Login

सूर जुळले भाग ५

Love Story

सूर जुळले भाग ५


मानसीची असाईनमेंट पूर्ण झाल्याने ती मानव सोबत नारायणगावला सावीला भेटण्यासाठी गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते परतीच्या प्रवासाला लागले होते.


"लहान मुलांसोबत खेळल्यावर आठवड्याभराचा थकवा निघून गेला." मानसी म्हणाली.


"हो, म्हणूनच मी प्रत्येक विकेंडला इकडे येण्याचा प्रयत्न करतो." मानवने सांगितले.


"श्रुती दीदीच्या लग्नासाठी मोठी सुट्टी घेणार असाल ना?" मानसीने विचारले.


"एक आठवडा घेईल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. पुढच्या आठवड्यात नवीन प्रोजेक्ट सुरु होणार आहे, त्यामुळे तर मला नारायणगावला यायला जमणार नाही. प्रोजेक्ट संपेपर्यंत एकदम पॅक शेड्यूल असणार आहे." मानवने सांगितले.


"आज म्हणूनच लवकर आलात का? एरवी संध्याकाळी निघत असतात ना?" मानसीला प्रश्न पडला होता.


"श्रुतीच्या लग्नात घालायला कपडे घ्यायचे आहेत. आज घेतले नाही, तर प्रोजेक्ट संपेपर्यंत जमणार नाही." मानवने उत्तर दिले.


"बहिणीच्या लग्नात भावाला उठून दिसावं लागेल, आता पुढचा नंबर तुमचाच आहे ना?" मानसी हसून म्हणाली.


"हे सेम वाक्य काल आई म्हणाली होती. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल, तर आपण एकमेकांना अहो काहो करण्यापेक्षा एकेरी नावाने हाक मारुयात ना." मानव म्हणाला.


"चालेल ना. माझी काहीच हरकत नाहीये." मानसीने सांगितले.


मानवने मानसीला तिच्या रुमवर सोडले.


संध्याकाळी मानसी अभ्यास करत बसलेली असताना तिला मानवचा फोन आला,


"हॅलो,मानसी बिजी आहेस का?" मानवने विचारले.


"इशा बाहेर गेलेली आहे, तर अभ्यास करत बसले होते. बोल ना." मानसीने उत्तर दिले.


"शॉपिंग करायला माझ्यासोबत माझा एक मित्र येणार होता, पण ऐनवेळी त्याने मला दगा दिला. तू माझ्यासोबत येशील का? मला एकट्याला शॉपिंग करायला जमणार नाही." मानव म्हणाला.


"हम्मम, चालेल. मी दहा मिनिटात तयार होते, मग तू मला घ्यायला ये." मानसीने सांगितले.


मानवचा फोन कट करुन मानसी फ्रेश होऊन तयार झाली, तेवढ्यात इशा रुममध्ये आली.


"मानसी, कुठे चालली आहेस?" इशाने विचारले.


"मानवला कपड्यांची शॉपिंग करायची आहे, म्हणून त्याने मला सोबत येण्याबद्दल विचारले." मानसीने सांगितले.


"ओहो, आता तर शॉपिंग करायला सोबत जायला लागले. तुमच्यात नक्कीच काहीतरी होणार." इशा मानसीला चिडवत म्हणाली.


मानसी इशाकडे डोळे वटारुन बघून म्हणाली,

"इशा,तू पण ना. मी जाते,मानव खाली येऊन थांबला आहे."

मानसी मानवच्या गाडीत बसली. मानवने गाडी एका मॉलजवळ नेऊन थांबवली. गाडी पार्किंग मध्ये लावून दोघांनी मॉलमध्ये प्रवेश केला.


"मानव, तुला कोणत्या प्रकारचे कपडे घ्यायचे आहेत? पॅटर्न आधी ठरलेला असला की, जास्त गोंधळ उडत नाही." मानसीने विचारले.


"मी पॅटर्न ठरवला नाहीये. हळद, लग्न व रिसेप्शन यासाठी कपडे घ्यायचे आहेत. आता तुच सुचव." मानवने सांगितले.


"हळदीसाठी पिवळा कुर्ता व सफेद चुडीदार. शेरवानी व थ्री पिस यातील एक लग्नासाठी व एक रिसेप्शनसाठी. अजून काही व्हरायटी दिसली तर त्यातून ठरवता येईल." मानसी म्हणाली.


"तू किती सॉरटेड मुलगी आहेस. माझ्या मनातील गोंधळ लगेच दूर केला." मानव म्हणाला.


दोघेजण एका शॉपमध्ये गेले, तिथे त्यांना मनासारखे कपडे मिळाले होते. दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन शूज घेतले. तिसऱ्या शॉपमध्ये जाऊन मानवने परफ्युम घेतला. मानवने मानसीसाठी एक परफ्यूम घेतला. शॉपिंग करुन थकल्याने ते फूड झोनमध्ये जाऊन बसले. आपापल्या आवडीचे पदार्थ त्यांनी ऑर्डर केले.


"मानसी, माझ्याशी मैत्री करशील का?" मानवने आपला हात पुढे करुन विचारले.


"बघेल, विचार करेल, उद्या-परवा सांगेल." मानसीने स्माईल देऊन सांगितले.


"मानसी, मी इतकाही वाईट मुलगा नाहीये." मानव म्हणाला.


"मी असं काही म्हटलं आहे का?" मानसीने विचारले.


"तू माझ्यासोबत मैत्री करण्याचे विचार करुन ठरवणार आहेस, मग ह्या सगळ्याचा तोच अर्थ झाला ना." मानव म्हणाला.


"बरं आता मला एक सांग. तुला माझ्याशी मैत्री करावी का वाटली?" मानसीने तिच्या मनातील प्रश्न विचारला.


"आपल्या दोघांचे वाईब्स मॅच होतात म्हणून." मानवने उत्तर दिले.


वेटर ऑर्डर घेऊन आला आणि दोघांच्या बोलण्यात खंड पडला.


भूक लागल्याने दोघांनी आपापले लक्ष खाण्यावर केंद्रीत केले.


खाऊन झाल्यावर मानव व मानसी दोघे तेथून निघाले. गाडीत दोघे एकमेकांशी काहीच बोलले नाही. मानसी गाडीतून उतरताना आपला हात मानवपुढे धरत ती म्हणाली,

"तुझ्याशी मैत्री करायला मला आवडेल." 


मानव व मानसीने हस्तांदोलन केले.


"मानसी, थँक् यू सो मच." मानव म्हणाला.


"कशासाठी?" मानसीने विचारले.


"माझ्यासोबत शॉपिंग करायला आली त्यासाठी." मानवने उत्तर दिले.


"मैत्रीचा नियम माहिती नाहीये का? मैत्रीत नो सॉरी, नो थँक् यू." मानसी हे बोलून निघून गेली.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all