्रश्न होते.
"मला सगळं माहीत आहे, कसं ते नंतर सांगते पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे." त्यांच्या डोळ्यातील भाव टिपत मॅडम बोलल्या.
नीरजा आणि नंदिनीने मॅडमला सगळी परिस्थिती समजली.
"किती विचित्र आहे हे सगळं. मला जे सांगण्यात आले ते अगदी ह्याच्या विरुद्ध होते. नंदिनी तुला आणि तुझ्या आईला आश्चर्य वाटेल पण तुझ्या बद्दल स्वतः तुझ्या नवऱ्याने मला सांगितले होते. तुमचे कॉलेज सुरू झाल्यावर काही दिवसांनी तो आणि त्याची आई मला भेटायला आले होते. तू किती वाईट मुलगी हे त्यांनी मला सांगितले आणि म्हणून मी तुला वर्ष भर मुद्दाम त्रास दिला. पण तुझ्या वागण्यातून आता माझ्या लक्षात आले की तुझ्या बद्दल मला चुकीची माहिती मिळाली. खरं तर चूक माझीच झाली मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि कोणताही विचार न करता तुला त्रास दिला. कोणत्या शब्दात मी तुझी माफी मागू? मला कळत नाहीये. पण एक नक्की सांगेल की अशा लोकांकडे परत जाऊ नकोस. तू एक चांगली मुलगी आहेस आणि इथून पुढे तुला कसली ही मदत लागली तर मला सांग मी शक्य तितकी मदत नक्की करेल तुला." मॅडम बोलल्या.
क्रमशः
© वर्षाराज
© वर्षाराज
प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.