सूर जुळले भाग ७
मानसीने अचानक प्रश्न विचारल्यावर मानवला काय उत्तर द्यावे, हे कळत नव्हते. तो किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी पाणी घेऊन आला. आपल्या हातातील पाण्याचा ग्लास व रुमाल मानसीकडे देताना तो म्हणाला,
"पाणी पिऊन शांत हो आणि डोळ्यातील पाणी पुस. माझ्यामुळे तुझ्या डोळयात पाणी आलेले मला आवडणार नाही."
मानसीने डोळ्यातील पाणी पुसले. पाणी पिऊन ती म्हणाली,
"तू माझ्याशी खोटं का बोलला? ह्याचे उत्तर मला मिळणार आहे का?"
"मी तुला सहज घरी बोलावलं असतं, तर तू आली नसतीस. मला तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणून मी तुला घरी बोलावलं." मानवने उत्तर दिले.
"असं अर्जंट काय बोलायचं होतं?" मानसीने विचारले.
यावर मानव म्हणाला,
"मानसी, मला तुला मिठी मारायची होती. बाहेर कुठे मला तुला मिठी मारता आली नसती, म्हणून मी तुला घरी बोलावलं.
मानसी, मी तुझ्या प्रेमात कधी पडलो, हे मला कळलं सुद्धा नाही. मानसी, गेल्या आठ दिवसांत तुझ्याशी बोलता आलं नाही, तुझा चेहरा बघितला नाही. मी तुला खूप मिस करत होतो यार. प्रत्येकवेळी सगळे आजूबाजूला असले, तरी तू माझ्यासोबत असती, तर अजून मला आली असती, असं वाटत होतं.
तुझी परीक्षा असल्याने मी फोन करुन तुझ्याशी बोलूही शकत नव्हतो, तुझा आवाज मला ऐकता येत नव्हता. जेव्हाही नवीन कपडे घालून तयार झाल्यावर मानसीला आपला हा फोटो पाठवावा लागेल, हा विचार करुन मी फोटो काढत होतो. मानसीला माझा लूक आवडेल का? हा विचार मी करत होतो.
सकाळी आल्यापासून तुला भेटावं, बघावं, असं वाटतं होतं.
मानसी, मी तुझ्या प्रेमात कधी पडलो? हे मला सांगता येणार नाही.
मला तू खूप खूप आवडते. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.
मानसी, आय लव्ह यू सो मच. माझ्याशी लग्न करशील का?"
मानसी आपल्या जागेवर स्तब्ध झाली होती. ती काहीच बोलत नव्हती.
मानव पुढे म्हणाला,
"मला कल्पना आहे की, आपली आत्ता काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. हे सगळं खूप लवकर होत आहे, पण मानसी आपल्या वाईब्स मॅच होत आहेत ना.
तू लगेच उत्तर दिले नाहीस तरी चालेल. तू तुझा वेळ घे. फक्त मला एक मिठी मारु दे प्लिज."
मानवने मानसी जवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली. मिठीतून बाजूला झाल्यावर मानसीच्या डोळयात पाणी आले होते.
"तू अजूनही रडते आहेस. तुला मी मिठी मारलेली आवडली नाही का?" मानवने विचारले.
"मानव, मला काय बोलू? हेच कळत नाहीये. मी तुझ्यावर प्रेम करते का? याच प्रश्नाचं उत्तर गेल्या काही दिवसांपासून मी शोधत आहे." मानसी म्हणाली.
"मानसी, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हटल्यावर तुझं माझ्यावर प्रेम असेलचं असं नाहीये. तू दडपण घेऊ नकोस." मानव म्हणाला.
"माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या मिठीने मला दिलंय. मानव तुझ्या मिठीत मला अवघडलेपणा अजिबात वाटला नाही, त्या मिठीतून सुटू नये असं वाटत होतं. ती मिठी मला हवीहवीशी वाटत होती. आय लव्ह यू टू मानव." मानसी म्हणाली.
मानवने तिला पुन्हा मिठी मारली. आता दोघांच्याही डोळयात पाणी होते.
मानवने जेवण ऑर्डर केले. दोघांनी सोबत बसून जेवण केले. मानसी व मानव एकमेकांचा हातात हात घेऊन कितीतरी वेळ गप्पा मारत बसले होते. इशाचा फोन आल्याने खूप उशीर झाला असल्याचे मानसीला जाणवले.
मानव मानसीला तिच्या रुमवर सोडायला गेला. गाडीतून उतरण्याआधी मानसीने त्याला मिठी मारली.
मानव व मानसीचे प्रेमाचे सूर जुळले होते.
रुममध्ये गेल्यावर मानसीने इशाला सगळं काही सांगितलं.
मानव व मानसीमध्ये प्रेमाचा अंकुर फुलू लागला होता.
दररोज रात्री ते एकमेकांना भेटू लागले होते.
मानसीला दररोज भेटता यावे, म्हणून मानव नारायणगावला जाणे टाळत होता.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा