सुरांची मैफिल (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
सुरांची मैफिल

आचार्य, धनी, मणी आणि कोतवाल अंग शेकत बसले होते.

“त्या रामाला सगळं समजलं आहे. चंद्रमणी आज नाही तर आजपासून नवव्या दिवशीच म्हणजेच महापुजेच्या आधीच आणला जाईल. तो आता सावध झाला आहे. सावध माणसाला काही करणे म्हणजे मूर्खपणा असतो.” आचार्य शेकत शेकत म्हणाला.

“अर्थात?” धनीने विचारलं.

“म्हणजे आपण जी चंद्रमणी चोरण्याची योजना केली होती ती आता रद्द करायची. आपण काही करायचे नाही. जे व्हायचे ते होऊदे. फक्त तो रामा महाराजांच्या नजरेतून कसा उतरेल हे पाहू.” आचार्य म्हणाला.
***********************
तर इथे रामाच्या घरी रामा आणि शारदा झोपाळ्यावर बसलेले असतात.

“मलाही चंद्रमणी बघायचा आहे.” शारदा लाडिकपणे म्हणाली.

“हो बघायचा ना. बघितलाच पाहिजे. दहाव्या दिवशी बघ.” रामा म्हणाला.

“नाही सगळ्यांच्या आधी बघायचा आहे.” शारदा म्हणाली.

“ते अशक्य आहे शारदा. तो खूप बहुमूल्य हिरा आहे त्यामुळे असे कोणालाही तो बघण्याची परवानगी नाही. त्यात तो ब्रम्ह कमळात आहे. गायनाच्या स्पर्धेत ते कमळ उमलल्याशिवाय तो दिसणारही नाहीये.” रामा तिला समजावत म्हणाला.

अश्यातच नऊ दिवस संपले आणि गणेशोत्सवाचा दहावा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे दरबारात चंद्रमणी आणला गेला. ब्रम्ह कमळात बंद असलेला तो चंद्रमणी गणपती पुढे ठेवण्यात आला. भरपूर लोकांची गर्दी देखील दरबारात होतीच.

“महाराज आरतीची वेळ होत आली आहे. आरती करून घ्या.” आचार्यने सांगितले.

राजाने आरती करायला सुरुवात केली. रामा मात्र काळजीत दिसत होता.

“काय झालं पंडित रामा तुम्ही काळजीत दिसताय.” मंत्र्यांनी विचारलं.

“चंद्रमणीची काळजी वाटतेय मंत्रीवर.” रामा म्हणाला.

“आता कसली काळजी? चंद्रमणी इथे आणला गेला आहे आणि तुम्ही नऊ दिवस अगदी योग्य रीतीने तो सांभाळला. आता काळजी करू नका.” मंत्री म्हणाले.

“उलट आत्ताच तर खरी काळजी सुरू झाली आहे. इतके दिवस चंद्रमणी कडक सुरक्षेत होता पण आज तो सार्वजनिक झालाय. नक्कीच काहीतरी होऊ शकतं.” रामा म्हणाला.

“इथे सगळीकडे आपले सशस्त्र सैनिक आहेत आणि बाहेरही काही संशयास्पद दिसले तर हल्ला करायला एक सैनिकांची तुकडी तयार आहे. असं काही होणार नाही. कदाचित हे तुमच्या मनाचे खेळ असतील. तुम्हाला जसे वाटत आहे तसा चोर नसेलच.” मंत्री म्हणाले.

“नाही मंत्रीवर! चोर नक्कीच काहीतरी वेगळा विचार करत असणार. तुम्ही, मी विचारही करू शकत नाही अशी काहीतरी योजना असू शकते. माझे मन मला सांगतेय इथे काहीतरी वेगळं अघटीत घडणार आहे.” रामा म्हणाला.

“तुम्हाला कोण असे करेल असं वाटतंय?” मंत्र्यांनी विचारलं.

“नाही माहित पण मला काहीतरी वाईट घडणार आहे याची कुणकुण लागतेय.” रामा म्हणाला.

इतक्यात आरती संपली आणि आता स्पर्धा सुरू होणार होती. राजा त्याच्या जागी स्थानापन्न झाला आणि बाकी दरबारी देखील.

