सुतावरून स्वर्ग भाग १
जलद लेखन
©®आरती पाटील- घाडीगावकर
श्रीजा ऑफिस मधून घरी आली तोच संजय जोराने तिच्या वर ओरडला. " तूला नसेल जमत तर तसं मला सांग, मी घरकामाला एक बाई ठेवेन पण माझ्या आईवर सर्व काम टाकून अजिबात जायचं नाही. कळलं? "
श्रीजा ला काहीच कळत नव्हतं की नक्की काय सूरु आहे. तिने बॅग टेबल वर ठेवत शांतपणे विचारलं, " नक्की काय झालं ते मला नीट आणि स्पष्ट सांगशील का ? "
तोच सासूबाई तवातवाने आल्या आणि बोलू लागल्या, " का तूला माहित नाही का काय झालं ते? सर्व करून सवरून वर तोंड करून विचारते काय झालं म्हणून. "
" मला तर आता परत परत त्या विषयावर बोलायचा पण वैताग आलाय. मी आत जातेच कशी. " असं बोलून डोळ्यांना पदर लावून सविता बाई आपल्या रूम मध्ये निघून गेल्या.
" मला तर आता परत परत त्या विषयावर बोलायचा पण वैताग आलाय. मी आत जातेच कशी. " असं बोलून डोळ्यांना पदर लावून सविता बाई आपल्या रूम मध्ये निघून गेल्या.
संजय रागाने बोलू लागला, " आईला गावावरून आणताना तूला विचारूनच आणलं होतं ना? तेव्हा तर म्हणाली होतीस नक्कीच घेऊन या. मी आनंदाने त्यांच्यासाठी सर्व करेन. तुझं बोलणं ऐकून किती बरं वाटलं होतं मला. पण मला काय माहित होतं माझ्या आई कडून सर्व घर काम करून घेण्यासाठी तू आनंदाने आणायला सांगत होतीस. मला वाटलं होतं किमान तू तरी इतर बायकांसारखी नसशील जिला सासू नकोशी असते. " असं बोलून संजय सुद्धा आत निघून गेला.
श्रीजाला अजूनही कळत नव्हतं की तिचं नक्की चुकलं कुठे ? श्रीजा आणि संजय च्या लग्नाला जवळपास एक वर्ष झालं होतं. लग्नानंतर नोकरी शहरात असल्यामुळे सासूबाई सोबत राहण्याचा अनुभव श्रीजा ला नव्हता. आठवड्या भरा पूर्वी श्रीजा आणि संजय सविता बाईंना शहरात आल्या घरी घेऊन आले होते. सासरे तीर्थ यात्रेसाठी बाहेर जाणार होते. गावी आई एकटी राहायला नको त्यामुळे श्रीजा आणि संजय सविता बाईंना आपल्या घरी घेऊन आले होते.
श्रीजा मात्र आजच्या प्रसंगांनंतर पुरती गोंधळाली होती. कारण तिला चांगलाच आठवत होतं की तिने सविता बाईंना काहीही कामे सांगितली नव्हती. श्रीजा बेडरूम मध्ये आली तेव्हा संजय तिच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच काम करू लागला. श्रीजा ला खूप वाईट वाटत होतं कारण आजपर्यंत संजय तिच्यावर अश्याप्रकारे कधीच ओरडला नव्हता.
श्रीजाने जवळ येऊन पुन्हा एकदा संजय ला विचारलं. "संजय मी खरंच काहीही काम आईंना सांगितलं नाहीये. तरी मी काय काम सांगितलं ते तरी मला सांग. "
क्रमश:
( संजय आणि सविता बाई एवढं चिढायला नक्की श्रीजाने काय काम सांगितलं असेल ? पाहूयात पुढील भागात.?)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा