सूर जुळले भाग ३
जेवण झाल्यावर मानसी मानवच्या गाडीत बसली. मानव जाणार आहे, हे बघून सावी रडायला लागली होती. मानवने गाडीतून खाली उतरुन शांत केले, मगच त्याची गाडी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ केली.
"सावी, बऱ्यापैकी तुमच्या अंगावरची झाली आहे." मानसी म्हणाली.
"हो, तुमची आणि सावीची जास्त ओळख नाहीये वाटतं." मानव म्हणाला.
"सावी झाल्यापासून मी शिक्षणासाठी पुण्यात आहे. दीदी सावीला घेऊन जेव्हाही नाशिकला जाते, तेव्हा मी तिथे नसतेच, म्हणून आमच्या दोघींची एवढी ओळख नाहीये." मानसीने सांगितले.
"मी समजू शकतो. शिक्षणासाठी घरापासून दूर रहावं लागलं की, सगळंच बदलतं. मी नोकरीसाठी पुण्यात आलो, म्हणून तर माझी आणि सावीची ओळख होऊ शकली." मानव म्हणाला.
"मला दीदीकडून कळालं की, तुमचे आई वडील बंगलोरला असतात, मग तुम्ही तिथे नोकरी न करता इकडे पुण्यात का आलात?" मानसीने विचारले.
"मी लहान असताना दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत नारायणगावला यायचो. मला इकडे रहायला खूप आवडायचं. आपलं गाव, आपली माणसं. तेव्हाच मी ठरवलं होतं की, आपल्या गावाजवळ मोठं होऊन स्थायिक व्हायचं. बाबांच्या नोकरीमुळे आम्हाला तिकडे राहणं भाग होतं.
माझं इंजिनिअरिंग झाल्यावर मी अमेरिकेत एका वर्षासाठी एक कोर्स करायला गेलो होतो. त्या इन्स्टिट्यूट कडूनच मला पुण्यात एक प्रोजेक्ट मिळाला होता. प्रोजेक्ट चालू असतानाच त्या कंपनीने मला नोकरीची ऑफर दिली. पॅकेज आणि काम दोन्ही मला मनासारखं मिळालं होतं.
शिवाय मला नारायणगाव जवळ राहता येणार होतं, म्हणून मी ती नोकरी लगेच स्विकारली." मानवने सांगितले.
"ओह! ग्रेट. तुम्ही प्रत्येक विकेंडला गावी येतात ना." मानसी म्हणाली.
"हो. तिथे एकटा राहून कंटाळा येतो. कंपनीतील बॅचलर मित्र आहेत, पण ते सगळे विकेंडला पार्टी करायचं म्हणतात आणि ते मला आवडत नाही." मानव म्हणाला.
"तुम्ही अमेरिकेत राहून आलात, तरी तुम्हाला पार्टी करायला आवडत नाही?" मानसीला प्रश्न पडला होता.
"कसं असतं ना मानसी. तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, पण जर तुमच्या मनावर जे संस्कार कोरलेले असतील, त्याचप्रमाणे तुमचं आचरण असेल." मानव म्हणाला.
"तुमच्याकडे बघून तुमचे विचार असे असतील, असं वाटत नाही." मानसी म्हणाली.
मानव हसून म्हणाला,
"मानसी मॅडम, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं."
"सॉरी, आपण पहिल्यांदाच बोलत आहोत, तरी मी तुम्हाला प्रश्न विचारुन भंडावून सोडलं." मानसी म्हणाली.
यावर मानव म्हणाला,
"सॉरी म्हणण्यासारखं काहीच नाहीये. आपले वाईब्स जुळले, म्हणून तर बिनधास्त आपण गप्पा मारु शकत आहोत. तुम्ही माझी खाणेसुमारी काढून झाली. आता तुमची वेळ आहे. तुम्ही कोणत्या कॉलेजला आहात."
"मी जे एस पी एम कॉलेजला आहे. कम्प्युटर मध्ये इंजिनिअरिंग करते आहे. हे माझं शेवटचं वर्ष आहे. पहिल्या वर्षी होस्टेलला राहिले होते. दुसऱ्या वर्षापासून कॉलेजजवळ जोगेश्वरी मिसळ सेंटर आहे, त्याच एरियात पेईंग गेस्ट म्हणून राहते." मानसीने एका दमात सगळं सांगून टाकलं.
मानव हसून म्हणाला,
"मी काही विचारण्याआधीच तुम्ही सगळं सांगून मोकळ्या झाल्या. मी मागच्या आठवड्यात दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो, तो फ्लॅट जोगेश्वरी मिसळ पासून जवळ आहे. कदाचित आपण दोघे एकाच एरियात राहत असू."
"असेल, आता तिथे गेल्यावरच कळेल. तुम्ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट का झाला?" मानसीने विचारले.
"पहिल्या फ्लॅटमध्ये माझा जो रुममेट होता, तो दररोज ड्रिंक्स करुन फ्लॅटवर यायचा. मला ते सहन झालं नाही. आता मी एकटाच फ्लॅटवर राहणार आहे." मानवने सांगितले.
"फ्लॅट आणि आयुष्य शेअर करणारी कोणीतरी घेऊन या मग." मानसी म्हणाली.
"आणायची आहेच, पण मनासारखी भेटायला हवी." मानव हसून म्हणाला.
पुणे येईपर्यंत मानव व मानसी मध्ये गप्पा सुरु होत्या.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा