Login

सुशीलाचा अर्थार्जनाचा मार्ग(लघुकथा)

सुशीलाचा अर्थार्जनासाठीची खटपट सांगणारी कथा!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

सुशीलाचा अर्थार्जनाचा मार्ग (लघुकथा)

सुशीलाला घरातील गरीब परिस्थितीमुळे जास्त शिक्षण तिला घेता आले नाही. मुलीचे वय विवाह योग्य वय झाले म्हणून आईवडिलांनी तिचे लग्न पंचविसाव्या वर्षी मध्यस्थीतर्फे लावले.

सुशीलाचा नवरा हा एका कंपनीत काम करत होता. त्याचेही जास्त शिक्षण झाले नव्हते. दोन-तीन वर्षातच त्यांच्या संसार वेलीवर एका कन्यारत्नाचे आगमन झाले.

महागाई वाढत होती. नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारात कसे तरी सुशीला सर्व खर्च भागवण्याचा प्रयत्न करत होती. एकदा रेडिओवर महिला दिनानिमित्त एक प्रसिद्ध उद्योजिका भाषण देत होती. त्यात तिने तिची पूर्ण कथा सांगितली. स्त्री ही फक्त साक्षर असून चालत नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे किती गरजेचे आहे हे त्यात सांगण्यात येत होते.

सुशीलाने विचार केला की, आताही काही स्त्रिया घरचे काम करून शेतातही काम करायच्या. कोरोना काळात तर तिच्या नवऱ्याची नोकरी गेली होती. तेव्हा मिळेल ते काम तो करत होता.

आपल्यात कोणते गुण आहेत हे ओळखण्याची गरज असते हे तिने भाषणातील वाक्य ऐकले. तिने खूप विचार केला आणि एक निर्णय घेतला.

तिने मोबाईल पाहिला आणि त्यावरून तिला एक कल्पना सुचली. काहीतरी करायला हवे आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फक्त नवऱ्यानेच संसाराचा गाडा हाकायचा नसतो हे तिला पटले.

तिची मुलगी हळूहळू मोठी होत होती आणि गरजा ह्या दिवसेंदिवस वाढतच होत्या. तिने छोटे छोटे व्हिडीओ बनवले आणि शेजारच्या एका मुलाच्या वतीने ते सार्वजनिक व्यासपीठावर प्रसारित करायला सुरूवात केली. तसेच पारंपरिक पदार्थ तिने गावरान पद्धतीने बनवून ते विकायला आणि  ते बनवतानाचे छोटे छोटे व्हिडीओ बनवून प्रसारित करायला सुरूवात केल्याने खूप लोकांना ते कसे बनवायचे ते समजले.

त्यासाठी तिने सर्व शिकून घेतले. आधी ईमेल आयडी कसा बनवायचा मघ काय आणि किती बोलायला हवे हे तिला जसे ती पुढे जात होती तसे समजत होते.

तिच्या नवऱ्याला तिने ह्याबद्दल कल्पना दिली होती.

"मला काय हे पटत नाही. कोण तुझे व्हिडीओ बघणार?" असे म्हणून तिच्या नवऱ्याने तिची खिल्ली उडवली होती.

आता सुरूवात तर केली आहे तर थांबायचे नाही म्हणून सुशीलाने आपले काम चालूच ठेवले.

सहा महिन्यातच तिचे व्हिडीओ खूप प्रसिद्ध होऊ लागले. तसेच त्यासाठी तिला आता पैसेही मिळू लागले.

वेगवेगळ्या सरकारी योजना ह्यांची तिने माहिती घेतली होती.

नंतर तिने एक चांगला मोबाईल घेतला ज्यातून तिला पहिल्यापेक्षा चांगल्या प्रतीचे व्हिडिओ काढून ते प्रसार करायला मदत झाली. तसेच घरगुती मसाला बनवण्यासाठी खूप जणांनी तिला संपर्क साधला. त्यामुळे तिने त्यासाठी भाडेतत्त्वावर एक गाळा घेतला. तिथे काम सुरू केले.

अनेक तिच्या सारख्या कमी शिक्षण घेतलेल्या स्त्रिया आणि मुली तिला भेटून कामासाठी विचारत होत्या तर तिने बचत गट बनवून त्यात सरकारी योजनांचा कसा लाभ घेता येईल हे पाहिले. निराधार स्त्रिया असो की विधवा स्त्रिया तिने जात धर्म असे काही न पाहता सगळ्यांना मदत करण्याचा जणू विडाच उचलला होता.

सुशीलाने स्वतःच्या अर्थार्जनाचा मार्ग स्वतःच शोधून काढला. तिला एका प्रसार माध्यमातून मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.

ती तिथे गेली आणि तिला ह्याबाबत विचारण्यात आल्यावर ती बोलली की,  "माझे शिक्षण हे फक्त बारावीपर्यंत झालेले आहे. आता खूप महागाई वाढली आहे. पैसा कधी हातात येतो आणि कधी जातो हे समजत नाही. जेव्हा आपण आपले काम करतो मघ ते ऑफिसमध्ये जावून असू द्या की घरातून करत असू. आपल्या कष्टाचे मोल आपल्याला मिळते त्याचा आनंद वेगळाच असतो. आता दुनिया बदलली आहे आधीच्या स्त्रिया जरी गृहिणी असायच्या तरी शिवणकाम, खानावळ असे काहीना काही करायच्या. मलाही माझ्या संसारात मदत करायची होती. आर्थिक हातभार लावणे गरजेचे आहे. म्हणून मी हा मार्ग निवडला. माझ्या डोक्यात हेच होते की मला आजच्या स्त्री सारखे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे होते आणि मी कष्टाने झाले."

हा व्हिडिओ सगळीकडे प्रसारित होत होता आणि कित्येक स्त्रिया ह्या सुशीलाकडून प्रेरणा घेत होत्या.

सुशीलाने बरेचसे कर्ज फेडले त्यामुळे तिच्या नवऱ्याला आधी आपण तिला पाठिंबा दिला नाही म्हणून वाईट वाटले. नंतर आपल्या बायकोच्या कामात गरज लागेल तशी तो मदत करू लागला.

सुशीलाचा हा प्रवास खडतर तर होताच पण तिच्यात असलेली जिद्द त्यामुळे तिने स्वतः सोबतच इतरांनाही अर्थार्जनाचे महत्त्व तिच्या उदाहरणातून पटवून दिले होते. कोणताही मार्ग सोपा नसतो तो बनवण्यासाठी प्रयत्नांचे बांध घालावे लागतात आणि शेवटपर्यंत झटत रहावे लागते.

प्रयत्न करायला
तू मागे नको हटू
रात्रंदिवस मेहनतीने
घाम गाळून झटू

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

फोटो सौजन्य साभार मेटा आणि गुगल