सूर जुळले भाग ८
मानवचा पाय मुरगळल्यामुळे त्याला घराबाहेर पडणे शक्य नव्हते, म्हणून मानसी त्याला भेटायला त्याच्या घरी गेली होती.
मानसी त्याच्या घरातील पसारा बघून म्हणाली,
"मानव, लग्न झाल्यावर घरात असा पसारा केलेला मला अजिबात आवडणार नाही. मला अस्ताव्यस्त पडलेले सामान आवडत नाही. तू जरा नीटनेटका राहण्याची सवय लावून घे, नाहीतर ह्याच मुद्द्यावरुन आपल्या दोघांमध्ये भांडण होत जाईल."
"तुझ्याशी लग्न करण्याचा विचार बदलावा लागेल, असं दिसतंय." मानव हळूच म्हणाला.
"हिंमत असेल तर मोठयाने बोल." मानसी म्हणाली.
"मानसी, ऐक ना. आईने माझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे." मानव म्हणाला.
मानसी मानवच्या शेजारी जाऊन बसली, मग ती म्हणाली,
"तू काय सांगितलंस?"
"मला इतक्यात लग्न करायचं नाही म्हणून." मानवने उत्तर दिले.
"आईने तुला फोर्स केला नाही का?" मानसीने विचारले.
"आईने कितीही फोर्स केला, तरी मी लग्नाला लगेच तयार होणार नाही. मी तिला पटेल असं कारण दिलं आहे. तुझी परीक्षा होईपर्यंत मी काहीतरी कारण देऊन लग्नाचा विषय टाळणार आहे." मानवने सांगितले.
"मानव, पप्पांना हे सगळं सांगण्याची माझ्यात तर हिंमतच नाहीये. त्या विचाराने आत्ताच घाम फुटतो आहे." मानसी म्हणाली.
मानव तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
"मनू, सांगावं तर लागणार आहेच. मी तुझ्यासोबत असेल डोन्ट वरी."
"तू मला आज मनू कसा काय म्हणाला?" मानसीने विचारले.
"असंच म्हणावं वाटलं म्हणून म्हणालो. तुला सगळेजण प्रेमाने मनूचं म्हणतात ना." मानव म्हणाला.
मानसीने मानवच्या खांद्यावर डोकं टेकवलं व ती म्हणाली,
"मला कधीच वाटलं नव्हतं की, मी कोणाच्या प्रेमात पडेल आणि मला त्याच व्यक्तीशी लग्न करायचं असेल. पप्पा म्हणतील त्या मुलाशी लग्न करायचं, हे मी ठरवलं होतं."
"मलाही वाटलं नव्हतं. कॉलेजमध्ये असताना मैत्रिणी अनेक होत्या, पण कोणासोबतचं माझे सूर जुळले नाही. तुझ्यासोबत पटकन जुळले." मानव म्हणाला.
"आपल्या घरुन आपल्या लग्नाला विरोध होणार तर नाही ना?" मानसीला प्रश्न पडला होता.
"व्हायला तर नकोच. तुझी बहीण माझी वहिनी असल्याने संबंध होऊ शकतो, शिवाय तुही इंजिनिअर आहेस. शक्यतो विरोध होणार नाही." मानव म्हणाला.
"मानव, माझा हात सोड. आता मी निघते. प्रोजेक्टचं काम बाकी आहे. फायनल एक्साम जवळ येत आहे, अभ्यास करावा लागणार आहे." मानसी म्हणाली.
"मनू, जरावेळ बस ना. मला खूप भारी वाटतंय." मानव म्हणाला.
यावर मानसी म्हणाली,
"मलाही भारीच वाटतंय रे, पण परीक्षाही तेवढीच महत्त्वाची आहे. परीक्षेत नापास झालेली सून तुझ्या आई वडिलांना चालेल का?"
"हो तेही आहेच. मनू, परीक्षा झाली की निकालाची वाट न बघता घरी लग्नाचा विषय काढायचा. मी तुझ्यापासून दूर राहू नाही शकत. रात्री तुझी आठवण आली की, मोबाईलमध्ये फोटो बघत बसतो." मानव म्हणाला.
"हो रे बाबा. चल मी निघते आता. एक सांगू तू मला इथून पुढे मनूचं म्हणत जा. तुझ्या तोंडून मनू ऐकताना जाम भारी वाटतंय." मानसी म्हणाली.
मानवने तिला घट्ट मिठी मारली.
प्रोजेक्टच्या कामामुळे मानसी व मानवच्या भेटी कमी होऊ लागल्या होत्या. मानसी टेन्शनमध्ये असल्याने मानव तिला समजून घेत होता. मानसीने तिचं पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रीत केले होते.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा