सूर जुळले भाग २
दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी पुण्याला जाण्यासाठी प्रियाच्या गाडीत बसली. घरातील सगळ्यांचं निरोप घेऊन ते पुढील प्रवासाला रवाना झाले.
"मानसी, काकांनी तुझ्यासाठी स्थळ शोधायला सांगितलं आहे." नाशिकच्या बाहेर निघाल्यावर प्रियाचा नवरा अजय गाडी चालवता चालवता म्हणाला.
"पप्पांचं काय घेऊन बसलात? ते काही म्हणतील, पण मी माझं शेवटचं वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही." मानसीने सांगितले.
यावर प्रिया म्हणाली,
"अजय, तुम्ही मनूला उगाच छळू नका. काकांनी सहजच तुमच्या कानावर टाकून ठेवलं. मनू तू काही टेन्शन घेऊ नकोस. तुझं शिक्षण पूर्ण झाल्यशिवाय तुझं लग्न होणार नाहीये."
"प्रिया, तू पण ना. मी माझ्या मेव्हणीची थोडी घेत होतो, तेही तुला बघवलं नाही." अजय म्हणाला.
"तुम्ही सहजच म्हणाला असाल, पण आमच्या मनू मॅडम त्याच विषयाचा विचार करत बसल्या असत्या." प्रिया म्हणाली.
"दीदी, जिजू गंमत करत होते, ते मला कळलं होतं. मी काही विचार करत बसले नसते." मानसीने सांगितले.
अजय, प्रिया व मानसीमध्ये पूर्ण प्रवास गप्पा सुरु होत्या. गप्पांच्या नादात नारायणगाव कधी आले, हेही कळलं नाही.
"जिजू, मला बसस्टँडच्या इथे सोडून द्या. पुण्याच्या बस सुरुचं असतात. मला एखादी बस मिळेलंच." नारायणगाव आल्यावर मानसी म्हणाली.
यावर प्रिया म्हणाली,
"हिचं काही ऐकू नका. मानसी घरी चल, जेवण कर आणि मग पुण्याला जा. मी तुला राहण्याचा आग्रह करणार नाही."
"दीदी, मी नंतर येईल ना. आता नको." मानसी म्हणाली.
"तुमच्या दोघींचं चालू द्या. मी मात्र तुला घरी घेऊन जाणार आहे." अजय म्हणाला.
मानसी नाही म्हणत असताना अजय व प्रिया तिला आपल्या घरी घेऊन गेले. घराच्या बाहेर अजयने गाडी पार्क केली. मानसीला घरात जायला अवघडल्यासारखे होत होते.
प्रियाचे कुटुंबीय एकत्र राहत असल्याने मोठा बंगला बांधलेला होता. घराबाहेर पाच ते सहा चारचाकी गाड्या उभ्या होत्या. प्रियाच्या सासरचे गर्भश्रीमंत होते. याउलट मानसी मध्यमवर्गीय घरातील होती.
इतक्या मोठया घरात प्रवेश करताना मानसीवर दडपण आले होते. घरात घुसल्यावर हॉलमध्ये सावीचा आरडाओरडा चालू होता. सावी एका मुलाच्या पाठीवर बसून घोडा खेळत होती.
"सावी, आपल्याकडे कोण आलंय? बघितलं का?" प्रियाने आवाज दिल्यावर सावी त्या मुलाच्या पाठीवरुन उतरुन प्रियाकडे धावत आली. तो मुलगा तसाच खाली बसून दरवाजाकडे बघत होता.
सावीने प्रियाला मिठी मारली. प्रियाने तिला उचलून घेतले.
"सावी, तू मम्माला मिस केलं ना?" प्रियाने विचारले.
"अजिबात नाही." सावीने तिच्या गोड आवाजात सांगितले.
"मानव काका असल्यावर तुला माझी कशी आठवण येईल. (मानसीकडे बोट दाखवून) ही तुझी मनू माऊ आहे बरं." प्रियाने सांगितले.
सावीने प्रियाच्या कडेवरुनचं मानसीला पप्पी दिली.
"मानसी, आता ये ना. सावीच्या नादात आपण इथेच दरवाजात उभ्या राहिलो." प्रिया बोलत सोप्यावर जाऊन बसली.
मानसीही तिच्या पाठोपाठ सोप्यावर जाऊन बसली.
"मानव, सावीने खूप त्रास दिला का?" प्रियाने सावीसाठी जो मुलगा घोडा बनला होता, त्याच्याकडे बघून विचारले.
"नाही. काकू बाहेर गेल्यावर थोडी रुसली होती, म्हणून तर घोडा करुन तिला नादी लावत होतो. तुम्ही आल्या म्हटल्यावर आता मी पुण्याला जाऊ शकतो." मानव म्हणाला.
"ही माझी चुलत बहीण मानसी. पुण्यात इंजिनिअरिंगला आहे. तिलाही पुण्याला जायचं आहे. हे मानव सावीचे आवडते काका." प्रियाने मानव व मानसीची ओळख करुन दिली.
मानव व मानसीने एकमेकांकडे बघून स्माईल दिली.
"मानव, तू पुण्याला जाणार आहेस, तर मानसीलाही सोबत घेऊन जा." अजय सोप्यावर बसत म्हणाला.
"हो चालेल ना." मानव म्हणाला.
मानसीला मानव सोबत जायला अवघडल्यासारखे वाटणार होते, पण ती तसं स्पष्टपणे सांगूही शकत नव्हती.
"मानव, तुम्ही जेवण केलं का?" प्रियाने विचारले.
"नाही. आता जेवण करुनच निघण्याच्या विचारात होतो." मानवने उत्तर दिले.
"सावी बेटा, तू डॅडासोबत खेळ. मी तुमच्या दोघांसाठी जेवायला वाढते. तुम्ही वेळेत पुण्यात पोहोचायला हवे." सावीला अजयकडे देत प्रिया बडबड करत निघून गेली.
प्रियाने आवाज दिल्यावर मानव व मानसी जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवर जाऊन बसले. प्रियासोबत गप्पा मारता मारता दोघांनी जेवण केले.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा