सुसंवाद भाग 3
वैशाली आत आवरत होती. बाहेर पंकज आणि सलोनी गप्पा मारत होते. सलोनी पंकजला म्हणाली, ‘ खूप सुंदर झालं होतं ते जेवण. वैशाली खरच खूप समजूतदार आहे. तुमच्या लग्नात यायला जमलंच नाही ह्याचं खरंच खूप वाईट वाटत होतं मला. म्हणजे अजूनही वाटतच आहे. पण खरं सांगते वैशाली खूप छान आहे. मला माझी वहिनी खूप आवडली आहे. बाकी कसा आहेस तू? कसं चाललंय एकंदरीत?’ पंकज सलोनीला म्हणाला, ‘ सगळं उत्तम चाललंय. तू कशी आहेस? आपला संपर्कच कमी झालाय बघ. कधी कधी असं वाटतं की तुला फोन करावा आणि खूप खूप गप्पा माराव्यात. अगदी सगळं तुला सांगायचं असतं पण जमतच नाही गं. फोन करायला वेळ झाला की तुझी कामाची वेळ असते.’ ह्यावर सलोनी पंकजला म्हणाली, ‘ खरंच आहे ते. नाही जमतं फोनवर वगैरे बोलायला. पण तरीपण एक सांगते. बाबा आज मला सांगत होते. वैशाली आमची खूप काळजी घेते. तिचं घर तसं मोठ आहे पण तरीपण आपल्या छोट्या घरात ती व्यवस्थित ऍडजस्ट करते आहे. वैशाली आहे म्हणून आम्हाला आधार आहे. मध्ये त्यांना बरं नव्हतं तर तिने आमची खूप काळजी घेतली. खर सांगते त्यावेळी मला तिकडे लांब असून पण बाबांची आणि आईची काळजी वाटत नव्हती कारण तुम्ही इकडे होतात.’
वैशालीला आत सगळं ऐकायला येत होतं. ती विचार करत होती. की खरच ह्या दोघांमध्ये खूप छान नातं आहे. पण दोघांनाही इच्छा असूनही एकमेकांशी बोलता येत नाही. आणि आपण मात्र जवळ राहत असूनही आपल्या भावाशी नीट बोलत नाही. कारण आता आपला भाऊ आपल्याला काही सांगत नाही. खरतर आपणही घरी काळजी वाटू नये म्हणून बऱ्याच गोष्टी सांगत नाही. तेच मध्ये शुभ्रा आणि शुभमने केले तर आपण त्याच्यावर चिडलो. हे चुकलंच आपलं.
वैशालीने लगेच शुभमला फोन केला. खूप दिवसांनी वैशालीचा आवाज ऐकून शुभमला खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी शुभम आणि वैशालीने खूप गप्पा मारल्या. आईची तब्येत आता बरी आहे असं शुभमने वैशालीला सांगितलं. थोड्यावेळाने तिने फोन ठेवला आणि ती बाहेर पंकज आणि सलोनीशी गप्पा मारायला गेली. थोड्यावेळाने पंकज चहा करायला किचनमध्ये गेला. एवढ्यात त्याला शुभमचा फोन आला. शुभम पंकजला म्हणाला, ‘ भावोजी, मगाशी तिचा फोन आला होता. खूप दिवसांनी आम्ही खूप बोललो. आपला नंतर काही फोन झाला नाही म्हणून तुम्हाला कळवायला फोन केला होता.’ पंकजला खूप आनंद झाला. आपल्या बहिणीबरोबर आपल्याला बोलता येत नाही पण वैशाली आणि शुभममधलं अंतर दूर झालं हे बघून त्याला खूप आनंद झाला. तो चहा घेऊन बाहेर आला. त्याने वैशालीला चहा दिला आणि तिच्याकडे बघून हसला. वैशालीसुद्धा आज खूप दिवसांनी मनमोकळी हसत होती. वैशाली आणि पंकजला एवढ खुश पाहून सलोनीला सुद्धा खूप आनंद झाला.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा