#लघुकथा लेखन
#ईरा स्पर्धा
#ईरा स्पर्धा
विषय:- सेकंड इनिंग
शीर्षक:- नव्याने सुरुवात ( सेकंड इनिंग )
" अमु, असे अंधारात का बसलास, राजा. थांब खिडकी उघडते मी. " प्रीती अमेयची आई त्याच्याकडे बघत त्याच्या रूममधली खिडकी उघडत म्हणाल्या.
खिडकीतून उजेड येताच रूममध्ये लख्ख प्रकाश पडला तसा अमेयने चिडत त्याच्या तोंडासमोर हात आडवा करत म्हणाला, " नको, आई, उजेड. अंधारच राहू दे, या अंधारातच राहयचं आता मला. नको कोणता प्रकाश?"
त्याचे चिडून बोलणे प्रीतीला आवडले नाही तरीही त्या शांतपणे म्हणाली," का बरं नको प्रकाश? हा. अमु, आणखी किती दिवस स्वतःला अस कोशात गुरफटुन घेणार आहेस, जे झालं ते झालं. त्यातून सावरायचा तू प्रयत्नच नाही केलास तर कसं होईल? "
" हो, बसायचं मला माझ्या कोशात गुरफटुन. नाही सावरायचं मला. आई, प्लीज एकटं सोड मला. " तो वैतागत पण भावूक होऊन हतबल झाल्यासारखं हात जोडत आईला म्हणाला.
त्यांनाही त्याची अवस्था कळत होती. त्या पटकन पुढे होऊन त्याचे हात पकडत त्याला गळ्याशी लावून घेत दाटत्या कंठाने म्हणाल्या, " अरे, राजा, असे नको बोलूस. तुला अस पाहिलं की जीव तुटतो रे आमचा. कधी ना कधी यातून बाहेर पडावं तर लागेल ना, राजा." त्यांनी त्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. तो नकारार्थी मान हालवत होता.
"तुझी आई बरोबर बोलतेय, अमु. बास झालं आता. राहिलास ना एकटा. आता नाही एकटं सोडणार तुला आम्ही." असे म्हणत त्याचे बाबा अमित त्याच्याजवळ आले. त्यांनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला तर आता गहिवरूनच आलं. तो त्यांच्या कमरेला विळखा घालून स्फुंदुन स्फुंदुन रडू लागला.
" नाही बेटा, आता नाही रडायचं, आता लढायचं आणि आम्हा दोघांनाही खात्री आहे तू जिंकणार. पुन्हा नव्याने उभा राहाणार. " ते त्याचे केस कुरवाळत त्याच्या डोक्यावर ओठ टेकवत म्हणाले.
"त्यालाच काय मलाही खात्री आहे, माझा दादा नक्की जिंकणार." शमिता त्याची छोटी बहिण आत येत म्हणाली.
"हो मग, आपला अमेय आहेच असा. असे फोटो काढेल की तो नक्कीच सगळे वाह वाह करतील . हे घे हा फाॅर्म भर. आजपासून तू फोटो काढायला सुरुवात कर. आम्ही तिघे तुझी मदत करू. " त्याचे बाबा त्याला छायाचित्र स्पर्धेचे फाॅर्म देत म्हणाले.
तो किंचित हसत म्हणाला,"पण बाबा, मी कसे बाहेर जाणार, मला तर.."
"त्याची नको काळजी करूस, आम्ही आहोत ना! "असे म्हणत त्याने त्याच्यासमोर व्हिल चेयर आणली. त्याला त्या तिघांनी मिळून त्या व्हिलचेअरवर बसवले आणि त्याचा कॅमेरा त्याच्या हातात दिला.
अमेयला घेऊन ते सर्व त्यांच्या घरासमोरील अंगणात आले. तिथे काही फुलझाडे लावली होती. निसर्ग आणि त्या फुलझाडांकडे बोट करत अमित त्याला म्हणाले, " हे बघ अमु, हे सगळे तुझ्या कॅमेऱ्यात पुन्हा कैद कर म्हणत आहेत. "
" हो दादा, पण पहिला माझा फोटो काढ हं. म्हणजे जस्ट अॅज अ ट्रायल हं." शमिता तिच्या दोन्ही वेण्या हात घेत मानेला झटका देत थोडे वेडे वाकडे तोंड करत म्हणाली. अमित आणि प्रीतीला तर तिच्या या बालिशपणावर हसायला आले, अमेयही हसू लागला. त्याने आपले हसू दाबत तिला जवळ खुणेने बोलावले. ती जवळ येताच तिची वेणी खेचत तो हसत म्हणाला, " फोटो काढायला सुंदर असावं लागतं, ढमाबाई."
