Login

सुसंवाद भाग 1

भाऊ बहिणीचे प्रेम
सुसंवाद भाग 1


‘काय शुभम, अरे आईला एवढं बरं नव्हतं आणि तू मला आता सांगतोयस. परवा शुभ्राचा फोन आला होता. तेव्हा ती पण काही बोलली नाही. जाऊदे आता मी येते तिला बघायला. आता कशी आहे आई? डॉक्टरकडे गेला होतास का तिला घेऊन?’ , वैशाली शुभमला फोनवर ओरडत पण होती आणि तिच्या डोळ्यात थोडं पाणी पण आलं होतं.
‘ अगं ताई थांब. किती रागावते आहेस. अगं तुला काळजी वाटायला नको म्हणून मी आणि शुभ्राने ठरवलं की तुला आधी सांगायचं नाही. आणि तसं जास्त काही झालं नव्हतं तिला. थोडा ताप आला होता. मी तिला घेऊन लगेच दवाखान्यात गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी तिला औषध दिलं आणि थोडं पथ्य सांगितलं होतं. शुभ्राने घेतली तिची नीट काळजी. आता ती बरी आहे थोडा आवाज बसलाय तो होईल बरा. शुभ्रा दिवसभर तिला गरम पाणी देते प्यायला. होईल ती बरी तू काळजी करू नकोस. आणि यायची घाई पण नको करुस. आता परत ऑफिसमधून सुट्टी काढायला लागेल तुला. आणि परत तुला पुढच्या महिन्यात आईच्या वाढदिवसाला यायचं आहे. तेव्हा भेट होईल.’ शुभम तिला समजावत होता. खरंतर त्याला वैशालीची काळजी वाटत होती म्हणूनच त्याने तिला आईच्या तब्येतीबद्दल काही सांगितल नव्हतं.
‘ बरं बाबा, तू म्हणशील तसं मी नाही येत आत्ता. आईची काळजी वाटली म्हणून फोन केला. चल ठेवते.’ फोन ठेवल्यावर पंकजने म्हणजेच वैशालीच्या नवऱ्याने वैशालीला विचारले, ‘काय गं वैशाली, काय झालं? शुभमवर एवढी का वैतागली होतीस? घरी सगळं नीट आहे ना?’ ह्यावर वैशाली पंकजला सांगायला लागली की , ‘ अहो बघा ना. आज आईचा फोन आला होता. तिच्या आवाजावरून मी ओळखलं की तिला बरं नाहीये. तिला विचारलं की काय झालं तेव्हा मला कळलं की आईला बरं नव्हतं. आता मला सांगा मला वाईट नाही का वाटणार? अहो शुभमला फोन केला तर तो मला म्हणाला तुला काळजी नको म्हणून नाही सांगितलं. आणि मी येते म्हणत होते तर म्हणतो नको आता नको पुढच्या महिन्यात ये. आणि हल्ली मी अजून एक निरीक्षण केलंय लग्न झाल्यापासून त्याला शुभ्राचं जरा जास्तच कौतुक वाटायला लागलंय! जाऊदे मी काही बोलायचं नाही असं ठरवलंय. तसंही आता माझा कुठे काही हक्क आहे. शुभम तिचंच ऐकणार.’
‘ अगं वैशाली, इतकं कशाला बोलायला हवं. तुला काळजी नको म्हणूनच नाही सांगितलं ना? तूसुद्धा मनाला लावून घेऊ नको.’ पंकजने वैशालीला समजावलं. वैशाली सुद्धा ‘ हो ठीक आहे’ असं म्हणून कामाला गेली पण ती अजूनही चिडलेली होती हे पंकजच्या लक्षात आलं. राग शांत झाला की होईल सगळ नीट असा विचार पंकजने केला. आणि तोही त्याच्या कामाला निघून गेला.
थोड्या दिवसांनी पंकजला शुभमचा फोन आला. शुभम पंकजला म्हणाला, ‘ नमस्कार भावोजी. अहो सहजच फोन केला होता. 2 दिवस झाले शुभ्रा आणि मी ताईला फोन करतोय ती फोन उचलत नाही आहे. तिची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना?.’ खरंतर हा फोन चालू असताना वैशाली समोरच होती आणि पंकजने तिला खुणेने विचारलं की तू फोन वर बोलणार आहेस का? तर तिने त्याला खुणेनेच नाही असं सांगितलं.