Login

सुपुत्र

आईच्या प्रेमापेक्षाही देशासाठीच्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या सैनिकाची कथा...
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )

शीर्षक : सुपुत्र

राजेश कालच आईची भेट घेण्यासाठी, चार-पाच दिवसांची रजा काढून सीमेवरून घरी परतला होता; पण दुसऱ्याच दिवशी अचानक त्याला सीमेवरून फोन आला आणि तात्काळ निघण्यास सांगितले. एमर्जन्सी होती... शत्रूने सीमेअलीकडे शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता; परिणामी युद्ध पुकारण्यात आले होते. आदल्या रात्री आईने राजेशच्या आवडीचे जेवण बनवले. राजेशनेही आईशी मनसोक्त गप्पा मारल्या, तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपी गेला आणि आई झोपेतही त्याचे लाड करत राहिली...
        
राजेश भारतीय लष्करात सैनिक होता. घरी एकटी आईच. राजेशला भाऊ किंवा बहीण कोणीच नव्हते. वडील तर राजेश सैनिकी प्रशिक्षण घेत होता, तेव्हाच देवाघरी गेले. मनावर दगड ठेवून राजेश सीमेवर जायचा. आई देखील डोळ्यांतले अश्रू लपवत त्याला हसतमुखाने निरोप द्यायची.

"आई... मी निघतोय... युद्ध संपलं की मी परत एकदा तुला भेटायला येईन. तोवर काळजी घे. काही वाटलंच तर राहुलच्या फोनवर मला फोन कर." राजेशने खाली वाकून आईचे चरणस्पर्श केले. तोवर आईनं डोळ्यांतलं पाणी पुसलं देखील होतं.
 
"बाळा, काळजी घेतं जा... मी तुझी वाट बघेन." आईने त्याच्या तोंडावरून हात फिरवला. ती जड अंतःकरणाने राजेशला निरोप देत होती. त्याला निरोप द्यायला सगळे गावकरी देखील जमले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी होतं कारण राजेश गावची आन, बान, शान होता.

कोणीतरी म्हणाला, "पोराला मन भरून जगता पण येत नाही."

"अहो काका, मी तर तुमच्यासाठीच जगतोय. तुम्हां सगळ्यांसाठी... आपल्या देशासाठी..." राजेश म्हणाला.

"राजू... हा डब्बा... तुझे आवडते बेसन लाडू आहेत यात. तू येणार म्हणूनच बनवले होते." पितळी डब्बा आईने राजेशच्या हातात टेकवला.

राजेशने आईची गळाभेट घेतली. कंठ तर दाटला होता; पण अश्रू न गाळणारा तो एक खंबीर योद्धा होता. भारत मातेचा सुपुत्र होता.

"आण्णा, काकू... आईची काळजी घ्या. राहुल... निघतो." असं बोलून राजेशने सर्वांचा निरोप घेतला.
***

        राजेशला निरोप देताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला. गावकऱ्यांनी तिला सावरले; पण त्याच रात्री आईच्या अंगात ताप भरला म्हणून भावाप्रमाणे असणाऱ्या शेजारच्या आण्णाने लागलीच आईला दवाखान्यात भरती केले. आईची हालत खूपच बिघडत होती. ती सतत राजेश राजेश म्हणून बरळत होती. इकडे राजेश सीमेवर पोहोचला होता. आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती. कमांडो हेड ऑफिसरने युद्धाची घोषणा केली आणि सगळे तयारीला लागले.

राहुलने खूप वेळा राजेशला फोन केला; पण काही केल्या पलीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आईची तब्येत इतकी बिघडली की तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

अथक प्रयत्नानंतर पलीकडून राहुलचा कॉल उचलला गेला.

"हॅलो राजेश?"

"राहुल मी खूप बिझी आहे. प्लीज कॉल नको करू."

"राजेश ऐकून तर घे, काकूंची (राजेशच्या आईची) तब्येत खूप बिघडलीय. व्हेंटिलेटरवर आहे ती."

इतकंच राजेशला ऐकू गेलं.

त्याच्या हातून फोन निसटला. तो वायरचा काळा फोन तसाच लटकत राहिला...

अचानक राजेशच्या छावणीवर गोळीबार सुरू झाला. धावाधाव सुरू झाली. कोणाचातरी धक्का लागून राजेशची बॅग खाली पडली आणि त्यातून लाडूचा पितळी डब्बा बाहेर आला. त्यातले लाडू जमिनीवर विखुरले... धावपळीत आईने प्रेमाने दिलेल्या लाडवांचा चेंदामेंदा झाला.

'आई मला माफ कर... तुला गरज असताना मी तुझ्याजवळ नाही; पण तुझ्यासारख्याच या आईला, भारतमातेला माझी गरज आहे... माफ करशील मला... माफ करशील...'

शून्यात हरवलेल्या राजेशच्या कानावर सहकाऱ्याचा आवाज पडला, "राजेश... हरी अप!"

भानावर येत राजेशने रायफलमध्ये काडतूस टाकली आणि जीवाची पर्वा न करता तो बाहेर आला.

तब्बल आठ तासांच्या मिशननंतर शत्रूला नामोहरम करण्यात यश आलं होतं. सगळे भारतीय सैनिक जल्लोष करत होते; पण त्या सगळ्यात राजेश मिसिंग होता.

"राजेश? राजेश कुठेय?" एका सैनिकाचा आवाज आला.

उद्ध्वस्त झालेल्या छावणीवर सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली, तेव्हा वाळलेल्या पाचोळ्यात राजेश निपचित पडलेला दिसला. त्याच्या समोरच शत्रूचा म्होरक्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. धावत जाऊन सर्वांनी राजेशला उठवले तेव्हा त्याचा पूर्ण शर्ट रक्ताने माखला होता. त्याच्या छातीत गोळी घुसली होती. खूप उशीर झाल्यामुळे बराच रक्तस्त्राव झाला होता.

"राजेश... राजेश..." कानावर आवाज पडताच राजेशच्या डोळ्यांची किंचित उघडझाप झाली.

त्याचे ओठ पुटपुटले, "आई..."

त्याच्या मिणमिणत्या डोळ्यांपुढे हसऱ्या आईचा धूसर चेहरा उमटला. तो हलकेच गालात हसला. मिटणाऱ्या डोळ्यांत आईची प्रतिमा आकुंचन पावत गेली... मागे राहिला सहकाऱ्यांचा टाहो...."राऽऽ जेऽऽ शऽऽऽ"

***

आईच्या डोक्याशी असणाऱ्या इ.सी.जी. मशिनचा आवाज शेवटचा बीप झाला... वेड्यावाकड्या रेषांनी सरळमार्ग धरला आणि सुकलेल्या अश्रूंचे डोळे छताकडे कायमचे रोखले गेले...
***

तिरंग्यात लपेटलेल्या राजेशच्या तर अँब्युलन्समधे आलेल्या आईच्या देहाला, एकत्र अग्नी देण्यात आला. दोन्ही चिताग्नीच्या धुराने गळाभेट घेत पुढील मार्गक्रमण सुरू केले होते... राजेश भारतमातेचा आणि त्याच्या जन्मदात्या आईचा कर्तबगार ' सुपुत्र' ठरला होता.


समाप्त!
©लेखिका - प्रणाली निलेश चंदनशिवे.
0