"आह दादा, दुखतंय ना, काय मी सुंदर नाही का? तू मला ढमाबाई का म्हणतोस?" ती लटका राग दाखवत त्याच्या हातून वेणी सोडत म्हणाली.
"तू ढमाबाईच आहेस ना,मग तेच म्हणणार ना.हो की आईबाबा. " तो डोळे मिचकावत प्रीती व अमितकडे बघत म्हणाला.
त्या दोघांनाही हसत मान डोलावली. तशी ती रुसत गाल फुगवत नाक मुरडत हाताची घडी घालून उभी राहिली. तिला तस पाहून तो आणखी हसू लागला. त्याला असे कित्येक दिवसांनी हसताना पाहून त्यांचे डोळे पाणावले. ते तिघे येऊन त्याच्या गळ्यात पडले.
शमिता भावूक होऊन म्हणाली,"दादा, हेच हसू पाहायचं होत आम्हाला. मला ढमाबाई म्हणताना तुला हसू येत असेल ना तर म्हण. तुझ्या या हसूसाठी मी बनेल ढमाबाई." त्याने हसून तिच्या गालावर हात ठेवला.
काही महिन्यांपूर्वी
अमेय हा उत्कृष्ट फोटोग्राफर. निसर्गाचे वेगवेगळे फोटो काढायला त्याला खूप आवडायचं. तो कित्येक ठिकाणी जाऊन आपल्या कॅमेऱ्यात निसर्ग सौंदर्य कैद करायचा. खूप साऱ्या स्पर्धेत त्याच्या फोटोने बक्षीसे, ट्राॅफी मिळवलं होतं. आता त्याला जागतिक स्तरावरही आपल्या कॅमेऱ्याची कमाल दाखवायची होती ; पण एकदा एके ठिकाणी जाताना त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याच्या पायांना जबर दुखापत झाली. त्याने त्याच्या पायातले बळ गमावले. सगळं जग त्याला थांबलं असे वाटलं. पुन्हा भविष्यात कधी तो आपल्या पायावर उभे राहता येणार नाही ही भिती त्याच्या मनात घर करून गेली. डाॅक्टरांच्या उपचारांनाही तो प्रतिसाद देत नव्हता. तो उपचार घेण्यासही तयार नव्हता. नैराश्यात राहू लागला. सतत स्वतःला कोंडून घेत अंधारात एकटातच राहू लागला.
हसत्या खेळत्या आपल्या मुलाची ही दयनीय अवस्था अमित, प्रीती व शमिता यांना बघवेना. खूप प्रयत्न केले पण तो यातून बाहेर पडायला तयारच नव्हता. शेवटी सर्वांनी त्याला थोडा वेळ देण्याचे ठरवले.
आता वर्तमानात
काही दिवसांनी सगळ्यांच्या प्रयत्नांनी तो पुन्हा सेकंड इनिंगसाठी सज्ज झाला. पुन्हा तो निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करू लागला. त्या छायाचित्र स्पर्धेत त्याला प्रथम क्रमांक मिळाला. काही दिवसांनी त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. तो लवकरच पुन्हा त्याच्या पायांवर उभे राहू शकेल असे डाॅक्टरांनी सांगितले.
समाप्त:-
अमेय अपघात झाल्याने नैराश्यात जगत होता. पण त्याच्या कुटुंबाच्या मदतीने तो सेंकड इनिंगने जीवनाची सुरुवात केली.
असे अनेकदा असे प्रसंग येतात ज्याने आपण खचून जातो, नैराश्यात इतके गुरफटुन जातो की तिथेच जग संपले असे वाटू लागते. पण प्रोत्साहन देणारे अमेयच्या आईबाबासारखे आईबाबा, बहिण असेल तर सेंकड इनिंनने नव्या जीवनाचा सूर गवसतो.