Login

नवी पहाट... भाग २८

" मी घरी बोलून थोड्यवेळाने सांगतो तुम्हाला." दीपकराव बोलले आणि दोघांनी फोन ठेवला."काय करायचं?" दीपकरावांनी फोन ठेवत हळूच नंदिनी आणि नीरजाकडे बघत विचारले."पुढच्या रविवारी येऊदे. बोलण्यावरून तरी बरा दिसतो. आता बघू पुढे काय ते." नीरजाने उत्तर दिले.


नवी पहाट…भाग २८


मागील भागात आपण बघितले…


"आई असा कोणीच नाही गं माझ्या नजरेत. पण तुमच्यासाठी म्हणून सांगते की, इथूनपुढे कोणी असा काही विषय केला माझ्याजवळ तर तुम्हाला मी नक्की सांगेल." आईची काळजी लक्षात घेत नंदिनी बोलली.


काही दिवसांनी नेटवर एक मुलगा त्यांना आवडला. अर्थात त्या मुलानेच नंदिनीची प्रोफाईल बघून मेसेज केला होता.


आता पुढे…


"नीरजा अगं इकडे ये लवकर." नंदिनीच्या प्रोफाईलवर आलेला मेसेज बघून दीपकरावांनी लगेच नीरजाला हाक मारली.


"आले आले." म्हणत नीरजा साडीच्या पदराला हात पुसत दीपकरावांच्या जवळ येऊन उभी राहिली.


"हे बघ ह्या मुलाने नंदिनी च्या प्रोफाईल वर मेसेज केला आहे. म्हणून तुला आवाज दिला. बस आपण बघू त्याची प्रोफाईल." दीपकराव नीरजाला बसायला एक खुर्ची देत बोलले.


दोघे खुर्चीत बसले आणि मुलाची प्रोफाईल उघडली.


"दिसायला तर चांगला दिसतो आहे." दीपकराव त्या मुलाचा फोटो बघून बोलले.


"हो, खाली वाचा अजून काय लिहिले आहे." नीरजा


"नाव: सुबोध, गाव:मुंबई, शिक्षण: कॉम्प्युटर इंजिनियर, नोकरी: प्रायव्हेट कंपनी, मुलबाळ नाही, एक बहिण आहे लग्नं झालेली, आई वडील दोघे नोकरी करतात कुठे ते लिहिले नाही, अट अशी काही नाही फक्त मन मिळाऊ मुलगी पाहिजे." दीपक राव चष्म्यातून बघत वाचत होते.


माहिती वाचून झाल्यावर दोघांनी एक मेकांकडे बघितले आणि एक छान हास्याची रेघ चेहेऱ्यावर पसरली.


"मग करू फोन की आधी नंदिनी ला दाखवू म्हणता? नीरजा बोलली.


"माहितीवरून तरी बरं दिसतं आहे सगळं. पण आता आधी नंदिनीला दाखवू मग पुढे बोलू." दीपकराव बोलले.


संध्याकाळची वेळ होती त्यामुळे नंदिनी घरी आलेली होती. दीपक रावांनी नंदिनी ला आवाज दिला.


"बेटा एकदा ह्या मुलाची प्रोफाईल बघून घे आणि सांग फोन करायचा की नाही? नीरजा बोलली.


नंदिनी ने मुलाची प्रोफाईल बघितली. तिच्या अटी पूर्ण करणारी प्रोफाईल होती त्या मुलाची.


"प्रोफाईल तरी आपल्या अटींची पूर्तता होत आहे. बघा फोन करून काय म्हणातो अजून तो?" नंदिनी माहिती वाचून झाल्यावर बोलली.


दीपक रावांनी लगेच दिलेल्या नंबर वर फोन केला. फोन नंबर मुलाचाच होता.

दीपक रावांनी स्वतः ची ओळख करून देत मुलाला त्याची माहिती पुन्हा विचारली. नंदिनी ची देखील माहिती सांगितली.
नीरजा आणि नंदिनी बाजूला बसून सगळं ऐकत होत्या.


"माझ्या आई वडिलांनी नंदिनी ची प्रोफाईल बघतली आहे. त्यांना ती आवडली. त्यामुळे आता पुढे जायचे असेल तर आम्ही कधी येऊ भेटीला ते सांगा." सुबोध म्हणजे तो मुलगा बोलला.


" मी घरी बोलून थोड्यवेळाने सांगतो तुम्हाला." दीपकराव बोलले आणि दोघांनी फोन ठेवला.


"काय करायचं?" दीपकरावांनी फोन ठेवत हळूच नंदिनी आणि नीरजाकडे बघत विचारले.


"पुढच्या रविवारी येऊदे. बोलण्यावरून तरी बरा दिसतो. आता बघू पुढे काय ते." नीरजाने उत्तर दिले.


"नंदिनी तुला काय वाटते?" दीपक रावांनी विचारले.


"गाळणी परीक्षेत तर पास झाला पण पुढे प्रत्यक्ष भेट झाल्यावर बघू कसा वाटतो. तुमच्या सोई नुसार वेळ द्या." नंदिनी बोलली.


"ठिक आहे. पुढच्या रविवारी बोलवू त्यांना मग. उद्या सांगतो तसं फोन करून. आता लगेच नको सांगायला." दीपकराव बोलले.


ह्यावेळी घरात कोणी काहीच विषय केला नाही. आधीचे अनुभव असे होते की कोणाचा कोणत्याच गोष्टीवर विश्वास नव्हता. जे होईल तेव्हा बघू तो पर्यंत शांत बसायचे असे सगळ्यांनी ठरवले होते.


पुढच्या रविवारी तो मुलगा त्याच्या घरच्यांसोबत आला. बघताच सगळ्यांना तो आवडला. दिसायला गोरापान, उंच, व्यायामाने कमावलेले पिळदार शरीर, एकंदरीत हॅण्डसम होता. बोलण्यात एक आत्मविश्वास होता त्याच्या. नंदिनी ला देखील तो आवडला. मुलाच्या घरच्यांशी बोलताना समजले की, तो ओळखीतलाच आहे. चांगल्या नोकरीवर असल्याचे त्याच्या राहणीमानात दिसत होते.

नंदिनी साठी उपवर शोधायला सुरुवात केली तेव्हापासून दोन वर्षांनी पहिल्यांदाच असा मनात भरणारा मुलगा आला होता.


त्या नंतर एक दोन वेळा मुलाच्या घरचे नंदिनी कडे येऊन गेले. थोडक्यात पसंती झाली होती. आता पुढे बोलणी करायची होती. विषय इतका पुढे जाऊन देखील नंदिनी आणि तिच्या घरचे अगदी शांत होते. \"दुधाने पोळलेला ताक देखील फुंकून पितो \" त्यातला प्रकार नंदिनी आणि तिच्या घरच्यांसोबत झाला होता.


मुलाच्या घरचे बोलणी साठी येणार होणार त्याच्या एक दिवस आधी मुलगा म्हणजे सुबोध दीपक रावांच्या घरी आला. त्याला असे अचानक बघून जरा गोंधळात पडले.

दीपकरावांनी सुबोधला घरात येऊन बसण्यास सांगितले.
त्याच्या सोबत त्याचा एक मित्र देखील होता.

" काका तुमची हरकत नसेल तर मला नंदिनी शी जरा बोलायचे आहे." सुबोध बोलला.

" हरकत नाही मी, नंदिनीला सांगतो. तुम्ही दोघे बाहेर गॅलरीमध्ये बोलू शकता." दीपक राव बोलले.

नंतर दीपकरावांनी आत जाऊन नंदिनीला सांगितले. नंदिनी नीट ड्रेस घालून बाहेर आली.


"नंदिनी, सुबोध ला घेऊन गॅलरीत जा त्यांना तुझ्याशी बोलायचे आहे." दीपक रावांनी सांगितले.

तशी नंदिनी गॅलरीत जाऊन उभी राहिली. मागोमाग सुबोध देखील गेला.


"काय बोलायचे आहे?" नंदिनी ने न लाजता आत्मविश्वासाने विचारले.


सुबोधने एक नजर आजूबाजूला बघितले. नंदिनी ला त्याचे वागणे जरा विचित्र वाटले

"नंदिनी, तू मला आवडली. उद्या माझ्या घरचे बोलणी करण्यासाठी येणार आहेत. हे बघ गैरसमज नको करून घेऊस. पण मला वाटतं आता आपलं लग्न ठरणार आहेच तर आपण एक मेकांना पूरक आहोत की ,नाही हे तपासायला काय हरकत आहे? तुला लक्षात आलं का मला काय म्हणायचे आहे?" सुबोध हळू आवाजात बोलत होता.

"नाही मला कळतं नाहीये." नंदिनी बोलली.

"स्पष्ट सांगतो, एखादी संध्याकाळ घालावं माझ्यासोबत. जर आपण समाधानी झालोत तर मग लग्नं करू." सुबोध ने बोलताना नंदिनी च्या हाताला हळूच स्पर्श केला.

त्याच्या त्या बोलण्याने आणि स्पर्शाने नंदिनी च्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने त्याला जोरात लोटले आणि रागात घरात आली.


"बाबा, आधी घरा बाहेर काढा ह्या नालायक माणसाला आणि त्याच्या घरच्यांना सांगा की उद्या यायची काही गरज नाही. आम्हाला हे लग्नं मान्य नाही." नंदिनी च्या डोळ्यात आग होती. तिच्या बोलण्यावरून दीपक राव आणि नीरजा च्या लक्षात आलेली नक्कीच काहीतरी घडले आहे.


"पण झालं तरी काय?" दीपकराव बोलले.

"मी जातो. तुम्ही तुमचा निर्णय कळवा." सुबोध मध्येच बोलला.

"अरे जातोस कुठे लगेच. तुझी कर्तुत तर ऐकू दे." नंदिनी बोलली. पण तो निघून गेला.

झालेला सगळा प्रकार तिने घरी सांगितलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.


नंदिनीच्या डोक्यात ज्वाला पेटला होता.

" आई बाबा, तुम्ही माझ्या भल्यासाठी प्रयत्न करत आहात. पण असेल लोक असतील तर मला लग्नच करायचे नाही. नालायक माणूस माझ्याच घरात येऊन मलाच एका रात्री साठी… शी. त्याची हिम्मत कशी झाली असं बोलण्याची? समजतो कोण तो मला? बाबा खरंच नका शोधू कोणी माझ्यासाठी." असे बोलून नंदिनी आत निघून गेली.


नीरजा आणि दीपकराव मात्र एकमेकंकडे बघेत होते. त्यांनी देखील नंतर नंदिनीच्या लग्नाचा विषय काढला नाही.

पण गोष्ट अजून संपली नाही.



क्रमशः
© वर्षाराज



प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all