“आम्ही विजयनगर राज्याचे महामंत्री तिम्मानासू महाराज श्री कृष्णदेवराय आणि संपूर्ण विजयनगर राज्याच्या वतीने आपल्या खास पाहुण्यांचे स्वागत करतो.” महामंत्री म्हणाले.

टाळ्यांच्या कडकडाटात सगळ्यांचे स्वागत झाले.

“महाराजांची अनुमती असेल तर आजच्या विशेष कार्यक्रमाची सुरुवात करायची?” मंत्र्यांनी विचारलं.

राजाने आदेश दिल्यावर मंत्री पुढे बोलू लागले; “जसे की सर्वांना माहीतच आहे या स्पर्धेत जो गायक किंवा गायिका हे ब्रम्ह कमळ उमलवण्यात यशस्वी ठरेल तोच स्पर्धक या स्पर्धेचा विजेता किंवा विजेती असेल. त्या विजेत्याला योग्य तो सन्मान दिला जाईल आणि चंद्रमणी गणपती बाप्पाच्या चरणी स्वतः महाराज अर्पण करतील.” मंत्री म्हणाले.

सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या.

“आता आपले पहिले स्पर्धक मथुरा दास यांच्या मधुर वाणीने स्पर्धेची सुरुवात करतील.” मंत्री म्हणाले.

लगेचच मथुरा दास पुढे आला. तिथे गायकांना बसून गाता यावे यासाठी व्यवस्था केलेलीच होती. तो तिथे गेला. राजाला आणि गणपतीला नमस्कार केला. राजाने त्याला सुरू करण्यासाठी खूण केली आणि त्याने अत्यंत मधुर आवाजात रामाचे भजन गायले. सगळे अगदी मंत्रमुग्ध झाले होते परंतु ब्रम्ह कमळ मात्र उमलले नाही. त्याचे संपूर्ण सादरीकरण झाल्यावर राजाने टाळ्या वाजवल्या आणि त्याबरोबर सर्वांनीच.

“खूप सुंदर सादरीकरण. जरी ब्रह्म कमळ उमलले नसले तरी आमच्या मनातील पुष्पे उमलली आहेत.” राजा त्याची प्रशंसा करत म्हणाला.

त्याने वाकून प्रशंसा स्वीकारली आणि जागेवर जाऊन बसला.

“आता आपले पुढचे गायक योगिंद्र राव आपल्या अद्भुत वाणीने सादरीकरण करतील.” मंत्री म्हणाले.

तोही व्यवस्था होती तिथे जाऊन बसला आणि कर्नाटकी संगीताचा प्रकार त्याने सादर केला मात्र त्याच्यानेही ब्रम्ह कमळ उमलले नाही. राजाने त्याचीही स्तुती केली.

“आता आपल्या विदेशी अतिथी क्लारा त्यांचे गायन सादर करतील.” मंत्री म्हणाले.

त्यावर आचार्य सगळ्यात जोरात टाळ्या वाजवू लागला. ती समोर आली आणि तिचा गाऊन दोन्ही चिमटीत धरून गुडघ्यात वाकून तिने राजाला प्रमाण केला. ती त्या गायकांसाठी असलेल्या गायनाच्या गादीवर उभी राहिली आणि हातवारे करत इंग्रजीत गाणे म्हणू लागली. दरबारात कोणालाच काहीच कळत नव्हते.

“नक्की यांनाच आमंत्रित केले असेल ना?” मंत्री हळूच रामाच्या कानाजवळ पुटपुटले.

“हो मंत्रीवर. यांच्या इथे अशीच पद्धत असते. त्यांची गाण्याची संस्कृती वेगळी आहे.” रामा हळूच म्हणाला.

इतक्यात तिचे गाणे संपले आणि ब्रह्म कमळ देखील उमलले नाही. आचार्य मात्र जोरात टाळ्या वाजवत उभा राहिला.

“व्वा! अद्भुत महाराज. खूप सुंदर सादरीकरण होते. काय ते सूर, काय ती लय आणि काय ते शब्द! खूपच अप्रतिम होते. यांनाच या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक द्यावे.” आचार्य म्हणाला.

“निःसंकोच पण माफ करा आचार्य. यांचे प्रदर्शन छान होते परंतु स्पर्धेचे संपूर्ण निकष पाळले गेले नाहीयेत. ब्रम्ह कमळ उमलले नाही.” मंत्री म्हणाले.

“हे काय? इथे तर कलेला किंमतच नाही.” तो हळूच पुटपुटला.

“काही म्हणालात का आचार्य?” मंत्र्यांनी विचारलं.

“नाही. आम्ही काय म्हणणार? आता जे बोलायचे ते महाराज बोलतील.” आचार्य म्हणाला.

“खूप छान. खरंतर आमच्याकडे शब्द नाहीयेत प्रशंसा करायला. आम्हाला यांचे शब्दच कळले नाहीत पण जे काही सादर झाले ते छान होते.” राजा म्हणाला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

“आता आपले पुढचे स्पर्धक आहेत सोमनाथ. त्यांच्या विषयी तर बोलायला शब्द नाहीत आमच्याकडे असे…” मंत्री बोलत होते पण सोमनाथ मध्येच उठून बोलू लागला; “कशाला असतील आमच्या सारख्या निर्धन मनुष्याबद्दल…” त्याला तोडत रामा त्याच्या जवळ जाऊन म्हणाला; “असं नकारात्मक का बोलताय? छान प्रसन्न रहा आणि ही संधी मिळाली आहे त्याचे सोने करा. माझ्या शुभेच्छा आहेत.”

“बरोबर आहे तुमचे. आज मी सगळ्या निर्धन, गरिबांचा प्रतिनिधी म्हणून या श्रीमंतांना दाखवून देणार आहे आम्हीही काही कमी नाही.” तो म्हणाला आणि तिथे जाऊन बसला.

राजाने सांगायच्या आतच त्याने त्याचे (रड)गाणे सुरू केले. तो गाताना ऐकून हा नक्की गायकच आहे ना असे प्रश्न सगळ्यांच्याच चेहऱ्यावर होते. उगाचच गाण्यातून देखील निर्धन असल्याचा खेद तो दाखवत होता. त्याचे गाणे झाल्यावर देखील साहजिक ब्रम्ह कमळ उमलले नाही.

“ही चाल आहे या श्रीमंतांची.” तो म्हणाला आणि जागेवर जाऊन बसला. तरीही सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

“आता आपल्या शेवटच्या स्पर्धक सुरांची सम्राज्ञी असलेल्या रूपा देवी आपले सादरीकरण करतील.” मंत्री म्हणाले.

ती लगेच जागेवरून उठली आणि राजाला प्रणाम करून बोलू लागली; “महाराज जर शक्य असेल तर आमच्या सादरीकरणाच्या दरम्यान दिवे मध्यम करावेत अशी आम्ही विनंती करतो.”

“माफ करा रूपा देवी पण काही आपत्ती नसेल तर मी कारण विचारू शकतो?” रामाने जरा घाबरून विचारले.

“सरस्वती देवीच्या आशीर्वादाने आणि आमच्या सुरांनी आम्ही ते ब्रम्ह कमळ उमलावण्यात यशस्वी होऊ याची आम्हाला खात्री आहे. ते उमलल्यानंतर चंद्रमणीचे तेज पसरेल त्याची अनुभूती काही वेगळीच असेल.” ती म्हणाली.

“पण देवी चंद्रमणी एक…” रामा बोलत होता पण त्याचे काहीच ऐकून न घेता राजा बोलू लागला; “अद्भुत! मंत्रीवर या म्हणतायत तसेच होऊ दे.”

ती राजाला धन्यवाद देऊन गादीवर जाऊन बसली. रामा लगेचच त्या ब्रम्ह कमळाच्या बाजूला जाऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मंत्र्यांनी दोन टाळ्या वाजवल्या आणि दरबारातील दिवे कमी करण्यात आले. तर इथे रूपा देवीने गणपतीला नमस्कार केला आणि गाण्याची सुरुवात केली. एक गणपतीचे भजन ती गायली आणि ते संपता संपता सूर लावल्यावर ते कमळ उमलले. सर्व दरबारात त्या चंद्रमणीचा लख्ख प्रकाश पडला होता. सर्व दरबार त्याने उजळून निघाला होता. राजा सकट सगळे उभे राहून ते पाहत होते. राजाने आणि सगळ्यांनी हात जोडले आणि जोरजोरात टाळ्यांचा कडकडाट झाला.

क्रमशः…..

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all