Login

स्वाभिमान शोध अस्तित्वाचा (भाग १)

स्वराली एक गृहिणी! कॉलेजमध्ये पेटी वाजवण्यात संगीत विशारद असलेली. तिची संगीताची कला लग्नानंतर कोणी जाणून घेऊ शकेल? तिचं पेटी वाजवण्याच स्वप्न पूर्ण होईल का? जाणून घेण्यासाठी वाचा; "स्वाभिमान शोध अस्तित्वाचा"
"स्वराली, स्वराली..," अजय बेडरूममधून जोरजोराने स्वरालीला आवाज देतो

"काय झालं? एवढ्या मोठ्याने का ओरडताय?" स्वराली लगबगीने बेडरूममध्ये येतं विचारते

"माझा शर्ट असा चुरलेल्या अवस्थेत का आहे? काल सकाळी ऑफीसला जाताना मी तुला सांगून गेलेलो. उद्या ऑफिसमध्ये माझी महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे हा शर्ट स्वच्छ धुवून, इस्त्री करून ठेव. मग का नाही धुतलास तू शर्ट?" अजय स्वरालीला शर्ट दाखवत विचारतो

"अहो, ते.. आज मुलांची शाळेत युनिट टेस्ट आहे. काल दिवसभर त्यांचाच अभ्यास घेतं होते आणि संध्याकाळी आईंच्या भिसीच्या सगळ्या मैत्रिणी घरी आलेल्या, त्यांच्या नाश्त्याच बघण्यात सगळा वेळ गेला." स्वराली आदल्या दिवशीचा दिनक्रम सांगते

"ए, तू दिवसभर घरात काय करतेस; ह्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. अजून एक, मुलांचं अन् माझ्या आईवडिलांच सगळं करणं तुझं कर्तव्यच आहे. त्यांच नाव पुढे करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नकोस." अजय शर्ट बेडवर फेकत रागात म्हणतो

"अहो, पण मी कुठे..," स्वराली पुढे काही बोलणार तेवढ्यात;

"ते सगळं सोड. माझ्या फाईलच्या कपाटात तुझ्या सर्टीफिकेटची फाईल कशी आली?" अजय फाईल हातात पकडत विचारतो

"परवा आईंनी रद्दीवाल्याला रद्दी दिली, तेव्हा ही फाईल सुद्धा त्यात होती. मला फाईल ओळखीची वाटली, म्हणून मी पाहिलं तर माझ्याच सर्टीफिकेटची फाईल होती. त्याबद्दल मी विचारल्यावर, 'लग्न होऊन दोन पोरं झाली. आता ह्या सर्टीफिकेटची काय गरज!' असं म्हणून ही फाईल मी तुमच्या कपाटात ठेवली. जेणेकरून फाईल ईथे सेफ राहील" स्वराली पाणावलेल्या डोळ्यांनी दुखऱ्या स्वरात म्हणते

"सेफ राहील की, तू माझ्याशी बरोबर करू शकशील ह्या हेतूने! तसा विचारही मनात आणू नकोस. कारण ते तुला ह्या जन्मात शक्य नाही." अजय तिच्या डोळ्यांत बघत बोलतो आणि फाईल तिच्या तोंडावर मारत ऑफीसला निघून जातो

स्वराली खाली पडलेली फाईल उचलते. त्यात तिने शाळेपासून कॉलेजपर्यंत संगीतात मिळवलेले सर्टिफिकेट्स होते. ती एक हात सर्टीफिकेट वरून फिरवते. स्वरालीला शाळेपासूनच सुरेख पेटी वाजवता यायची.शाळेत कुठलाही संगीत कार्यक्रम असो, पेटी वाजवायला ठरलेली विद्यार्थिनी स्वराली असायची. लग्नापूर्वी स्वराली संगीताचे क्लासेस घ्यायची, पण लग्नानंतर अजयला हे सगळं आवडत नसल्याने तिने संगीताला दूर ठेवलं होतं