Login

सुसंवाद भाग 2

भाऊ बहिणीचे प्रेम
सुसंवाद भाग 2


पंकज शुभमला म्हणाला, ‘ अरे शुभम, ती बरी आहे. पण सध्या ऑफिसच्या कामामुळे तिला वेळ मिळाला नसेल फोन उचलायला. मी तिला सांगतो तुला फोन करायला तू काळजी करू नकोस.’ बाकी गप्पा मारून पंकजने फोन ठेवला आणि तो वैशालीला म्हणाला, ‘ काय गं, इतर वेळी शुभमचा फोन आला की लगेच बोलतेस. पण आज माझ्या फोनवरून पण बोलली नाहीस. आणि त्याचे फोन पण उचलले नाहीस. काय झालंय? अजून राग गेला नाही का?’ वैशालीने काही नाही असं सांगून वेळ मारून नेली हे पंकजच्या लक्षात आले. पण तो काही बोलला नाही. त्याच्या लक्षात आलं की ह्या सगळ्यामुळे शुभम आणि वैशालीच्या नात्यात दुरावा आला आहे. आणि त्याला खूप वाईट वाटलं. कारण मुळात त्याचे आई बाबा लवकर गेले होते आणि त्याला सख्खे भाऊ बहीण असं कोणीच नव्हतं. काका आणि काकू होते तेपण गावाला राहायला होते. एक चुलत बहीण होती पण तीसुध्दा परदेशी असायची. आणि ती इतकी कामात असायची की तिला पंकज आणि वैशालीच्या लग्नाला सुद्धा यायला जमलं नव्हतं. त्यामुळे नेहमीच पंकजला शुभम आणि वैशालीचा हेवा वाटायचा. आता ह्यांच्यातल अंतर कमी का करायचं ह्याचाच तो विचार करत होता एवढ्यात त्याला त्याच्या बहिणीचा म्हणजेच सलोनीचा फोन आला. आणि ती खूप वर्षांनी भारतात येते आहे असा तिचा निरोप ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्याने तिला घरी आठवडाभर राहायला यायचं आमंत्रण दिलं होतं आणि तिनेसुद्धा ते आनंदाने स्वीकारलं. ही खूप आनंदची गोष्ट त्याने वैशालीला हाक मारून सांगितली. तिला सुद्धा आनंद झाला.ती सलोनी कशी असेल ह्याविषयी विचार करायला लागली. कारण वैशालीलासुद्धा लग्नानंतर कोणीतरी नातेवाईक येणार ह्याचा आनंद झाला होता. तीसुध्दा आतुरतेने तिची वाट पाहत होती.
आज पंकज सलोनीला आणायला गेला. सलोनीला घेऊन तो जेव्हा घरी आला तेव्हा वैशालीने सगळे जीवन तयार ठेवले होते. आणि सगळे पदार्थ मुद्दामून सलोनीच्या आवडीचे केले होते. सलोनीला हे बघून खूप आश्चर्य वाटलं. तिने वैशालीला विचारलं, ‘ वैशाली, तुला माझे आवडीचे पदार्थ कसे माहिती?’ ह्यावर वैशाली हसून म्हणाली, ‘ अगं सलोनी हा जो तुझा लाडका भाऊ आहे ना तो लग्नानंतर जेव्हा जेव्हा तुझा विषय निघतो तेव्हा तुझ्या सगळ्या आवडी निवडी सांगत असतो. अगदी तुझा आवडीचा रंग कोणता इथपासून ते तुला खायला काय काय आवडत इथपर्यंत सगळ तो खूप उत्साहाने सांगतो. तू इकडे येणार हे कळल्यावरच मी ठरवलं होतं की जेवणात सगळ तुझ्या आवडीच करायचं? मग काय सगळं आवडलं का माहेरवाशिणीला?’ सलोनीला हे ऐकून खूप बरं वाटलं. ती वैशालीला म्हणाली, ‘ सगळं खूप सुंदर झालंय.’ सगळ्यांची जेवणं आवरली. मग सलोनी वैशालीला आवरायला मदत करायला लागली. लगेच वैशालीने तिला थांबवलं आणि काही काम करायला दिलं नाही. त्यामुळे सलोनी आणि पंकज हॉलमध्ये गप्पा मारायला गेले.