सूर जुळले भाग १
"मनू, काय करते आहेस ग?" प्रियाने रुममध्ये येत विचारले.
"दीदी, बॅग भरते आहे. माझी सुट्टी संपली. परवापासून कॉलेज सुरु होईल. उद्या होस्टेलला जाणार आहे. त्याचीचं तयारी सुरु आहे." मानसीने सांगितले.
"आम्ही उद्या जाणारच आहोत, तर आमच्यासोबत चल. एवढा सहा तासांचा प्रवास बसने करण्यापेक्षा नारायणगाव पर्यंत आमच्यासोबत ये, मग तिथून पुढे फक्त दोन तासांचा प्रवास राहील, तो बसने कर." प्रियाने सुचवले.
"हो, चालेल ना. मलातर आवडेल. नाशिक-पुणे प्रवासाचा मला कंटाळा आला आहे. समजा एखाद्या वेळी ट्रॅफिकमध्ये अडकले की, काही खरं नसतं. लांबच्या प्रवासामुळे मी घरी येणेच टाळते. आता हे शेवटचं वर्ष राहीलं आहे, मग माझे नाशिक-पुणे फेऱ्या संपतील." मानसीने सांगितले.
"समजा लग्न झाल्यावर तू पुण्यातच राहिली, तर पुन्हा या फेऱ्या आहेच की." प्रिया म्हणाली.
यावर मानसी म्हणाली,
"लग्नाचं नंतर बघू. समजा लग्न झाल्यावर पुण्यात असले, तर नवऱ्याकडे चारचाकी गाडी असेलच ना. बसने प्रवास करणे संपेल तरी."
" तेही आहेच. मनू,घरची आठवण आल्यावर माझ्याकडे येत जा ना. मी काकूंना कितीवेळेस याबद्दल सांगितलं, पण त्यांनी तुला निरोप दिलाचं नसेल." प्रिया म्हणाली.
"दीदी, आईने मला निरोप दिला आहे. एकतर तुमचं एकत्र कुटुंब आहे. मला यायला अवघडल्यासारखे वाटते. उगाच माझ्यामुळे तुला त्रास होऊ नये." मानसी म्हणाली.
"अग, आमचं एकत्र कुटुंब असलं, तरी सगळे एकमेकांना समजून घेतात, मदत करतात. दररोज कोणाचे तरी पाहुणे आलेले असतात. आमच्या घरी असा एकही दिवस जात नाहीत, त्या दिवशी जेवायला कोणी बाहेरील व्यक्ती नसेल म्हणून." प्रिया म्हणाली.
"प्रायव्हसी काहीच मिळत नसेल ना?" मानसीने विचारले.
"प्रायव्हसी मिळते. आता कालचंच बघ ना. आम्ही दोघे कामाच्या निमित्ताने मुंबईला गेलो होतो. सावी घरीच आहे. काम झाल्यावर आई-बाबांना भेटण्यासाठी म्हणून इकडे आले. आज निघायचं, तर माझी इच्छा होती, म्हणून थांबलो. मी फक्त एक फोन करुन आईंना कळवलं. आमच्या घरी कडक असे काही नियम नाहीयेत. जे ते प्रत्येकाचं आयुष्य जगतं." प्रियाने सांगितले.
"सावी तुझ्याशिवाय बरं राहते." मानसी म्हणाली.
"सावी आमच्या दोघांपेक्षा आई व मानवकडे जास्त राहते. मानव घरातील सगळ्या लहान मुलांचा आवडता काका आहे." प्रियाने सांगितले.
"मानव कोण ग?" मानसीला प्रश्न पडला होता.
"मानव माझा चुलत दिर आहे. माझे एक चुलत सासरे अगदी सुरुवातीपासून नोकरीच्या निमित्ताने बंगलोरला राहतात, त्यांचा हा मुलगा आहे. मानव सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, त्यांना पुण्यात चांगल्या कंपनीत नोकरी मिळालेली आहे. दर शनिवारी, रविवारी ते घरी येत असतात." प्रियाने सांगितले.
"तुझ्या लग्नात ते नव्हते का? म्हणजे मी कधी त्यांचं नाव ऐकल्याचं आठवत नाही." मानसी म्हणाली.
"माझ्या लग्नाच्या वेळेस ते अमेरिकेत सॉफ्टवेअरचा कोर्स करत होते. तुला सांगते मनू, मानव अमेरिकेत राहून आले आहेत, एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. महिन्याला लाखो रुपये कमावणारे आहेत, तरी ते रहायला आणि वागायला एकदम साधे आहेत. उद्या तुझी व त्यांची भेट होईल, तेव्हा तुला अंदाज येईल." प्रिया म्हणाली.
"उद्या मानवची भेट झाल्यावर ते कसे आहेत? ते कळेलच. बरं दीदी, मी माझी बॅग भरते. तुझ्याशी बोलण्याच्या नादात मी माझ्या वस्तू इथेच विसरुन जाईल." मानसी म्हणाली.
"बरं मॅडम, मी जाते. तू तुझं आवरुन ठेव. उद्या सकाळी लवकर आपण निघूयात." प्रिया बोलून निघून गेली.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा