सायंकाळचे पाच वाजले होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या जवळ असलेल्या एका आलिशान, नव्याने घेतलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये अंकिता आणि दीपक बसले होते. बाल्कनीतून दिसणारा शहराचा विस्तार आणि डोक्यावर शांत निळ्या-नारिंगी रंगात मावळत चाललेला सूर्य त्यांच्या 'स्थैर्या'च्या स्वप्नाची साक्ष देत होता. अंकिता साधारण वय वर्ष ३० एका मोठ्या आयटी फर्ममध्ये HR मॅनेजर म्हणून कार्यरत होती, तर दीपक साधारण वय वर्ष ३२ एका मल्टिनॅशनल कंपनीत इंजिनिअर होता. अमेरिकेतील तीन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करून ते नुकतेच भारतात परतले होते.
"दीपक, विश्वास बसत नाहीये की हे आपलं घर आहे! आठवतंय ? आपण जेव्हा अमेरिकेहून परतलो, तेव्हा मला वाटलं होतं की शून्यतून सुरुवात करावी लागेल. " अंकिताने चहाचा कप हातात घेत, आनंदात म्हणाली.
दीपकने बाल्कनीच्या ग्रीलवर हात ठेवला.
" हो, पण आपण दोघांनी मिळून घेतलेली मेहनत फळाला आली. होम लोनचे हप्ते थोडे मोठे आहेत, पण आपली नोकरी आणि प्रमोशन दोन्ही उत्तम आहे. करिअर सेट झालं आहे, घर सेट झालं आहे... आता खरंच 'फ्रीडम' एन्जॉय करायचा आहे."
तो 'फ्रीडम' शब्द उच्चारत असतानाच, आतून सरस्वतीबाई दीपकची आईचा यांचा आवाज आला,
" दीपक, अरे जरा इकडे ये रे ! माझा हात दुखतोय. हे डबे जरा वरच्या कपाटात ठेवून दे."
दीपकने अंकिताकडे पाहिले आणि हलकेच डोळे फिरवले.
" आणि या 'होम'सोबत आलेला नवा 'टाईमटेबल' पण एन्जॉय करायचा आहे!" तो हसला आणि आत गेला.
दीपकचे आई-वडील, प्रभाकरराव आणि सरस्वती, त्यांच्यासोबत राहण्यासाठी आले होते. घरात सगळ्या सुख-सोयी होत्या; पण गेल्या काही महिन्यांपासून घरात एक अव्यक्त ताण जाणवत होता. तो ताण होता '' .
संध्याकाळची वेळ होती. सगळेजण एकत्र बसून चहा घेत होते. सरस्वती यांनी विषय काढलाच.
" अंकिता , मला आज शेजारच्या सोसायटीतून बोलावणं आलं होतं. त्यांच्या घरी लहान मुलांची डे-केअर सुरू झाली आहे. त्यांची मुलगी, शालिनी, आता मुलांच्या मदतीने डे-केअर चालवते. तिचा मुलगा किती गोड आहे गं! काल खेळताना त्याला बघितलं. किती चैतन्य असतं घरात लहान बाळ असेल तर ! "
अंकिताला कशा प्रकारे उत्तर द्यायचं हे माहीत होतं. ती शांतपणे म्हणाली,
" हो आई, नक्कीच. लहान मुलं खूप आनंद देतात; पण त्यांची जबाबदारी खूप मोठी असते. आम्हाला सध्या दोघांनाही करिअरवर आणि या होम लोनवर लक्ष केंद्रित करायचं आहे."
प्रभाकर यांनी त्यांचा गंभीर मुद्दा मांडला.
" लक्षात ठेवा, पोरांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही. आम्ही दोघं आता साठीच्या वरचे आहोत. नातवंडं हातात घेऊन खेळायची, त्यांना आमच्या पद्धतीने थोडं बागकाम शिकवायची, आमच्या गोष्टी सांगायची इच्छा आहे. तुम्ही 'सेट' व्हायला गेलात, तर आम्ही 'अनसेट' होऊन जाऊ."
दीपक लगेच म्हणाला,
" बाबा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमची पूर्ण काळजी घेऊ. पण तुम्ही अमेरिकेत बघितलं असेल, तिथे लोक ३५-४० वर्षांपर्यंत जबाबदारी घेत नाहीत. आम्हाला आर्थिकदृष्ट्या १००% सज्ज व्हायचं आहे."
सरस्वतींचा चेहरा उतरला.
" तुम्ही अमेरिकेत राहून आलात, म्हणून हे विचार आलेत का ? तुमच्यासाठी 'फ्रीडम' म्हणजे 'मुलांची जबाबदारी नको' असं आहे का ? आमच्या वेळेस असं नव्हतं."
त्यांच्यातील या भावनिक चर्चा काही दिवसांनी पुन्हा सुरू होत असत. दीपक आणि अंकिताला त्यांच्या आई-वडिलांबद्दल आदर होता, पण त्यांच्या आयुष्याचे निर्णय त्यांना इतरांच्या अपेक्षेनुसार घ्यायचे नव्हते.
याच तणावातून बाहेर पडण्यासाठी आणि आयुष्यातील 'फ्रीडम' सिद्ध करण्यासाठी, अंकिता आणि दीपक यांनी बालीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जवळचे मित्र साहिल आणि कृत्तिका . दीपक आणि अंकिता यांच्याच वयाचे, ज्यांना एक छोटा मुलगा आहे. यांना सोबत येण्यास तयार होते.
रात्री, दीपक आणि अंकिता लॅपटॉपवर बाली ट्रिपचे बजेट बनवत होते.
" हे बघ अंकिता, फ्लाईट्स, हॉटेल आणि व्हिसा मिळून दोघांसाठी जवळपास १,८०,००० रुपये येत आहेत. आपण बजेट ७५,००० प्रति व्यक्ती धरले होते. साहिल आणि कृत्तिका आले असते तर खर्चाची वाटणी झाली असती." दीपक म्हणाला.
अंकिता हसली.
अंकिता हसली.
" एवढा खर्च होणार आहे, पण आपण सहज करू शकतोय, हे बघून आनंद होतोय. आपले कर्ज असले तरी, आपण अजूनही असे मोठे खर्च करू शकतो. करिअर आणि आर्थिक नियोजनाचे हे यश आहे."
त्यांनी बुकिंगची प्रक्रिया सुरू केली. त्याच वेळी, दीपकचा फोन वाजला. साहिलचा मेसेज होता. दीपकने मेसेज वाचला आणि त्याचा चेहरा किंचित बदलला.
साहिलचा मेसेज:
" दीपक, आम्हाला माफ कर. सॉरी यार.आम्ही ट्रिपला येऊ शकणार नाही. या वर्षी मुलाच्या शाळेची फी आणि इतर खूप खर्च झाला आहे. पुढच्या वर्षी आपण नक्की जाऊ."
दीपकने अंकिताकडे पाहिले. अंकिताने मेसेज वाचला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर अव्यक्त, क्षणिक समाधानाचा एक भाव आला.
" बघ! आपण किती भाग्यवान आहोत! आपल्याला कोणाच्या 'फी' किंवा 'ट्युशन'मुळे ट्रिप रद्द करावी लागत नाहीये." अंकिता हळू आवाजात म्हणाली.
" खरंय. आपण या क्षणासाठी संघर्ष केला. आपल्या 'फ्रीडम'ची किंमत आहे ही ! " दीपक म्हणाला.
त्यांच्यातील हे बोलणं संपत नाही तोच, दुसऱ्याच क्षणी दीपकचा फोन पुन्हा वाजला. स्क्रीनवर 'प्रियांकाचे' नाव दिसले. प्रियांका दीपकची चुलत बहीण आहे.
" अरे, प्रियांकाचा मेसेज... सर्वेशचा वाढदिवस आहे दोन दिवसांनी. जाऊया का ? "
अंकिता आणि दीपक क्षणभर शांत झाले. प्रियांका म्हणजे तीच बहीण, जिने चार वर्षांपूर्वी यूकेला जाण्याचा मोठा करिअर चान्स सोडून 'आई' होण्याचा निर्णय घेतला होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा