सुसंगती सदा घडो..
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो
शालेय अभ्यासक्रमातल्या कविता हा दिवसेंदिवस गंभीर विषय होत चालला आहे असं वाटतं. अर्थात खूप पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेल्या सर्वच कविता सोप्या होत्या असेही म्हणता येत नाही. परंतु कविता असं म्हटलं की ती गाण्यासाठी असायची. पद्य विभाग हा पाठांतर करताना गळ्यावर म्हणणे अपेक्षित असे. याचाच अर्थ कवितेला चाल असणे ही अगदी नैसर्गिक आणि अनिवार्य गोष्ट होती. मुक्तछंदातील कविता त्यावेळेस अभ्यासक्रमात जवळपास नसतच. आणि खूप जुन्या संत पंत कवींच्या कविता, त्यांचे चांगले वेचे निवडून अभ्यासक्रमात लावले जात असत. हेतू एवढाच असे की त्यानिमित्ताने मुलांच्या डोळ्याखालून चांगलं साहित्य जावं आणि चांगले संस्कार घडावेत. त्यामागचं सहज कारण हेच आहे की चांगली संगत लागणे किंवा चांगले संस्कार घडणे ही अतिशय मेहनतीची नि कष्टाची गोष्ट असते. मनुष्य हा मूलतः प्राणी असल्यामुळे आळसाकडे आणि वाईट गोष्टींकडे त्याचा अगदी नैसर्गिकरीत्या कल असतो. ज्या गोष्टी करायला सोप्या जातील त्याच निवडणे ही मानवी मेंदूच्या बाबतीत सहज गोष्ट असते. आणि चांगल्या गोष्टी जर का आपल्या अंगी बाणवायच्या असतील तर त्याला कष्टही अर्थात अधिक असतात. वाईट गोष्टी शिकायला कष्ट लागत नाहीत. वाईट गोष्टी बहुश: भडक असतात. त्यामुळे त्यांचं आकर्षणही जास्ती असतं. आणि लहान वयात मुलांना तेवढी समज नसल्यामुळे जी गोष्ट भडक असेल ती आकर्षक वाटण्याची शक्यता जास्त असते. आणि हे असं आकर्षक वाटण्यामध्ये वेडेवाकडे बोलणे, वेडेवाकडे वागणे, काहीही करून लक्ष वेधून घेणे, शिवीगाळ करणे धमक्या देणे इथपासून ते थेट गुन्हेगारी वर्तनापर्यंत अशा अनेक गोष्टी मोडतात. या सगळ्या गोष्टी घडू द्यायच्या नसतील तर त्यासाठी अतिशय प्रयत्न करावे लागतात. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून शक्यतो अभ्यासक्रमात असलेल्या गोष्टी निवडताना चांगल्या कथा, कविता, वेचे निवडण्याकडे शिक्षण मंडळाचा आजही कल जास्त असतो.
प्रवाहाविरुद्ध जाणे कठीणच असतं. पण हा जो प्रवाह आहे तो भल्याबुऱ्या, बऱ्यावाईट सगळ्याच गोष्टी घेऊन आपापल्या गतीने चाललेला असतो. एखाद्याला जर किनारा गाठायचा असेल किंवा पोहून पलीकडे व्हायचं असेल तर त्याला प्रवाहाच्या गतीला विरोध करीत करीतच त्याला जावं लागतं. प्रवाहाच्या बरोबर वाहून जाणारा माणूस कधी किनारा धरू शकत नाही. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती वाया जाते किंवा ताळतंत्र सोडून वाटते तेव्हा हा वाहवत गेला असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे प्रवाहाबरोबर काहीही हालचाल न करता वाहत जाणं आणि आपल्या हिताचा विचार न करणं या अर्थीच हा वाक्प्रचार आहे हे अगदी स्पष्ट आहे. प्रवाहाविरुद्ध पोहणे हा वाक्प्रचारही विशेष अर्थाने वापरला गेलेला आहे. याचा अर्थ सर्व लोक ज्या दिशेने जातात त्याच्यापेक्षा वेगळी दिशा निवडणे. आणि त्यात भरपूर कष्ट असतात हाही एक वेगळा संदर्भ असतो. कारण पुन्हा एकदा सरळ आहे. रुळलेल्या मार्गाने जायचं त्याला कमीत कमी कष्ट असतात. त्याचे परिणाम काय आहेत याचा विचार करण्याची बुद्धी प्रत्येकाकडे असते असेही नाही.
ज्याला समोरचा काठ नीट दिसत असतो, किनाऱ्यावर गेल्यावर काय करायचं आहे हे ज्याच्या मनात पक्कं असतं तो माणूस प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं धाडस दाखवतो. जी वाट अवघड आहे ती वाट पकडणारा माणूस हा एक प्रकारे प्रवाहाविरुद्ध पोहत असतो. या सगळ्या झाल्या प्रवाह या विषयाच्या अवतीभोवती असलेल्या गोष्टी. पण वहावत जायचं नसेल तर मुळात सुसंगती घडावी लागते. प्रवाहाविरुद्ध जर पोहायचं असेल तर पोहणं उत्तम आलं पाहिजे. आणि पोहणं उत्तम आलं पाहिजे तर ते शिकलं पाहिजे. शिकायचं असेल तर त्यासाठी परिश्रम, चिकाटी, योग्य दिशा, अभ्यास या सगळ्याच गोष्टी आवश्यक असतात. मग लहान मूल मोठं होताना या सर्व गोष्टी गरजेच्या असतात. कारण व्यसन, अश्लीलता, गुन्हेगारी या सर्व गोष्टींच्या आकर्षणाला बळी पडायचं हेच वय असतं. चांगलं कोण वाईट कोण हे समजावून, वेळप्रसंगी श्रीमुखात भडकावून सांगणारं कोणी जर आयुष्यात नसेल तर मग प्रवाहाबरोबर वाहत जाऊन अधोगती ठरलेली असते. लहानपण हे फार संवेदनशील असतं. एकदा का त्यावर अयोग्य भाषेचे संस्कार झाले की मग त्यातूनच अयोग्य वागणं सुरू होतं आणि मग गुर्मी, उर्मटपणा, मग्रुरी, माज वाढत जातो. अख्ख्या जगावर कायम अविश्वास दाखवणारी मुलं पुढे जाऊन भांडणाच्याच मूडमध्ये राहतात. असं मूल कधी प्रसन्न हसताना दिसणार नाही. आपल्याला कुणीतरी काहीतरी करणारच आहे आणि त्यासाठी आपण विरोध करायला सदैव तयार असलं पाहिजे हेच ती मुलं शिकलेली असतात.
आणि मूल बिघडलं की सोप्यात सोपा उपाय म्हणजे आईवर खापर फोडणं. पण बाहेरच्या जगात कसं वागावं हे मुलं वडिलांकडे बघूनच शिकतात हे मात्र सोयिस्करपणे विसरलं जातं कारण आईच्या बाजूने बोलणारं घरात कुणीच नसतं. वडिलांसोबत त्यांचं कुटुंब असतं. ते सर्वजण त्यांचीच बाजू घेऊन आईलाच दोष देतात. परिणामतः मूल स्वतःच्या चुकीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरायला शिकतं. आपण चुकतो आहोत हेच त्याला मान्य नसतं. मग आपल्या चुकीसाठी सॉरी म्हणणं ही तर फार दूरची गोष्ट असते. सतत उर्मट, शिवराळ भाषा वापरणारे पुरुष अनेक 'उच्चशिक्षित' घराघरांतून आढळतात. अशीच तथाकथित उच्चवर्गीय लोकं मुलांसमोरच त्यांच्या आईला शिवीगाळ करणे, अंगावर धावून जाणे, हात उगारणे, अपमानास्पद हावभाव करणे हे अगदी सहज करीत असतात. तेच शिकलेलं मूल जर शाळेत दुसऱ्याशी तसं वागलं तर नवल ते काय? तिथेही मग पालक मुलाच्या बाजूने अरेरावी करायला तयारच असतात. याचा परिणाम काय होईल याचा विचार अशा लघुदृष्टीच्या माणसांमध्ये दिसत नाही. कारण मी म्हणजे कुणीतरी मोठा याच अहंकाराची झापडं त्यांनी कायमची डोळ्यांवर चढवलेली असतात. सुसंगती घडणं खूप खूप महत्त्वाचं आहे ते यासाठीच. घरातच जर कुसंग घडत असेल तर राष्ट्र नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. लहानपणी झालेले संस्कार कायम सोबत करतात. अगदी मरेपर्यंत सोबत करतात. म्हणून मतीला लागलेला कलंक जर झडायचा असेल तर चांगली संगत घडणं आवश्यक असतं. एकदा का चांगली संगत मिळाली की सवयी आपोआपच सुधारतात. वाणी सुधारते. आपोआपच सगळ्यांशी चांगलं संभाषण करता येतं. सुध मुद्रा सुध बानी हे गाण्यालाच नव्हे तर आयुष्यालाच आवश्यक असतं. ती ज्यांच्याकडे नसते त्यांच्यापासून घरातल्या माणसांना त्रासच होतो आणि 'प्रेम नको पण शिव्या आवर' म्हणण्याची वेळ येते. तस्मात् या साऱ्याचं मूळ असलेली सुसंगती घडणं महत्त्वाचं!
©® ॲड अपर्णा परांजपे प्रभु

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा