सुटका (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
सुटका

शारदा, अम्मा आणि गुंडप्पा रामाची वाट बघत होते. अम्माने जाऊन सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. तिने शारदाला जेवणाचे पान दिले पण ती काही ते खात नव्हती.

“अम्मा यांना जाऊन बराच वेळ झाला आहे. कुठे संकटात तर सापडले नसतील ना? जेवले तरी असतील का? माझ्या घशाखाली घास नाही उतरणार.” शारदा म्हणाली.

तिचे बोलणे ऐकून अम्माने खुणा करून तिचं बोलणं शारदाला सांगितलं; “तो माझा मुलगा आहे. मला माहित आहे ना तो उपाशी राहणार नाही. त्याची काळजी तू करू नकोस उलट ज्यांच्या सोबत तो असेल त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. तो आत्तापर्यंत पार नरड्याशी येईपर्यंत जेवला असेल. तू खाऊन घे.”
************************************
तर इथे रामाला आता त्याच्या चोरीची शिक्षा मिळणार होती. एका जंगलात एक खड्डा खोदून त्याला त्या खड्डयात पुरले होते. पूर्ण गळ्यापर्यंत तो आत गाडला होता. त्याचे फक्त डोके वरच्या बाजूला राहिले होते.

“आता शेवटची प्रार्थना करून घे रामा. इथे साक्षात देवही तुला वाचवू शकणार नाही. ती झाडाची सावली आणि बाजूला तो दगड दिसतोय? त्या झाडाची सावली जेव्हा त्या दगडावर पडेल तेव्हा इथून हत्तींचा एक मोठा कळप जाईल आणि तुझा मृत्यू निश्चित आहे. या जन्मात तू मला भेटलास पण पुढच्या जन्मात भेटू नकोस.” आचार्य म्हणाला.

“मान्यवर पण तुम्ही मात्र माझ्या नावाचा जप करत रहा. रामा रामा रामा तुम्हाला मोक्ष नक्कीच मिळेल.” रामा हसत म्हणाला आणि सगळे तिथून निघून गेले.

तिथून सगळेजण गेल्यावर रामा तिथून कसे सुटता येईल याचा विचार करत होता. बराच वेळ गेला तरीही त्याला काही सुचत नव्हते.

“आज आपण संपलो! तो तथाचार्य बरोबर बोलला आज मृत्यू निश्चित आहे. साक्षात देवही आपल्याला वाचवू शकणार नाही.” रामाची शेंडी बंधू म्हणाली.

नुसत्या विचारांनीच त्याने घट्ट डोळे मिटून घेतले आणि त्याला झोप लागली. जाग आली ती त्याच्या शेंडीने म्हणजेच बंधूने हाक मारल्यावर.

“रामा! रामा!” बंधू म्हणाली.

तिच्या आवाजाने जाग आल्यावर रामा एकदम दचकून जागा झाला आणि “काय झालं? कुत्रा आला का?” असं दचकून विचारलं.

“कुत्रा?” बंधूने गोंधळून विचारलं.

“हा! आत्ता कुत्र्याशिवाय जास्त धोका कोणाचाच नाही. आपल्याला जमिनीत गाडलेलं लाकूड समजून आपल्यावर अभिषेक करून जाईल.” रामा म्हणाला.

“अरे देवा तू मला कोणाची शेंडी बनवून पाठवलंस या जगात? हा आळशी काहीच करणार नाही. देवा आता तूच काहीतरी कर आणि वाचव.” बंधू म्हणाली.

“बहुतेक देवाने तुझं ऐकलं. वाचलीस तू.” रामा म्हणाला.

“वाचले? कशी?” बंधू आश्चर्याने म्हणाली.

“तू आता फक्त शांत बस आणि काय होतंय ते बघ.” रामा म्हणाला.

अचानक त्याला समोरून एक माणूस येताना दिसला होता त्याला बघून तो मोठयाने एक मंत्र म्हणू लागला; “धुमधडाम धूमधडाम सिधी हो जा सीधी हो जा.”

रामाला असं बघून तो तिथे थांबला आणि त्याच्याकडे बघू लागला.

“तुम्ही आता थांबलाच आहात तर कृपया माझे नाक खाजवा. खूप खाज आली आहे.” रामा म्हणाला.

लगेचच त्या माणसाने रामाचे नाक खाजवण्या साठी स्वतःच्या हातातील सामान बाजूला ठेवले आणि तो खाली बसला. बोटाने त्याने नाक खाजवयला सुरुवात केली.

“धन्यवाद धन्यवाद.” रामा म्हणाला.

“श्रीमान मी विचारू शकतो का हे असं का आहे?” त्या व्यक्तीने विचारलं.

“काय कसं आहे? अर्धे आत आणि अर्धे बाहेर असं कसं आहे?” रामाने विचारलं.

“म्हणजे हे जसं आहे ते असं कसं आहे?” त्या माणसाने विचारलं.

“अरे श्रीमान खूप वर्षांपासून मला कंबर दुखीचा त्रास आहे आणि तुमच्यासारखं कुबड पण आहे. खूप इलाज केले पण बरे वाटत नव्हते.” रामा म्हणाला.

“मग?” त्या माणसाने विचारलं.

“तुम्ही खाजवत रहा. अचानक मला एक महान साधू बाबा भेटले आणि त्यांनी उपाय सांगितला.” रामा म्हणाला.

“कसला उपाय?” त्याने विचारलं.

“हा तुम्ही जो बघताय तो. जर मी एक पूर्ण दिवस जमिनीत असं गळ्यापर्यंत स्वतःला गाडून घेतलं आणि त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप केला तर माझं कुबड बरं होईल आणि सरळ चालू शकेन.” रामा म्हणाला.

“मग फरक पडला?” त्याने विचारलं.

“आता मी इथे तुमच्या समोर अजूनही जमिनीत आहे. मला बाहेर काढायला मदत करा म्हणजे समजेल आपल्याला उपाय कामी आला की नाही.” रामा म्हणाला.

त्या माणसाने लगेचच त्याला बाहेर पडायला मदत केली. रामाला बाहेर काढल्यावर त्याने हलकेच कंबर ताठ करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हात उंचावून कंबर ताठ करून झाल्यावर त्याने स्वतः भोवती एक गिरकी घेतली आणि “माझी कंबर दुखी आणि कुबड दोन्ही बरे झाले” असे म्हणाला.

“अभिनंदन! अभिनंदन!” तो माणूस म्हणाला.

“धन्यवाद श्रीमान. तुम्ही पहिले व्यक्ती आहात ज्यांनी मला सरळ उभं राहिलेलं पाहिलं आहे. तुम्ही मला मदत केलीत, माझं नाक खाजवून दिलं मी त्यासाठी काहीतरी करु इच्छितो. सांगा तुमच्यासाठी मी काय करू? अगदी निसंकोचपणे सांगा.” रामा म्हणाला.

तो माणूस काहीही बोलला नाही पण त्याची शेंडी बोलली; “लवकर निघ इथून रामा. लवकर आवर.”

“हा आवरतोय आवरतोय. थोडावेळ गप्प बस.” रामा हळू आवाजात म्हणाला.

“पण मी तर काही बोललोच नाही.” तो माणूस म्हणाला.

“हो पण मी तुमच्या मनातील गोष्ट ओळखली ना. तुम्हाला पण हा उपाय करायचा आहे ना?” रामाने त्याला हळूच गुदगुली करत विचारलं.

तो माणूसही लगेच हो म्हणाला आणि रामाने त्याला खड्डयात गाडलं.

“कसं वाटतंय?” रामाने विचारलं.

“अहाहा! खूप छान. थंड थंड. आता मीही सरळ चालू शकेन. धन्यवाद.” तो म्हणाला.

“अरे त्यात धन्यवाद कसले? आपापले नशीब असते. बरं तुमचं नाव काय?” रामाने विचारलं.

“सिद्धप्पा” त्याने सांगितलं.

“होतं. होतं. लहानपणी पालकांना कुठे माहित असतं ना नावाचे काय होणार आहे ते. बरं राहायला कुठे आहात तुम्ही?” रामाने विचारलं.

“सरोजनगर.” तो म्हणाला.

“अरे रामा कितीवेळ चल निघ लवकर आणि मलाही इथून काढ बाहेर.” बंधू म्हणाली.

“हो काढतोय.” रामा म्हणाला.

“काढतोय? आत्ताच तर गाडलं.” तो माणूस म्हणाला.

“नाही नाही मला जायचं आहे ना तर मी इथून निघतोय असं.” रामा म्हणाला आणि जाऊ लागला.

“अरे महोदय पण मंत्र तर सांगून जा.” तो माणूस म्हणाला.

“संत्रम म् मन्त्रं! धूम धडाम धूम धूम सिधि हो जा सिधी हो जा. एकदम जोर लावून सगळ्यात वरच्या पट्टीत म्हणा.” रामा म्हणाला.

तो माणूसही जोरजोरात मंत्र म्हणू लागला आणि रामा तिथून निघून गेला.
***********************************
इथे आता संध्याकाळ झाली होती आणि राजगुरूचे शिष्य त्याच्याच घरात फळं खात त्याचाच बद्दल बोलत होते.

“एक सांग मणी जर आपला गुरू मेला तर कसला मृत्यू येऊन मरेल? कुत्र्याचा की सापाचा?” धनीने विचारलं.

“सापाच्याच मृत्युने मेला पाहिजे.” मणी म्हणाला.

“असं का?” धनीने विचारलं.

“त्याचं तोंड सापासारखं, वागणं सापा सारखं अश्या विषारी माणसाने तर सापाच्याच मृत्युने मरावं.” मणी म्हणाला.

“कुत्र्याच्या मृत्युने जरी मेला तरी काही नुकसान नाही.” धनी म्हणाला.

“जाऊदे! मरु दे कसंही जाणार तर नरकातच ना!” मणी म्हणाला.

त्या दोघात राजगुरू कोणत्या मृत्युने मरावं याबद्दल वाद होऊ लागले म्हणून त्यांनी नाणे उडवून ठरवायचे ठरवले. एवढ्यात तिथे कोतवाल आला. राजगुरू साधनेला बसला आहे असं सांगूनही त्याला महत्त्वाचे काम असल्याने त्याला भेटायचं होतं पण त्याच्या खोलीच्या बाहेर स्वतः गुरुमाता म्हणजेच राजगुरूची पत्नी पहारा देत होती. आत तो साधना वैगरे करतच नव्हता फक्त आराम करत होता पण बराच वेळ आवाज ऐकू आल्यावर त्याने दार उघडले आणि तो बाहेर आला.

“कसला गोंधळ सुरू आहे?” त्याने येऊन विचारलं.

“माफ करा प्रभू. यात माझी चूक नाही या दोघांना मी सांगितलं पण ऐकत नव्हते. पण तरीही तुम्ही मला शिक्षा द्या.” त्याची पत्नी म्हणाली.

“नाही नाही काही गरज नाही. तू जाऊ शकतेस.” तो म्हणाला.

“नाही प्रभू. हे तुमचं मोठं मन आहे पण मी स्वतःला शिक्षा देणार. आजपासून तीस दिवस अन्न आणि पाणी बंद.” ती म्हणाली.

“एवढ्या लहान गोष्टीसाठी तू स्वतःला का त्रास करून घेतेस? स्वतःचं अन्न पाणी का बंद करतेस?” त्याने विचारलं.

“माझं नाही प्रभू. तुमचं. मला त्रास झालेला मी कसाही सहन करेन पण माझ्या पती परमेश्वराला झालेला त्रास मला सहन करणं अशक्य आहे. मी लगेच जाऊन चूल बंद करण्याची सूचना देऊन येते.” ती म्हणाली आणि तिथून गेली.

“असं काय झालं की तुम्ही दोघांनी येऊन माझ्या ध्यानात विघ्न आणलं?” त्याने धनी मणीला विचारलं.

“तुमचा शत्रू पंडित रामा पळून गेला. तुमच्या तोंडाला पानं पुसून पळाला.” मणी म्हणाला.

ते तिघे बाहेर आले आणि राजगुरूने कोतवालला तो कसा पळून गेला याबद्दल विचारले.

“आम्ही त्याचा अंत बघायला थोड्या अंतरावर उभे होतो. जेव्हा आम्ही एक आवाज ऐकला तेव्हा तिथे जाऊन बघितलं तर तिथे रामा नव्हता तर एक दुसराच माणूस होता.” कोतवाल म्हणाला आणि त्या माणसाची चौकशी केल्यावर जे काही रामाने केले होते ते सर्व राजगुरूला सांगितलं.

“आता त्याला अशी अद्दल घडवतो की पुढचे सात जन्म हा विचार करून तथाचार्यच्या नावाने कापत राहील.” तो रागाने म्हणाला.
**********************************
इथे गावात आल्यावर रामा आणि त्याच्या घरचे एका घरात होते. रामा देवीची आरती करत होता तर त्याच्या घरचे सगळे जेवायला बसले होते. तितक्यात तो मगाचचा माणूस आला.

“अरे कपटी, धोकेबाज मला हत्तीच्या पायाखाली मरायला सोडून आलास आणि माझ्याच घरात देवीची आरती करतोयस?” तो माणूस रागाने म्हणाला.

“हे तुम्ही काय बोलताय?” त्या माणसाची बायको म्हणाली.

अम्मा आणि शारदा देखील चकित झाले होते पण रामाने त्यांना डोळ्यांनीच इशारा केला आणि त्या दोघी शांत झाल्या.

“या माणसाने मला खोटं सांगून मृत्यूच्या दाढेत ढकलले होते.” तो म्हणाला.

“पण मित्रा काही झालं तर नाही तुम्हाला. तुम्ही एकदम धडधाकट आहात. हा प्रसाद घ्या.” रामा म्हणाला.

“मला मित्र नको म्हणू. मी आज फक्त त्या कोतवालमुळे वाचलो. तो जर वेळेवर आला नसता तर आज मी मेलोच होतो.” तो म्हणाला.

“पण कोतवालने तुम्हाला वाचवलं का? कारण तुम्ही खूप मोठयाने मंत्र म्हणत होतात. कोणीतरी तुम्हाला तिथून बाहेर काढावं म्हणून तर मी जोरात मंत्र म्हणायला सांगितला होता.” रामा म्हणाला.

त्या माणसाला तो प्रसंग आठवला. रामाने त्याला सगळ्यात वरच्या पट्टीत मंत्र म्हणायला का सांगितले ते त्याच्या लक्षात आले.

“पण कोणी वाचवले नसते तर?” त्याने विचारलं.

“तर मी वाचवलं असतं. मी तिथेच लपून बसलो होतो. जेव्हा कोतवालने तुम्हाला वाचवलं तेव्हाच मी तिथून निघालो.” रामा म्हणाला.

“आणि राहिली गोष्ट खोटं बोलण्याची तर सगळ्यांना माहीत आहे हा रामा कधीच खोटं बोलत नाही. बघा तुम्ही सरळ उभे आहात. तुमचं कुबड बरं झालं आहे.” रामा म्हणाला.

त्याच्या बोलण्याने त्याने स्वतःला पाहिलं. खरंच तो आता सरळ उभा होता.

“कधी कधी फळाच्या प्राप्तीसाठी वाकलेल्या फांदीला देखील जबरदस्ती सरळ करावं लागतं. तुम्ही जेव्हा कोतवालचे फटके खाल्लेत तेव्हा तुमचे कुबड देखील बरे झाले. यासाठी थोड्या काठ्या खाव्या लागल्या पण तुम्ही बरे झालात.”

“मी बरा झालो. पार्वती मी बरा झालो. माझ्या पाठीचे कुबड बरे झाले.” तो माणूस आनंदाने नाचू लागला.

त्याला मध्येच थांबवत रामा बोलू लागला; “मित्रा मित्रा! अजाणतेपणे का होईना पण तुम्ही माझा जीव वाचवला आहे म्हणून मी तुम्हाला मनापासून माझा मित्र मानतो. जो मित्र अडचणीच्या वेळी कामी येतो तोच संपत्तीचा पण भागीदारी असतो. मी शब्द देतो ज्या दिवशी राजदरबारात कामाला लागेन तुमचं हे ऋण नक्कीच फेडेन. जर माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास असेल तर काही दिवस मला आणि माझ्या कुटुंबाला इथे आश्रय द्या नाहीतर मी लगेचच सहपरिवार इथून निघतो.” रामा हात जोडून म्हणाला.

“तुझ्यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे. मी तुझी साथ देईन. आता तुझं कुटुंब हे आमचं कुटुंब आहे.” तो म्हणाला.

“धन्यवाद मित्रा!” रामाने त्याचे हात हातात घेऊन त्याला मिठी मारली.

“पण त्या राजगुरू तथाचार्यचे काय करशील? तो तुला शोधायला आकाश पाताळ एक करतोय.” त्याने विचारलं.

“बघूया. फक्त शोधत आहे ना! दवंडी तर पिटवत नसतील नगरात?” रामा म्हणाला.

पण इथे तर खरंच नगरात दवंडी पिटली जात होती. एका बुजगवण्याला रामाचे चित्र लावून त्याला एक अपराधी म्हणून घोषित करण्यात आले होते. नेमके रामा आणि शारदा नगराच्या त्या बाजारात खरेदी करायला आले होते आणि तेही ती दवंडी ऐकत होते.

“जे कोणी या अपराध्याला आश्रय देईल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल तर जो याला पकडायला मदत करेल त्याला बक्षीस देण्यात येईल.” दवंडी पिटली जात होती.

ते दोघे बुजगवण्याच्या मागच्या बाजूला असल्याने त्यांनी चित्रं पाहिले नव्हते. हवा जोरात सुटली होती आणि ते चित्र उडून रामाच्याच तोंडावर चिकटले. त्याने चित्र पाहिले आणि तो अवाक् झाला.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all